S M L

बेशरम -अभिनव कश्यपचा फुसका बार !

Sachin Salve | Updated On: Oct 4, 2013 10:17 PM IST

बेशरम -अभिनव कश्यपचा फुसका बार !

अमोल परचुरे, समीक्षक

बेशरम...सलमानबरोबर 'दबंगगिरी' करुन अभिनव कश्यप या दिग्दर्शकानं बेशरम सिनेमाचा घाट घातला. सध्याचा सुपरस्टार रणबीर कपूर त्याला हिरो म्हणून मिळाला आणि त्यात ऋषी कपूर आणि नीतूसिंग यांची भर पडली. हे तिघे पहिल्यांदा मोठ्या पडद्यावर एकत्र दिसणार म्हणूनच खरंतर 'बेशरम'बद्दल उत्सुकता होती, पण सिनेमा बघून 'नाव मोठं, लक्षण खोटं' या म्हणीचा प्रत्यय आला. दोन्ही 'दबंग' सिनेमे हे केवळ सलमान खानमुळेच चालले हे अभिनव कश्यपने बेशरममधून सिद्धच करुन टाकलं. रणबीरची लोकप्रियता कितीही जास्त असली तरी दबंगसारखा या सिनेमाला प्रेक्षकांचा पाठिंबा मिळेल असं वाटत नाही. रणबीरने कमावलेली लोकप्रियता ही रॉकस्टार, बर्फी अशा सिनेमातून आलेली आहे. या प्रेक्षकवर्गाला तर बेशरम बिल्कुलच आवडणार नाही. बेशरममध्ये आशय नाही, विषय नाही, लेखक दिग्दर्शकाला जसं वाटेल तसा सिनेमा पुढे पुढे सरकत राहतो आणि आपण जांभया देत राहतो.

काय आहे स्टोरी?

बेशरमची गोष्ट सांगायला पण खरंतर शरम वाटतेय, कारण सांगणार काय असाच प्रश्न आहे. रणबीर कपूर हा गाड्या चोरत असतो, त्याच्या मित्राच्या रोलमध्ये आहे अमितोष..ज्या अनाथालयात ते मोठे झाले, तिथल्या मुलांसाठी आणि त्यांच्या भविष्यासाठी ते चोरी करत असतात. म्हणजे अभिनवला वाटलं असणार की, यामुळे रणबीरच्या चोरीला प्रेक्षक माफ करतील. असं प्रेक्षकांना अनेक ठिकाणी गृहित धरुन स्वत:ला वाटेल तसा सिनेमा बनवण्यात आलाय.

 

मग यात व्हिलन आहे जावेद जाफरी..त्याच्यासाठी गाड्या चोरायचं काम रणबीर करतोय, मग एकदा तो हिरॉईनचीच गाडी चोरतो. बरं, एका सामान्य वस्तीत राहणार्‍या हिरॉईनकडे मर्सिडीज असते हां..आणि ती चोरीला जाते. मग ती मिळवण्यासाठी हिरोची परत धडपड आणि या धडपडीत पोलीस नवरा-बायको चुलबुल चौटाला आणि बुलबुल चौटाला यांचं नाक खुपसणं. एकूण काय, सिनेमात फारसं काही घडतच नाही. सिनेमा आपलं मनोरंजन करतो ते शेवटच्या पंधरा मिनिटांत...ऋषी कपूरच्या अंगात सनी देओल संचारल्यानंतर क्लायमॅक्सला तो जी फायटिंग करतो ती फुल्ल टू धमाकेदार आहे. पण ही धमाल बघायला आधीचा दोन तासाचा सिनेमा सहन करायची तयारी ठेवावी लागेल.

 

besharam11

काय कमी,काय जास्त?

रणबीर कपूरने हा सिनेमा का केला असावा हाच प्रश्न सतत मनात येतो. सलमान खान किंवा अक्षय कुमार स्टाईल डायलॉगबाजी करताना तो फसलाय, बरं, कोरिओग्राफी अगदीच सुनील शेट्टीच्या जमान्यातली असल्यामुळे त्यातही काही दम नाही. सिनेमॅटोग्राफरने रणबीरला फार सुंदर प्रेझेंट केलंय असंही नाही. केवळ आई-वडील सिनेमात आहेत म्हणून रणबीरने हा सिनेमा साईन केला असेल हे पटत नाही. ऋषी कपूर आणि नीतू सिंगबरोबर त्याचे काही सीन्स मजा आणतात, पण या दोघांना सिनेमात खूपच कमी काम असल्यामुळे सतत या दोघे स्क्रीनवर यायची आपण वाट बघत बसतो. रणबीरने पँटमध्ये मोज्यांचं पॅडिंग करणं, स्वत:चे छातीचे केस बघून खुश होणं असे असंख्य अनावश्यक सीन्स यात आहेत. रणबीर हा कसा बेशरम आहे हे ठसवण्यासाठी मध्येमध्ये हे प्रसंग येत राहतात. बरं, एवढं करुन रणबीरचं कॅरेक्टर स्मार्ट आहे, की घाबरट आहे की विनोदी आहे हे काहीच कळत नाही.

 

besharam7

शेवटी एवढंच..

बेशरममधली आणखी एक डोकेदुखी म्हणजे यातली गाणी. सिनेमात सरासरी दहा मिनिटाला एक गाणं आहे आणि अर्थातच ही गाणी उगाच आहेत. अभिजीत आणि बेला शेंडेने गायलेलं गाणं चांगलं आहे, पण बाकीची गाणी अक्षरश: घुसडण्यात आली आहेत. बेशरम हा एक असा सिनेमा आहे ज्यातल्या वाईट गोष्टी सांगायला अर्धा तासही पुरणार नाही आणि चांगल्या गोष्टी अगदी काही सेकंदांत सांगता येतील. बेशरम हा सिनेमा म्हणजे रणबीर आणि प्रेक्षकांचं दुदैर्व आहे. फक्त एक सुपरस्टार असला की, सिनेमा हिट होतो हा समज खरा ठरणार की खोटा हे आता बेशरमच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनवरुनच कळू शकेल.

रेटिंग : बेशरम -20

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 4, 2013 10:17 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close