S M L

रिव्ह्यु: मिल्खासिंग यांचा थक्क करणार प्रवास

Sachin Salve | Updated On: Mar 28, 2017 05:21 PM IST

रिव्ह्यु: मिल्खासिंग यांचा थक्क करणार प्रवास

अमोल परचुरे,समीक्षक

साठच्या दशकात ज्या ऍथलीटने संपूर्ण देशाला खास करुन तरुणाईला वेड लावलं होतं अशा मिल्खासिंग यांच्या जीवनावर आधारित 'भाग मिल्खा भाग' हा सिनेमा.. भारतासारख्या देशात धावपटूचं आयुष्य किती खडतर असू शकतं हे आपण 'पानसिंग तोमर'मध्ये पाहिलं होतं. मिल्खासिंग यांचं आयुष्य पानसिंगपेक्षा पूर्णपणे वेगळं आणि त्यामुळे पानसिंगपेक्षा खूप वेगळा अनुभव आपल्याला मिळतो भाग मिल्खा भाग मध्ये...सिनेमाची लांबी आहे तीन तास सात मिनिटं, पण कुठेही हा सिनेमा बघताना कंटाळा येत नाही हे खरं असलं तरी पूर्णपणे आपण सिनेमात गुंतूनही राहत नाही हेसुद्धा सांगायला हवं. कंटाळा येत नाही याचं पूर्ण श्रेय फरहान अख्तर आणि राकेश मेहरा यांच्या संपूर्ण तांत्रिक टीमला द्यायला हवं.

काय आहे स्टोरी?

भाग मिल्खा भाग हा मिल्खासिंग यांच्या आयुष्यावर आधारित आहे. राकेश मेहरा यांनी त्यावर सिनेमा बनवताना वास्तव गोष्टींबरोबरच काही फिल्मी घटनाही जोडलेल्या आहेत. मिल्खासिंग यांचं बालपण, फाळणीचे दिवस, डोळ्यासमोर झालेली कुटुंबीयांची कत्तल, लाडक्या बहिणीपासून ताटातूट, थांबलेलं शिक्षण, गैरमार्गाला लागून कमावलेले पैसे, पंजाबी मुलीसोबत प्रेमप्रकरण, सैन्यात भरती, एक ग्लास दूधासाठी धावण्याची निर्माण झालेली आवड, हीच आवड बनते ध्यास, मग अतिशय कठीण प्रशिक्षण आणि अखेर विजयी घोडदौड असा मिल्खासिंग यांचा प्रवास सिनेमात दिसतो.

अर्थात, इथे मी सगळं थोडक्यात सांगितलं, पण हा प्रवास पडद्यावर साकारणं हे खरंच खूप मोठं आव्हान आहे, हे सिनेमा बघताना जाणवत राहतं. सिनेमाचं वैशिष्टय म्हणजे सुरुवातीपासून त्यात उर्जा साठलेली आहे. 1960 साली रोम ऑलिम्पिकमध्ये अवघ्या काही सेकंदांनी मिल्खासिंग यांचं पदक हुकलं होतं. ही रुखरुख जशी मिल्खासिंग यांना आहे तशीच ती तमाम भारतीयांना आहे. पण रोमपूर्वी मिल्खासिंग यांनी जे करुन दाखवलं ते थक्क करणारं आहे. मिल्खासिंग म्हणजे ऑलिम्पिकमध्ये हुकलेलं पदक ही ओळख पुसून मिल्खासिंग म्हणजे हार्डवर्क, मिल्खासिंग म्हणजे डेडिकेशन ही नवी ओळख मेहरा आणि टीमने प्रेक्षकांच्या मनावर ठसवलेली आहे आणि हे करताना त्यांनीही प्रचंड हार्डवर्क केलेलं आहे, त्याला दाद द्यायलाच पाहिजे.

काय कमी काय जास्त?

