S M L

फिल्म रिव्ह्यु »सलमान की 'जय हो'

Sachin Salve | Updated On: Jan 24, 2014 09:29 PM IST

फिल्म रिव्ह्यु »सलमान की 'जय हो'

अमोल परचुरे, समीक्षक

'जय हो' हा अर्थातच असा सिनेमा आहे ज्याची समीक्षा वगैरे करण्यात काही अर्थ नसतो. जय हो सारखा सिनेमा बघण्यासाठी प्रेक्षक समीक्षेची वाट कधीच बघत नाहीत आणि त्यामुळेच असे सिनेमे सुपरडुपर हिट होतात. सिनेमात काय काय आहे यापेक्षा सिनेमात अभिनेता सलमान खान आहे हेच महत्त्वाचं..सलमान खान, बॉलीवूडचं चलनी नाणं..सिनेमा रिलीज व्हायची खोटी, प्रेक्षक रांगा लावून त्याचा सिनेमा बघणार हे ठरलेलं. 'जय हो' या सिनेमापासून मात्र आता सलमान खान ही इमेज लोकप्रियतेच्याही पलीकडे जाणार असं दिसतंय. जे रजनीकांतचं झालं तेच आता सलमान खानबद्दल होणार असं वाटायला लागलंय. ज्याप्रकारे सलमानला 'जय हो' मध्ये सादर केलंय ते बघून तरी तसंच दिसतंय. सलमान खान म्हणजे आता 'चुलबुल पांडे' राहिलेला नाही. मुळात आता त्याच्या कॅरेक्टरला काही जोड लावण्याची गरजच नाही. तो हिरो आहे, तो प्रेम करणार, समाजाची सेवा करणार, तुफान मारधाड करणार, त्याचं शरीर लोखंडांचं बनलेलं असणार, म्हणजे त्याला कुणी कितीही मारलं तरी त्याला काहीच होणार नाही. मग तो पोट भरण्यासाठी नक्की काय करतो की तो गर्भश्रीमंत आहे का, अशा प्रश्नांना काही अर्थच उरणार नाही. आता सलमानला रॉ चा एजंट वगैरे दाखवण्याचीही गरज राहिलेली नाहीये. आता 'जय हो' काय किंवा यापुढचे त्याचे सिनेमे काय तो एकच काम करणार, हिरोगिरी..अगदी रजनीकांतसारखी...

काय आहे स्टोरी ?

'जय हो' म्हणजे तेलगु स्टॅलिन या सिनेमाचा रिमेक... खरंतर, सुरुवातीला असं वाटतं की, परोपकारी गंपूची गोष्ट आहे. कारण सलमान येता-जाता अडल्यानडल्याला मदत करत असतो. गुंडांनी एखाद्या मुलीची छेडछाड केली, गेला लगेच सलमान मदत करायला अर्थात मारधाड करायला... एकदा तर तो अपंग मुलीला परीक्षा लिहायलाही मदत करतो. सर्वव्यापी असलेला हा जय एक्स-आर्मी ऑफिसर असतो आणि त्याचं एक गॅरेज असतं. कुणाला मदत केली आणि कुणी त्याला थॅक यू म्हणालं की, जय त्यांना सांगतो, "थँक यू म्हणू नका तर तुम्ही आता तीन माणसांना मदत करा आणि मग त्यांनापण तेच सांगा.." म्हणजे मागे परोपकाराची मोठी साखळी तयार होईल वगैरे वगैरे... असं बराच वेळ सुरू राहतं. पण हिरोला नुसतं परोपकारी दाखवून चालत नाही ना म्हणून मग इंटरव्हलनंतर व्हिलनची एंट्री होते आणि मग सिंघम स्टाईल पुढचा सिनेमा सुरू राहतो, अर्थातच क्लायमॅक्स बराच वेळ संपत नाही, मारधाड, पाठलाग असं बराच वेळ सुरू असतं आणि शेवटी हिरोचा जीव वाचल्यावर सिनेमा संपतो. सिनेमा संपताना हिरोला परत परोपकाराचा पुळका येतो आणि तीन लोकांना मदत करण्याची साखळीही आठवते, असा सगळा टिपिकल मसाला फिल्मचा मामला जुळवण्यात आलेला आहे.

नवीन काय ?

Jaiho_Review

सिनेमात सलमान खान असला की, दिग्दर्शकाच्या कामाला काही महत्त्व राहत नाही, हे ओळखूनच कदाचित सोहेल खानने दिगदर्शनाची धुरा आपल्याकडे घेतली असावी. बरं, स्टॅलिनसारखा सिनेमा' रेडी' असताना त्याची कॉपी करणं काहीच कठीण नव्हतं. त्यामुळे जय हो च्या दिग्दर्शनाबद्दल काही बोलण्यात अर्थ नाहीच..ऍक्शन सीन्समध्ये नवीन काहीच नाहीये, तीच ती नेहमीची केबल लावून केलेली तोडफोड..थोडी मारधाड झाली कीष हिरॉईनबरोबरचा सिक्वेन्स, मग एक गाणं, मग एखादा कॉमेडी सीन, मग परत ऍक्शन, मग मध्येच व्हिलनबरोबर संवांदांची जुगलबंदी, मग परत हिरॉईन, मग एक गाणं, मग परत तोडफोड, मग मध्येच सामान्यांविषयी कळवळा असा सगळं नेहमीचं पॅकेज. प्रेक्षक हे थिएटरमध्ये हेच सगळं बघायला येतात अशी ठाम समजूत असलेले फिल्ममेकर्स आणि त्यांचे असे तेच तेच सिनेमे. त्यातही 'सिंघम'सारखा जमून आलेला सिनेमा एखादाच, पण बाकी सगळे एकाच माळेचे मणी आणि दुदैर्वाने सगळेच शंभर कोटींच्या क्लबमधले. 'जय हो'मध्ये एक गाणंच आहे जे अशा सिनेमांसाठी फिट्ट बसतं आणि ते म्हणजे 'अपना काम बनता, भाड में जाएँ जनता...'

परफॉर्मन्स

345634 jai ho

सलमान खान या सिनेमातही त्याच्या नेहमीच्या स्टाईलमध्ये आहे. त्याची ही स्टाईल आणि डॅनीचा व्हिलन एवढंच सिनेमात खास आहे, बाकी सगळेच यथातथाच आहेत. बरं, या 'जय हो' मध्ये विस्मरणात गेलेले अनेक ऍक्टर्सही आहेत जे खरंतर हिरो बनायला इंडस्ट्रीत आले होते. मुकुल देव, अश्मित पटेल, शरद कपूर अशी बरीच गर्दी आहे. याशिवाय मोहनीश बहल, आदित्य पांचोली, महेश ठाकूर आणि महत्त्वाचं म्हणजे तब्बूसुद्धा आहे. एकंदरीतच जे सलमान खानचे डायहॉर्ड फॅन आहे त्यांच्यासाठी नव्यावर्षाच्या सुरुवातील 'जय हो' सिनेमा मस्त मेजवानी ठरणार हे नक्की.

रेटिंग : जय हो - 50

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 24, 2014 07:20 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close