S M L

एक शुद्ध प्रेम कहाणी

Sachin Salve | Updated On: Sep 6, 2013 11:21 PM IST

एक शुद्ध प्रेम कहाणी

अमोल परचुरे,समीक्षक

लव्हस्टोरीमध्ये तर यशराज फिल्म्सचा हातखंडा आहे. 'मोहब्बते' किंवा 'जब तक है जान' असे प्रेमाचे गोड गोड प्रकार असो किंवा प्रेमाचा वेगळा अर्थ सांगणारे 'इशकजादे'सारखे सिनेमे असो. आधुनिक काळातली प्रेमकहाणी मांडताना नव्या दमाच्या, नव्या विचारांच्या लेखक-दिग्दर्शकांनाही प्रोत्साहन देण्याचं काम यशराजकडून होत असतं, आणि त्यामुळेच 'शुद्ध देसी रोमान्स'सारखे सिनेमे आपल्याला बघायला मिळतात. या सिनेमाचा दिग्दर्शक मनीष शर्मा याचा हा तिसरा सिनेमा..यापूर्वी 'बँड बाजा बारात' आणि 'लेडिज वर्सेस रिकी बहल' हे सिनेमे केल्यानंतर पुन्हा एक लव्हस्टोरी त्याने सादर केलीये, पण अधिक सफाईदारपणे... प्रेम की लग्न असा नवा गुंता त्याने उलगडायचा प्रयत्न केलाय. यात प्रेमाचा त्रिकोणही आहे, पहिल्या नजरेतलं प्रेम आहे, बोल्ड प्रेम आहे, प्रेमाची जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न आहे, पण कुठेही फिल्मी प्रेमाचा डोस नाहीये. गायत्री, तारा आणि रघु यांच्यामध्ये सच्चेपणा आहे आणि म्हणूनच हा शुध्द देसी रोमान्स आहे.

काय आहे स्टोरी?

शुध देसी रोमान्सची गोष्ट आहे जयपूरमधली... जयपूर शहराची निवडसुद्धा जाणीवपूर्वक केली असावी. एक असं शहर जे आधुनिक आहे म्हणजे तिथे मॉल्स, मल्टीप्लेक्स आहेत, मोठमोठे रस्ते आहेत, पण तिथला समाज म्हणावा तेवढा आधुनिक नाही. पण अशाच शहरांमधला युवावर्ग नव्या विचारांनी एक्साईट असतो, बंधनांपासून त्याला मुक्त व्हायचं असतं, मनात खूप असतं पण देसी संस्कारांमुळे त्याचा नाईलाजही झालेला असतो. याच वर्गाचं प्रतिनिधित्त्व करणारी गायत्री, रघु आणि तारा हे तिघेजण...

समाजाची कोणतीही बंधनं त्यांना नकोशी झालेली आहेत. मनमुराद जगण्याचा आनंद घ्यायचाय, पण त्याचवेळी मनामध्ये प्रेमाने उडालेली खळबळ त्यांना अस्वस्थही करतेय. आता इथे गोष्ट सांगता येणार नाही कारण ही गोष्ट जेव्हा हळूहळू उलगडत जाते तेव्हाच त्याची गंमत वाढत जाते. यामध्ये ऋषी कपूर यांनी गोयल नावाच्या केटररची भूमिका केलीये, आणि ही भूमिका म्हणजे प्रेक्षकांचा प्रतिनिधीच आहे. हा गोयल सगळी गंमत बघतोय, प्रेक्षकासारखाच तोसुद्धा सुजाण आहे, त्यामुळे काय खिचडी पकतेय ते त्याला बरोबर कळतंय, पण तो मध्ये पडत नाही आणि आपण जणू काही त्याच्या नजरेतून सिनेमा बघतोय असंच वाटत राहतं.

नवीन काय?

सिनेमाची रचना करताना जयपूर शहराचा एखाद्या कॅरेक्टरसारखा विचार झालाय. टायटल्समध्ये दिसणारं जयपूरचं रुप आणि त्यानंतरही मध्येमध्ये दिसणारं जयपूरचं विहंगम दृश्य सिनेमाच्या विषयाचा आवाका किती मोठा आहे हेच सूचित करतं. बरं, रघू, गायत्री आणि तारा मध्येमध्ये प्रेक्षकांशी वेगळा संवाद साधतात, त्यामुळे त्यांच्या मनात नेमकं काय चाललंय याचाही अंदाज येत राहतो.

shuddh desi romance film review1

प्रत्यक्षात मात्र ते वेगळंच वागतात. त्यामुळे त्यांच्या मनातली घालमेलही कळते. महत्त्वाचं म्हणजे लेखक दिग्दर्शक कथा मांडताना कोणतंही स्टेटमेंट करत नाहीत, उलट जमेल तितक्या आणि सिनेमाच्या प्रकृतीला शोभेल अशा रंजक पद्धतीने ते कथा सांगत जातात. कुठेही फिल्मीपणा येणार नाही याचाही त्यांनी प्रयत्न केलेला आहे, त्यामुळे सिनेमात सच्चेपणा, शुध्दपणा दिसत राहतो.

परफॉर्मन्स

सर्व कलाकारांनी एकदम शुद्ध अभिनय केलेला आहे. सुशांतसिंग राजपूत, परिणिती चोप्रा आणि वाणी कपूर या तिघांनीही एकदम टॉप काम केलंय. या तिघांमध्ये परिणिती थोडी सिनिअर म्हणायला पाहिजे, पण म्हणून कथेमध्ये तिला स्पेशल ट्रीटमेंट वगैरे असं काही नाहीये. परिणिती असो किंवा नवोदित वाणी कपूर या दोघींनीही देसी आधुनिक मुलगी एकदम ठसक्यात उभी केलीये. नव्या जमान्याचा कॉन्फिडन्स त्यांनी अगदी सहज दाखवलाय. या दोन मुलींच्या प्रेमात गुरफटलेला रघू सुशांत सिंगने अप्रतिम साकारलाय. 'पवित्र रिश्ता'मधला मानव त्याने केव्हाच मागे सोडलाय.

Shuddh Desi Romance-box image_5000

रडवेल्या चेहर्‍याचा मानव ते कन्फ्युज रघू व्हाया 'कै पो चे' हा सुशांतसिंगचा प्रवास खरंच डोळ्यात भरणारा आहे. रघूचं कन्फ्युजन बर्‍याच ठिकाणी क्यूटही वाटतं ते फक्त सुशांतच्या एक्स्प्रेशनमुळे...ज्यांना सुशांतसिंग आवडत नाहीत तेसुद्धा त्याचे फॅन बनतील एवढं सुंदर काम त्याने केलंय. बाकी ऋषी कपूर यांच्याबद्दल काय बोलणार...केटरिंग बिझनेसचे बारकावे त्यांनी आपल्या अभिनयातूनही दाखवलेत आणि त्यात राजस्थानी रंगढंगही भरलेत.. एकंदरित, सगळ्याच बाबतीत जमून आलेला हा सिनेमा थोडा बोल्ड असल्यामुळे काही प्रेक्षकांना जड जाऊ शकतो, पण आजच्या पिढीच्या प्रेमाचं वास्तव हा सिनेमा ठसठशीतपणे समोर ठेवतो एवढं नक्की..

रेटिंग : शुद्ध देसी रोमान्स - 75

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 6, 2013 11:09 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close