S M L

फिल्म रिव्ह्यु : प्रियतमा

Sachin Salve | Updated On: Feb 15, 2014 05:38 PM IST

फिल्म रिव्ह्यु : प्रियतमा

अमोल परचुरे, समीक्षक

प्रियतमा...पोतराज परशा आणि पाटलांची लेक गौरी यांच्यातली ही प्रेमकथा...रंगांची उधळण करत, हिरव्यागार निसर्गाच्या साक्षीने फुलणारी ही प्रेमकथा आहे 1955 सालातली... अशाच प्रकारच्या प्रेमकथांचे रंग याआधी अनेकवेळा आपण पाहिलेले आहेत. 'एक दुजे के लिए', 'कयामत से कयामत तक'पासून ते अगदी अलीकडच्या 'रामलीला'पर्यंत असंख्य सिनेमांमधून दिसलेली प्रेमाच्या त्यागाची कहाणी पुन्हा एकदा 'प्रियतमा'मध्ये बघायला मिळते, इथे काळ वेगळा आहे, व्यक्तिरेखा वेगळ्या आहेत एवढाच काय तो फरक...आता परशाचा अवतार बघून पाटलांची गौरी कशी काय त्याच्या प्रेमात पडते असा आक्षेप कुणी घेऊ शकतं, पण प्रेम होण्यासाठी रंग-रुप कधी महत्त्वाचं नसतंच. आता एवढं डोक्यात ठेवून सिनेमा बघितला तरी तो गुंतवून ठेवत नाही. शेवट काय होणार एवढंच नाही तर पुढे काय होणार याचासुद्धा अगदी सहज अंदाज बांधता येतो. उल्लेख करण्यासारखी एकमेव गोष्ट म्हणजे मराठीच्या मानाने केलेलं प्रेक्षणीय सादरीकरण..

काय आहे स्टोरी ?

Priyatama (3)

पोतराजाचं जिणं जगणारा परशा देवीआईची सेवा करुन हताश झालेला, त्याची देवीवर श्रद्धा आहे, पण सामान्य माणसासारखं आपण का जगू शकत नाही हा त्याला पडलेला प्रश्न. त्यातच त्याला भेटते पाटलांची मुलगी गौरी...बघताक्षणीच तिच्या प्रेमात पडतो, हळूहळू तिलाही परशा आवडायला लागतो. लोकांच्या पचनी हे प्रेम पडणार नाही हे याची दोघांना कल्पना असते. आता एवढं सांगितल्यावर पुढे काय होणार हे कोणीही सांगू शकेल.

प्रियतमाचा प्रॉब्लेम म्हणजे प्रेमाशिवाय यात काही फार घडत नाही. काही साईड स्टोरीज टाकण्याचा प्रयत्न झालाय पण त्यामुळे इंटरेस्ट वगैरे वाढत नाही, बरं, गाण्यांचा मारा सुरूच राहतो. 'हम दिल दे चुके सनम', 'जोगवा' किंवा नुकत्याच आलेल्या 'रामलीला'मधल्या गाण्यांची आठवण येईल अशी सगळी गाणी आहेत. काही ठिकाणी फ्रेम्स चांगल्या बनल्यात, पण ओव्हरऑल कॅमेरा आणि एडिटिंग ही डिपार्टमेंट सुद्धा कमजोर वाटतात. कलाकारांचा अभिनय आणि नेत्रसुखद हिरवागार निसर्ग हीच सिनेमाची जमेची बाजू आहे.

परफॉर्मन्स

Priyatama (2)

सिध्दार्थ जाधवने याही सिनेमात फुल्ल एनर्जी लावून काम केलंय आणि अभिनयही चांगलाच केलाय. देवीआईपुढे साकडं घालताना त्याची अदाकारी किंवा जंगलात जिवाच्या आकांतानं पळणं असेल, सिध्दार्थने नेहमीपेक्षा थोडी आणखी एनर्जी लावलीये हे स्पष्ट जाणवतं. गिरीजा जोशीनेसुद्धा गौरी खूप सुंदर साकारलीये. फक्त तिची हेअरस्टाईल 1955 सालची वाटत नाही एवढंच.

बाकी कलाकारांमध्ये चारुशीला साबळे आणि संजय खापरे यांचा खास उल्लेख करायला लागेल. चारुशीला साबळे यांनी परशाच्या आईची भूमिका साकारलीये. संजय खापरे यामध्ये व्हिलन झालाय. 'काकस्पर्श'नंतर संजय भूमिकांबाबतीत चोखंदळ झालाय असंच दिसतंय. एकंदरित, अभिनयाच्या पातळीवर उत्तम कामगिरी पण सिनेमा म्हणून फसलेला असंच प्रियतमाबद्दल म्हणता येईल.

रेटिंग -100 पैकी 50

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 15, 2014 05:36 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close