मिल्खासिंग यांची गोष्ट सांगताना राकेश मेहरानी फ्लॅशबॅक तंत्राचा वापर केलाय. सिनेमा संपल्यावर हीच गोष्ट खटकत राहते. राकेश मेहरा यांनी वापरलेल्या तंत्रावर गेल्या काही वर्षात अनेक सिनेमे येऊन गेलेले आहेत. पण, 'भाग मिल्खा भाग'मध्ये या फ्लॅशबॅकऐवजी सरळ बालपणापासून कथा सादर केली असती तर परिणाम अधिक प्रभावी नक्कीच झाला असता. एवढी एक गोष्ट सोडली तर अख्ख्या सिनेमात त्रुटी काढावी असं काहीच नाही.

धावपटूच्या आयुष्यावरचा सिनेमा म्हणजे धावणं महत्त्वाचं, मग ते प्रशिक्षणादम्यान असेल किंवा रेसिंग ट्रॅकवर असेल. हा भाग अतिशय वास्तव पद्धतीनं दाखवण्यात आलाय. ऑलिम्पिक दर्जाची रेस दाखवण्यासाठी अतिशय छोट्या छोट्या गोष्टींचा बारकाईने विचार झालेला आहे. बिनोद प्रधान यांची लाजवाब सिनेमॅटोग्राफी ही अगदी नजरेत भरणारी आहे. तरीही सिनेमातल्या काही फ्रेम्सवर राकेश मेहरा यांचा खास ठसा आहे. नकुल कामटे यांनी केलेलं साऊंड डिझाईनसुद्धा ठळकपणे लक्षात येणारं आणि सिनेमाचा प्रभाव वाढवणारं झालंय. एकूणच टेक्निकल टीमने सिनेमा उत्कृष्ट बनवण्यासाठी जे जे करता येईल ते सगळं केलंय.

परफॉर्मन्स

दिग्दर्शन, तांत्रिक बाजू, लेखन, जोश निर्माण करणारं शंकर-एहसान-लॉयचं संगीत, यापेक्षाही प्रेक्षकाला गुंतवून ठेवतो फरहान अख्तर... मिल्खासिंग यांचा रोल म्हणजे खरंतर ड्रीमरोल आहे. हे ड्रीम साकारताना फरहानने जी मेहनत केलीये ती थक्क करणारी नक्कीच आहे. मिल्खासिंग यांच्यासारखा लुकच नाही, तर धावणं, ट्रेनिंग, प्रत्यक्ष रेस, पंजाबी ढंगातलं बोलणं हे सगळं फरहानने आत्मसात करण्याचा, मिल्खासिंग यांची भूमिका जगण्याचा पुरेपूर प्रयत्न केलाय. फरहानपेक्षा सरस काम केलंय ते पवन मल्होत्रा यांनी.

पंजाबी बोलणं, सैनिकी दरारा, मिल्खाबद्दलची आपुलकी हे सगळं साकारताना पवन मल्होत्रा यांनी खूपच ग्रेट अभिनय केलाय. फरहानचे कोच झालेले योगराज सिंग यांचा वावरही जबरदस्त आहे. दिव्या दत्तानेही नेहमीच्या सहजतेने फरहानची मोठी बहीण उभी केलीये, पण गरिबीतही तिचा मेकअप खटकत राहतो. पण एकूणच सर्वच कलाकारांनी अतिशय समरसून काम केलंय. छोट्या मिल्खाची भूमिका करणारा लहानगा  कलाकारसुद्धा लक्षात राहतो. एकंदरित, अतिशय मन लावून, प्रचंड मेहनतीने साकारलेला भाग मिल्खा भाग हा सिनेमा पाहायलाच हवा असा आहे. मिल्खासिंग यांनी स्वत: गौरवल्यामुळे सिनेमाला ऑथेन्टीक दर्जाही आहे. राकेश मेहरा, फरहान अख्तर, प्रसून जोशी यांची तपश्चर्या फळाला लागली असंच म्हणावं लागेल.

'भाग मिल्खा भाग'ला रेटिंग - 80

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 13, 2013 01:02 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close