S M L

खुसखुशीत 'नारबाची वाडी'

Sachin Salve | Updated On: Sep 20, 2013 11:38 PM IST

खुसखुशीत 'नारबाची वाडी'

अमोल परचुरे, समीक्षक

'नारबाची वाडी' हा सिनेमा 'सज्जनो बागान' या बंगाली नाटकावर आधारित आहे. साहित्यकृतींवर आधारित सिनेमे होत असतानाच दुसर्‍या भाषेतील नाटकावर सिनेमा करणं हेसुद्धा मोठं आव्हानच म्हटलं पाहिजे. कथेचा गाभा कायम ठेवून पूर्ण मराठी वातावरणातली कलाकृती तयार करणं यात लेखकाचा वाटा नक्कीच मोठा आहे. गुरु ठाकूर यांनी पटकथा आणि संवाद लिहिताना हे आव्हान यशस्वीपणे पेललेलं आहे असं नक्कीच म्हणता येईल.

narbachi wadi

कोकणातल्या माणसाची फणसासारखी वृत्ती म्हणजे 'वरुन कडक पण आतून गोड' ही या सिनेमात पुरेपूर उतरलेली आहे. नारबाची वाडी बघताना त्यामुळेच 'मालगुडी डेज'ची आठवण होते. म्हणजे 'मालगुडी डेज'चा काळ वेगळा, माहौल वेगळा पण तरीही त्यातली कॅरेक्टर्स आपलीशी वाटतात आणि आपण त्यात रंगून जातो, अगदी तसाच अनुभव नारबाची वाडी हा सिनेमा आपल्याला देतो. यातली लोकेशन्स अस्सल आहेत, अभिनय अव्वल आहे, गाणी आणि संवादसुद्धा लक्षात राहतील असे आहेत आणि त्यामुळेच नारबाची वाडी हा सिनेमा म्हणजेच आहे निखळ मनोरंजन...

काय आहे स्टोरी?

नारबाची वाडी सिनेमाचा काळ आहे साधारण तीस वर्षांचा, 1946 ते 1976 पर्यंतचा...रंगराव खोत आणि मग त्याचा मुलगा मल्हार खोत यांची नजर नारबाच्या वाडीवर असते. वाडवडिलांची ही जमीन नारबासाठी (दिलीप प्रभावळकर) खूप महत्त्वाचं असतं. पण नारबाचा नातू हा काही कामधंदा करत नसल्यामुळे भविष्याबद्दलही नारबा तसा मनातून घाबरलेला असतो.

narbachi wadi2

अशातच खोताचा मुलगा मल्हार नव्याने वाडी मिळवण्यासाठी खटपटी करायला लागतो आणि मग नारबा विरुद्ध खोत हा रंगतदार सामना आपल्याला बघायला मिळतो. कोणाच्या मरणावर टपून बसणं ही म्हटलं तर क्रूर वाटावी अशी गोष्ट, नारबाला तर एकदा आपल्याच मरणासाठी सुरु असलेला होम ही दिसतो, पण यातून ट्रॅजेडी निर्माण करण्यापेक्षा इथे ब्लॅक कॉमेडीचा चांगला वापर केलेला आहे. अर्थात, निव्वळ कॉमेडीसाठी आलेल्या डॉक्टरचा सीन खटकतो, पण असे काही अपवाद वगळले तर निर्मळ विनोदी सिनेमाचा आनंद ही 'नारबाची वाडी' नक्कीच देते.

नवीन काय आणि परफॉर्मन्स?

उलाढाल, सतरंगी रे नंतर एकदम वेगळ्या बाजाचा सिनेमा बनवताना दिग्दर्शक आदित्य सरपोतदार याने उत्तम कलाकारांची फौजच उभी केलीये. खोताची भूमिका करणारे मनोज जोशी, खोताचा उजवा हात बेरक्या म्हणजे निखिल रत्नपारखी, खोताची बायको किशोरी शहाणे, ज्योतिषी अतुल परचुरे, नारबाचा नातू विकास कदम, त्याची बायको ज्योती मालशे, चोराच्या भूमिकेत सुहास शिरसाट, असे सगळेच एकापेक्षा एक कलाकार सिनेमात आहेत. मनोज जोशी यांनी इतक्या वर्षांत एवढ्या मोठ्या लांबीची भूमिका पहिल्यांदाच केली असावी, उलट्या काळजाचा कंजूष खोत करताना त्यांनी व्हिलनचे सगळे रंग त्यात पुरेपूर भरलेत. यात निखिल रत्नपारखीची उत्तम आणि एकदम बेरकी साथ मिळाली आहे. अतुल परचुरेने भूमिका छोटी असली तरी बोलण्यातला कर्नाटकी ढंग मस्त पकडलाय.

narbachi wadi3

अर्थात, या सगळ्यामध्ये अव्वल आहेत नारबाच्या भूमिकेतील दिलीप प्रभावळकर...'टिपरे', 'हसवाफसवी', 'वा गुरु' अशा वेगवेगळ्या कलाकृतींमध्ये अनेकदा त्यांनी म्हातारी भूमिका केलेली आहे. पण त्या सगळ्याहून वेगळा वाटेल असा नारबा त्यांनी रंगवलाय. वयाची साठी ते नव्वदी हा पडद्यावरील नारबाचा प्रवास आहे. प्रत्येक टप्प्यावर वय वाढताना जे बारकावे गरजेचे आहेत ते सगळे त्यांनी अचूक दाखवलेत. म्हणजे इतर सगळं आहेच पण फक्त दिलीप प्रभावळकरांसाठी नारबाची वाडी बघायलाच पाहिजे असंही सांगता येईल..

रेटिंग : नारबाची वाडी - 75

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 20, 2013 11:26 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close