S M L

फिल्म रिव्ह्यु : ग्रँड मस्ती

Sachin Salve | Updated On: Sep 14, 2013 06:46 PM IST

फिल्म रिव्ह्यु : ग्रँड मस्ती

अमोल परचुरे, समीक्षक

'बेटा', 'दिल' असे सिनेमे केल्यानंतर 'इश्क'सारख्या सिनेमांपासूनच इंद्रकुमार यांनी ट्रॅक बदलला होता. कौटुंबिक तरीही मसाला सिनेमांची वाट सोडून त्यांनी तद्दन व्यावसायिक सिनेमे बनवायला सुरुवात केली. त्यानंतरचा टप्पा होता ऍडल्ट कॉमेडीचा...नऊ वर्षांपूर्वी 'मस्ती' हा सिनेमा आला आणि त्याने चांगलं व्यावसायिक यशही मिळवलं. त्यानंतर 'प्यारेमोहन', 'धमाल' सारख्या सिनेमांना 'मस्ती'एवढं यश मिळालं नाही म्हणून त्यांनी पुन्हा 'मस्ती'चा घाट घातलाय.

 

बरं, यावेळी नाव ठेवलं 'ग्रँड मस्ती'. नावातूनच त्यांनी सूचकपणे सिनेमात नेमकं काय असणार याची कल्पना दिलीच आहे. पण विवेक ओबेरॉय, रितेश देशमुख आणि आफताब हे मस्तीपेक्षाही ग्रँड संकटात अडकणार असं वाटलं होतं, प्रत्यक्षात कथा-पटकथेला फाटा देऊन सतत कमी कपड्यातल्या, त्यातही बर्‍याचदा बिकीनीतल्या मुलींचे देह दाखवणे, ऍडल्ट कॉमेडीच्या नावाखाली सतत वाह्यात विनोदांची पेरणी करणे, असेच प्रकार या ग्रँड मस्तीमध्ये आहेत.

काय आहे स्टोरी?

ऍडल्ट कॉमेडी म्हणजे सतत ऍडल्ट जोक्स करत राहणे असा एक खूप मोठा गैरसमज लेखक दिग्दर्शकाचा झालेला आहे. म्हणजे पहिल्या मस्तीमध्ये तीन मित्रांची एक कथा होती... लारा दत्ताच्या मोहजालात अडकून मग ते पुढे कसे संकटात सापडत जातात, अजय देवगणपासून कसे स्वत:ला वाचवत असतात अशी सगळी गंमत होती...'ग्रँड मस्ती'मध्ये कथा केवळ नावाला आहे.

 

ऍडल्ट जोक्स, तिघांच्या सतत वखवलेल्या नजरा, एकामागोमाग घडणारे ओंगळवाणे प्रसंग, वाक्यावाक्यात डबलमिनिंग शब्द, गरज नसताना घुसडलेली गाणी आणि मग यामध्ये कुठेतरी मध्येमध्ये कथा दिसत राहते. या सिनेमात घडत काहीच नाही, उलट स्वस्त मनोरंजन करण्याच्या उद्देशाने नुसते एकामागोमाग एक प्रसंग टाकण्यात आलेत. हा सिनेमा अश्लील नाही तर त्याहीपुढचा आहे, म्हणजे दादा कोंडकेंनीसुद्धा हा सिनेमा बघून लाजेनं मान खाली घातली असती एवढी ही 'ग्रँडमस्ती' लाजिरवाणी आहे.

 

grand masti film review 34

नवीन काय?

रितेश आणि सोनाली कुलकर्णीची जोडी हा मराठी प्रेक्षकांसाठी उत्सुकतेचा विषय असू शकतो. पण सिनेमात एवढ्या मुली आहेत. त्यामुळे सोनाली आणि मंजिरी फडणीसला तसा फारसा वाव नाहीये. पण जे काही सीन्स पदरात पडलेत ते त्यांनी मनापासून केलेत. बाकी सिनेमात महत्त्वाचे आहेत तीन तरुण, जे कामातूर आहेत आणि त्यातला एक आपला लातूरचा रितेशही आहे.

 

अर्थात, विवेक, आफताब आणि रितेशसुद्धा कॉलेजयुवक अजिबात वाटत नाहीत पण अशा असंख्य अतर्क्य गोष्टी सिनेमात असल्यामुळे त्यांचं वय आणि दिसणं हे महत्त्वाचं राहत नाही. लॉजिक सोडून, लाज सोडून हा सिनेमा तयार करण्यात आलेला आहे. आणि दुदैर्वाने पहिल्या दिवसाचं कलेक्शन बघून असं दिसतंय की 'चेन्नई एक्स्प्रेस'नंतरचा हा सुपरहिट सिनेमा ठरणार आहे.

रेटिंग : ग्रँड मस्ती - 20

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 14, 2013 06:46 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close