S M L

'मंगलाष्टक वन्स मोअर'-एका लग्नाची वेगळी गोष्ट !

Sachin Salve | Updated On: Nov 22, 2013 11:21 PM IST

'मंगलाष्टक वन्स मोअर'-एका लग्नाची वेगळी गोष्ट !

अमोल परचुरे,समीक्षक

'मंगलाष्टक वन्स मोअर' या सिनेमाबद्दल सांगायचं ठरलं तर हा एक श्रीमंत सिनेमा आहे. यामध्ये गाण्यांची श्रीमंती आहे, दृश्यात्मक श्रीमंती आहे, अभिनयाची श्रीमंती आहे, मांडणीत श्रीमंती आहे. आता श्रीमंतीचा अर्थ इथे भव्य असा नाहीये, पण कलाकृतीचा परिपूर्ण आनंद देण्याचा प्रयत्न या सिनेमातून नक्कीच झालाय, त्या अर्थाने सगळ्याच डिपार्टमेंटनी श्रीमंत निर्मिती मूल्यांसाठी मनापासून प्रयत्न केल्याचं जाणवतं. आता या गेल्या वर्षभरातच मराठी सिनेमांमधून आपण प्रेमाचे, लग्नानंतरच्या प्रेमाचे अनेक पैलू, अनेक प्रकार पाहिलेले आहेत. तसं तर मराठी सिनेमांसाठी हे वर्षच प्रेमाने भारलेलं होतं. आता त्याच प्रकारातला आणखी एक प्रेमळ सिनेमा असं 'मंगलाष्टक वन्स मोअर'बद्दल नाही म्हणता येणार, कारण ही आहे एका लग्नाची वेगळी गोष्ट...सिनेमात प्रेम आहे, नाट्य आहे, रोमान्स आहे, नातेसंबंधांमधला तणावही आहे. या नाट्याची मांडणी हळुवार आहे, पण ते नाट्य फुलवण्यात, खास करुन इंटरव्हलनंतरच्या भागात थोडं अपयश आलेलं आहे. एक मात्र नक्की, लग्नानंतरच्या प्रेमाची, तणावाची गोष्ट असली तरी ती टिपिकल नक्कीच नाहीये, उलट लग्नानंतरचं प्रेम, जबाबदारी, एकमेकांबद्दलची काळजी, करिअरचं टेन्शन अशा सगळ्या गोष्टींभोवती फिरणारं नाट्य यामध्ये बघायला मिळतं.

काय आहे स्टोरी ?

mangalashtak once more2

सिनेमाची कथा इथं सांगता येणार नाही कारण ती उलगडताना पडद्यावर पाहणं यामध्ये गंमत आहे. थोडक्यात एवढंच की, लग्नाला पाच वर्ष झालेली आहेत, अशावेळी अतिप्रेमामुळे किंवा अतिकाळजीमुळेसुद्धा नात्यात दरी निर्माण होऊ शकते. तणाव एवढे वाढतात की नवरा-बायको अगदी टोकाचे निर्णयही घेऊ शकतात. नोकरीत असलेल्या टेन्शनमुळे घरात आणि आयुष्यात आपली एक स्पेस शोधत असलेला नवरा आणि गृहिणी असल्यामुळे नवरा हेच सर्वस्व असलेली बायको, राहायला आलिशान फ्लॅट आहे, भरपूर पगार आहे, सगळं व्यवस्थित सुरु आहे, पण तरी कुठेतरी काहीतरी बिनसलंय. मुंबई-पुण्यातलं सॉफ्टवेअर आयुष्य किंवा मोठमोठ्या कंपन्यांमध्ये सेल्स-मार्केटिंगच्या जाळयात अडकलेलंी कुटुंबं असंख्य आहेत, आणि त्यांची दु:खं साधारण एकसारखीच आहेत. आधुनिक जमान्यातीलं हे नात्यांचं दुखणं लेखक दिग्दर्शक समीर जोशीने खूपच परिपक्वतेने मांडलेला आहे. इंटरव्हलनंतरच्या भागात मोडलेलं घर पुन्हा सावरण्याचा भाग मात्र काहीशा नेहमीच्या मार्गानेच गेलाय, असं जरी असलं तरी पहिल्या भागात जे घडतं त्याचा प्रभाव सिनेमा संपल्यानंतरही मनात राहतो हे महत्त्वाचं.

