S M L

रिव्ह्यु :यशवंतराव चव्हाण : बखर एका वादळाची !

Sachin Salve | Updated On: Mar 14, 2014 10:56 PM IST

रिव्ह्यु :यशवंतराव चव्हाण : बखर एका वादळाची !

अमोल परचुरे, समीक्षक

यशवंतराव चव्हाण : बखर एका वादळाची...खरं तर ही बखर एका डॉक्युमेंटरीची आहे. यशवंतराव चव्हाण यांचं चरित्र मोठ्या पडद्यावर आलं पाहिजे एवढीच फक्त प्रतिष्ठानची अपेक्षा असावी, डॉक्युमेंटरी करायचा की सिनेमा याबद्दल त्यांच्या मनातही गोंधळ असणार, आणि मग हाच गोंधळ पुढे डॉ. जब्बार पटेल यांच्यापासून सिनेमाशी संबंधित सगळ्यांच्या मनात झिरपत गेला असणार. त्यामुळेच धड डॉक्युमेंटरी नाही, धड सिनेमा नाही. यशवंतरावांची जशी राजकीय कोंडी झाली तसाच प्रकार त्यांच्या चरित्रपटाचाही व्हावा हे आणखी एक दुदैर्व. तसंही आपल्याकडे चरित्रपटांची परंपरा कमीच आहे.

आपल्याकडे बायोपिक बनलेच तर ते भाग मिल्खा भाग नाहीतर अजय देवगणच्या भगतसिंगसारखे फिल्मी...नाही म्हणायला, श्याम बेनेगल यांनी 'भारत एक खोज' किंवा 'संविधान' मधून इतिहास जिवंत केलाय, पण असे अपवाद कमीच आहेत. अशावेळेस महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण, ज्यांना आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार म्हटलं जातं, नंतर केंद्रात अनेक महत्त्वाची खाती समर्थपणे सांभाळली, अगदी उपपंतप्रधानही झाले, यामागे होता त्यांचा आणि त्यांच्या कुटुंबाचा संघर्ष..पण हा प्रवास अतिशय जुनाट आणि सरकारी डॉक्युमेंटरीच्या पद्धतीने सादर करण्यात आलाय. व्हीएफएक्स सारख्या आधुनिक तंत्राचा वापरसुद्धा अतिशय बाळबोध प्रकारे करण्यात आलेला आहे.

काय आहे स्टोरी ?

यशवंतराव चव्हाण यांच्या बालपणापासून ते राजकीय पुढारी होईपर्यंतचा प्रवास जरा नाट्यमय झालाय, पण त्यापुढे, म्हणजे इंटरव्हलनंतर सगळ्याच पातळयांवर गोंधळ उडालाय. यशवंतराव यांचा स्वातंत्र्यलढ्यातील सहभाग, तुरुंगवासात मार्क्सवाद, समाजवाद याच्याशी आलेला संबंध, पुढे संयुक्त महाराष्ट्र लढ्यामध्ये सहन करावी लागलेली टीका, महाराष्ट्र राज्याची स्थापना इथपर्यंतचा भाग बघताना आपण सिनेमा बघतोय हे जाणवतं तरी..पण यशवंतराव हे कसे कलाप्रेमी होते हे ज्याप्रकारे दाखवलंय ते अतिशय हास्यास्पद आहे. सिनेमॅटिक चुकांची संख्या तर एवढी आहे की, ते सांगत बसलो तर बॉक्स ऑफिसचा एक एपिसोडसुद्धा कमी पडेल.

बरं, यशवंतरावांची ही बखर कोण सांगतंय हेच कळत नाही. प्राध्यापक नाना पाटेकर अमेरिकेहून आलेल्या मुलांना गोष्ट सांगतायत की, यशवंतराव स्वत: आपल्याशी बोलतायत की, मध्येमध्ये डोकावणारा शाहीर हाच सुत्रधार आहे? काहीच कळत नाही. यशवंतरावांच्या कर्तृत्वाचं काही प्रमाणात विश्लेषणही मध्येमध्ये येतं, पण एकंदरित ज्या गोष्टी माहित आहेत त्याच सिनेमात आलेल्या आहेत. राजकीय चरित्रपट करताना माहित नसलेल्या किंवा पडद्याआड रंगणारं राजकारण यात कुठेच नाही, पण यात घाशीराम कोतवाल, नटसम्राट, श्यामची आईचे प्रसंग जे अगदीच अनावश्यक होते, ते मात्र आवर्जून आहेत.

YBCHAVAN-FILM-POSTERसिनेमात शेवटी नाना पाटेकर आणि विद्यार्थ्यांसमोर जेव्हा यशवंतराव स्वत: प्रकट होतात तेव्हा तर हसावं की रडावं तेच कळत नाही. एकंदरित, हा सिनेमा आहे हेच पटत नाही. डॉ. जब्बार पटेल दिग्दर्शक आहेत हे पटत नाही, अरुण साधूंनी पटकथा लिहीलेय यावर तर विश्वासच बसत नाही.'सिंहासन' सारख्या सिनेमात विधानभवन दाखवणं जर शक्य होतं तर व्हीएफएक्सची साथ असताना या सिनेमात संसद दाखवता येऊ नये, संसदेच्या आवारातला एकही सीन सिनेमात असू नये याचंही आश्चर्य वाटतं. एकंदरित, सिनेमा म्हणून सगळंच गळपटलंय.

परफॉर्मन्स

पण काही चांगल्या गोष्टीसुद्धा सांगायला पाहिजेत. यशवंतराव चव्हाण यांच्या भूमिकेसाठी अशोक लोखंडे यांची निवड. त्यातही महत्त्वाचं म्हणजे अशोक लोखंडे भूमिकेशी एकदम एकरुप होऊन गेलेत. तरुण यशवंतरावांची भूमिका करणारा ओम भूतकरनेसुद्धा उत्कृष्ट काम केलेलं आहे. यातली एक खास बात म्हणजे नाना पाटेकर, जसे प्रत्यक्षात आहेत अगदी तसेच सिनेमात दिसतात. नानांच्या अभिनयाबद्दल वेगळं बोलायला नकोच पण अगदी नॅचरल नाना पहिल्यांदाच पडद्यावर बघायला मिळतात. बाकी, काही खास सांगण्यासारखं नाहीच आहे. अजूनही बायोपिक म्हटल्यावर आपल्याला आयर्न लेडी, लिंकन या हॉलिवूड सिनेमांचंच कौतुक करावं लागेल. बाकी यशवंतरावांसारख्या कणखर राजकीय नेत्यांचा इतिहास जाणून घ्यायचा असेल तर सिनेमा बघण्यापेक्षा 'कृष्णाकाठ' हे यशवंतरावांचं आत्मचरित्र वाचा...

रेटिंग 100 पैकी 30

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 14, 2014 10:56 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close