S M L

फिल्म रिव्ह्यु : बुलेट राजा !

Sachin Salve | Updated On: Nov 29, 2013 10:53 PM IST

फिल्म रिव्ह्यु : बुलेट राजा !

अमोल परचुरे, समीक्षक

'एजंट विनोद' नंतर सैफ अली खानची सिंगल हिरो ऍक्शन फिल्म, दिग्दर्शक तिग्मांशु धुलिया असं कॉम्बिनेशन असल्यामुळे सिनेमाची चर्चा जोरदार होती आणि सिनेमाबद्दल ऍक्शन फॅन्सना अपेक्षाही होत्या, प्रत्यक्षात या बुलेट राजाने सगळ्यांचाच अपेक्षाभंग केलेला आहे. एकदम बोरिंग आणि लगेच विसरुन जावी असाच हा 'बुलेट राजा' आहे. 'पानसिंग तोमर' आणि 'साहब,बिवी और गँगस्टर' सारखे सिनेमे देणार्‍या तिग्मांशु धुलियाचा हा सिनेमा आहे यावर विश्वासच बसत नाही. उत्तर प्रदेशसारख्या राज्यातलं राजकारण, राजकारणासाठी गुंडांचा वापर ही गोष्ट आत्तापर्यंत अनेक सिनेमांमध्ये येऊन गेलेली. अगदी ओंकारापासून प्रकाश झाच्या सिनेमांपर्यंत हा विषय वेगवेगळ्या पद्धतीने आलेला आहे. त्यापेक्षा वेगळं किंवा नवं किंवा वास्तवाच्या जवळ जाणारं असं यात काहीच नाहीये. नायकाची प्रतिमा 'लार्जर दॅन लाईफ' करण्याच्या प्रयत्नात कथा हातातून पूर्णपणे निसटून गेलेली आहे, आणि त्यामुळेच सिनेमातला ऍक्शनचा धमाका कंटाळत आणि जांभया देत बघत बसायला लागतो.

काय आहे स्टोरी ?

यातला सिनेमाचा नायक बुलेट राजा म्हणजेच राजा मिश्रा(सैफ अली खान), त्याचा उच्चार तो सतत मिसरा असा करतो, तर त्याच्याकडे नोकरी नाही, तो अगदीच कॉमन मॅन वगैरे आहे परिस्थितीमुळे तो गुन्हेगारीकडे ओढला जातो. आता तो नायक असल्यामुळे नुसताच एक साधा गुन्हेगार बनत नाही तर थेट रामबाबू या ताकदवान राजकारण्याचा बाहुबली बनतो. त्याच्यासोबत असतो त्याचा मित्र रुद्र त्रिपाठी म्हणजे जिमी शेरगिल...राजा आणि रुद्र यांची दहशत अख्ख्या उत्तर प्रदेशात पसरत असते. मग आता स्टोरीला पुढे नेण्यासाठी ते एका उद्योगपतीचं अपहरण करतात आणि इथून मग सूडाचा खेळ सुरु होतो. मग रवी किशन आणि गुलशन ग्रोव्हर विरुद्ध सैफ अली खान, मग कधी राज बब्बर विरुद्ध सैफ अली खान असा सगळे एकमेकांशी राजकारण खेळत राहतात. यात मग मध्येच सैफ आणि सोनाक्षीची लव्हस्टेारी सुरु असते. या सगळ्यातून स्वत:चा बचाव करायला सैफ आणि सोनाक्षी कधी मुंबईला जातात तर कधी कोलकात्त्याची सैर करत असतात. मग सैफला टक्कर द्यायला विद्युत जमवालही सिनेमात येतो. असे बरेच जण येतात-जातात आणि सिनेमा कसाबसा संपतो.

नवीन काय ?

bullet raja film review 2

सिनेमाचं नाव बुलेट राजा असलं तरी यात सैफ अली खान त्याच्या रॉयल एनफिल्डवर बसून काही विशेष करत नाही, आणि त्याच्या रिव्हॉल्वरमधून सुटणार्‍या बुलेट्समध्ये सुद्धा फारसा धमाका दिसत नाही. तिग्मांशु धुलियाच्या सिनेमात नेहमी असणारे एका ओळीचे चटपटीत डायलॉग्ज या बुलेटराजाच्याही तोंडी आहेत, पण त्यातही फार जोर नाहीये. एक कमर्शिअल, मास अपिलिंग असा सिनेमा बनवण्याचा प्रयत्न तिग्मांशु धुलियाने केलाय, पण सिनेमा बघितल्यावर हा तिग्मांशुचा सिनेमाच वाटत नाही. अशा सिनेमांमध्ये एडिटिंगचं जे महत्त्व असतं तेही जाणवत नाही. विद्युत जमवालचे फाईट सिक्वेन्स हेच त्यातल्या त्यात चांगले जमलेले आहेत. साजिद-वाजिदच्या गाण्यांमध्ये सुद्धा फारसा दम नाहीये. एकूणच, तांत्रिक बाबतीतही सिनेमा आजचा वाटत नाही.

परफॉर्मन्स

bullet raja film review 45

सोनाक्षी सिन्हाला या सिनेमात तसं काहीच काम नाहीये. लुटेरासारख्या सिनेमांनंतर तिच्याकडून चांगल्या रोल्सची अपेक्षा होती, पण बुलेट राजामध्ये ती मध्येच येते आणि केवळ हिरॉईन असल्याचं काम उरकते असाच फील येतो. तिग्मांशुचा सिनेमा आहे म्हणून जिमी शेरगिल आहे, त्याने रुद्र त्रिपाठी साकारलाय सुद्धा चांगला...माही गिलला तर अगदीच आयटम साँग पुरतं वापरलंय. बुलेट राजा म्हणून सैफ अली खानचा जो दरारा, जो करिष्मा असायला हवा होता तो कुठेच जाणवत नाही. बाकी चंकी पांडे, गुलशन ग्रोव्हर, शरत सक्सेना, रवी किशन, राज बब्बर, बिपीन मिश्रा अशी बरीच गर्दी सिनेमात आहे, पण या सगळयांना सांभाळणं हेच लेखक आणि दिग्दर्शकाला जमलेलं नाही.एकंदरित, नाव मोठं आणि लक्षण खोटं असाच प्रकार बुलेट राजा बाबतीत झालेला आहे.

'बुलेट राजा'ला रेटिंग- 40

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 29, 2013 10:53 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close