नवीन काय ?

mangal 4

सिनेमाचा लूक खूपच आकर्षक आहे, फ्रेश आहे. संजय जाधव यांच्या सिनेमॅटोग्राफीची गंमत या सिनेमात पुन्हा अनुभवायला मिळेल. खरंतर, 80 टक्के सिनेमा हा इनडोअर आहे म्हणजे फ्लॅट, ऑफिस अशा ठिकाणी शूट झालेला, पण तसा तो जाणवत नाही यात दिग्दर्शक आणि कॅमेरामनचं कसब आहे. निलेश मोहरीरचं संगीत ही आणखी एक सिनेमाची खासियत. सुमधूर, श्रवणीय अशी जी काही विशेषणं आहेत ती सगळी या गाण्यांना लावता येतील. गुरु ठाकूरचे शब्द, कसलेल्या गायकांचा आवाज आणि संगीताचा साज सगळी सरगम मस्तपैकी जुळून आलेली आहे, त्यामुळे आपोआपच वन्समोअर मिळवणारी गाणी झालेली आहेत. एकाही गाण्याला लिपसिंक नाही, याचं श्रेय पुन्हा दिग्दर्शकाला द्यायला हवं. कॉश्च्युममध्ये मात्र आणखी वेगळा विचार करण्याची गरज होती हे जाणवत राहतं. उदाहरणार्थ, मुक्ता बर्वे गृहिणी अवतारात असताना तिचे कॉश्च्युम्स अगदीच न पटणारे आहेत. अर्थात, मुक्ता बर्वेच्या अभिनयाने ही तूट नक्कीच भरुन निघालेली आहे.

परफॉर्मन्स

मुक्ता बर्वे आणि स्वप्निल जोशी यांच्या अदाकारीसाठी हा सिनेमा एकदा तरी पाहायलाच हवा. आत्तापर्यंत साधारण बंडखोर, स्वतंत्र विचारांची अशाच रोलमध्ये मुक्ताला आपण पाहिलेलं आहे, पण या सिनेमात आरतीची व्यक्तिरेखा म्हणजे ती स्वत:चं अस्तित्वच विसरुन गेलेय, तिच्यासाठी तिचा नवरा म्हणजेच सर्वस्व आहे. पूर्वार्धात काहीशी गोंधळलेली, थोडी धांदरट, सारखा नवर्‍याचाच विचार करणारी, धक्क्यातून सावरताना हळूहळू स्वतंत्र अस्त्तित्वाचा शोध घेणारी अशी आरती साकारताना मुक्ताने कमालच केलीये. स्वप्निल जोशीने सत्यजित साकारतानासुद्धा चांगलीच मेहनत घेतलीये. स्वप्निलचा हा आत्तापर्यंतच्या करिअरमधला एकदम कसदार अभिनय असं म्हटलं तरी चालेल. एवढे इन्टेन्स सीन्स एकाच सिनेमात एवढ्या नजाकतीने साकारणं यात खरंच दोघांनीही कमालच केलेली आहे. या दोघांना उत्तम साथ मिळालीये ती कादंबरी कदम आणि सई ताम्हणकर यांची. खरंतर, सईच्या वाट्याला आलेल्या रोलमध्ये नावीन्य फारसं नाहीये, पण कादंबरीने साकारलेली रेवाची जी भूमिका आहे त्याला बरेच अँगल्स आहेत. आपल्या मावसबहिणीला सावरणारी, तिला सावध करणारी, तिला स्वत:च्या पायावर उभी राहण्यासाठी बळ देणारी अशी रेवा कादंबरीने खूप समंजसपणे साकारलीये. एकंदरित, कथा-पटकथेत थोडा फसला असला तरी सिनेमा बघण्याची कारणं बरीच आहेत.

रेटिंग : 70

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 22, 2013 11:21 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close