S M L

फिल्म रिव्ह्यु : बॉस !

Sachin Salve | Updated On: Oct 18, 2013 11:31 PM IST

फिल्म रिव्ह्यु : बॉस !

अमोल परचुरे, समीक्षक

बुधवारी बकर ईदच्या मुहूर्तावर रिलीज झालेल्या 'बॉस' हा सिनेमा...या सिनेमात अक्षय कुमार आहे आणि प्रोमोवरुन ही एक टिपिकल मसाला फिल्म असणार हे लक्षात आलं असेलच. सगळ्या प्रकारचा मसाला ठासून भरलेला हा सिनेमा. अशा सिनेमांबद्दल फार खोलात जाऊन विचार करायचा नसतो, कारण लोकप्रियतेच्या लाटेवर स्वार झालेले हे सिनेमे कसेही असले तरी प्रचंड बिझनेस वगैरे करतात. बॉस हा 'पोक्किरी राजा' या मल्याळम सिनेमाचा रिमेक आहे.

काय आहे स्टोरी ?

रावडी राठोडसारख्या सिनेमात दिसला होता तसाच अक्षयकुमार या बॉसमध्येही दिसतो, फक्त इथं तो थोड्या हरियाणवी ढंगात बोलतो एवढंच... मुळात अक्षयची एंट्रीच अर्ध्या तासानंतर होते. तोपर्यंत शिव पंडित आणि आदितीचं प्रेमप्रकरण, रोनित रॉय आणि गोविंद नामदेवची व्हिलनगिरी असं बरंच काय काय सहन करावं लागतं. अक्षय कुमारची एंट्री झाल्यानंतर कथेशी संबंध नसलेला असा उगाच एक फाईट सिक्वेन्स आहे आणि मग त्यानंतर टायटल्स दिसायला लागतात.

सिनेमाचं वेगळेपण का काय म्हणतात ते फक्त यातच दिसतं. बाकी मग पुढे सिनेमा सुरु राहतो, अक्षय कुमार मारधाड करत राहतो, मनाने बिछडलेल्या बापावर इंप्रेशन पाडत राहतो, छोट्या भावाला वाचवत राहतो, रोनित रॉय आणि गोविंद नामदेव या जोडगोळीचे डाव हाणून पाडतो आणि आपण हे सगळं आधी कुठे पाहिलं होतं हे आठवत राहतो. आपल्या हातात दुसरं काही नसतंच म्हणा...काही वर्षांपूर्वी अशा सिनेमांना पिटातल्या प्रेक्षकांचा सिनेमा असं म्हटलं जायचं पण आता हेच सिनेमे 100 आणि 200 कोटी रुपयांचा बिझनेस करतात. आता हा काळाचा महिमा की बॉसचा महिमा हे तर आता तुम्हा प्रेक्षकांनाच माहित असावं.

स्टारकास्टची गर्दी

हा 'पोक्किरी राजा' या मल्याळम सिनेमाचा रिमेक असून मूळ सिनेमात मामुट्टी, पृथ्वीराज आणि शि्रया सरन होते. बॉसमध्ये आहेत अक्षय कुमार, शिव पंडित आणि आदिती राव हैदरी..पण याशिवायही सिनेमात खूप काही आहे. डॅनी, मिथुन चक्रवर्ती, रोनित रॉय, गोविंद नामदेव अगदी जॉनी लिव्हरही आहे. हे सगळे कमी म्हणून की काय सोनाक्षी सिन्हा आणि प्रभुदेवासुद्धा एका गाण्यात थिरकून जातात. अतर्क्य आणि उगाच इमोशनल गोष्टींनी भरलेला हा बॉस दिग्दर्शित केलाय अँथनी डिसोझाने, ज्याने यापूर्वी 'ब्ल्यू' सारखा सिनेमा बनवला होता. अर्थातच त्यामुळे दिग्दर्शनाकडूनही फारशा अपेक्षा ठेवण्याची गरज नाही. सिनेमा एंजॉय करण्याचे जे लोकप्रिय फंडे आहेत त्यात बसणारा एक तद्दन व्यावसायिक सिनेमा एवढंच या बॉसबद्दल बोलता येईल.

रेटिंग : बॉस -50

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 18, 2013 11:31 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close