S M L

लाखमोलाची 'एक हजाराची नोट'

Sachin Salve | Updated On: May 9, 2014 10:56 PM IST

लाखमोलाची 'एक हजाराची नोट'

अमोल परचुरे, समीक्षक

अगदी आवर्जून बघावा असा सिनेमा आहे 'एक हजाराची नोट'...सामान्यातल्या सामान्य माणसाचं जगणं छोट्या छोट्या गोष्टीमधून आनंदी होत असतं, गोष्ट छोटी वाटली तरी त्यातून त्यांना मिळणारा आनंद किंवा त्यांना होणारं दु:ख खूप मोठं असू असतं. फँड्रीसारख्या सिनेमात शहरापासून फार लांब नसलेल्या गावातलं सामान्यांचं जगणं आपण बघितलं, आता 'एक हजाराची नोट'मध्ये विदर्भातल्या अशाच एका गावातली गोष्ट बघायला मिळते. सर्वसामान्यांचं वास्तव पडद्यावर सादर करताना आसपासची परिस्थिती, प्रशासन, व्यवस्था, राजकारणी यांचा सामान्यांना वापरुन घेण्याचा मुजोरपणा हे सगळंच खूप प्रभावीपणे पण तरीही सहज स्वरुपात मांडलेलं आहे. मुख्य म्हणजे सगळ्यांना आवडेल आणि सगळ्यांना भिडेल असं आहे.

781Ek-Hazarachi-Note-1

ही किमया केलीये श्रीकांत बोजेवार यांच्या पटकथेनं आणि श्रीहरी साठेच्या दिग्दर्शनातून. हॉलीवूडमध्ये शॉर्टफिल्म्सची निर्मिती त्याने केलेली आहे आणि त्याचा हा अनुभव दिग्दर्शक म्हणून 'एक हजाराची नोट'मध्ये ठळकपणे जाणवतो. जे सांगायचंय ते अगदी थोडक्यात शब्दात मांडण्याचं सिनेमॅटिक कसब त्याच्या दिग्दर्शनात आहे आणि त्याला सुंदर कथेची जोड मिळाल्यामुळे एक उत्कृष्ट कलाकृती बघितल्याचं समाधान प्रेक्षकांना नक्कीच मिळेल.

काय आहे स्टोरी ?

1Ek-Hazarachi-Note-1

विदर्भातल्या दिग्रसजवळच्या फुलंब्री या छोट्या गावात घडणारी ही गोष्ट..याच गावात राहणारी पारू नावाची म्हातारी..तिच्या तरुण मुलानं कर्जापायी आत्महत्या केलीये, त्यामुळे एकटीचं जिणं तिच्या नशिबी आलंय. धुणीभांडी करुन ती कसाबसा एकटीचा संसार ढकलतीये. गाठीशी असलेले पैसे पुरवून पुरवून तिला वापरावे लागतात. दरम्यान, विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात होते आणि आमदारकी लढवत असलेला नेता फुलंब्री गावात सभा घ्यायला येतो. याच सभेनंतर पैसेवाटप होत असतं आणि पारुच्या मुलानं आत्महत्या केलेली असल्यामुळे इतरांना शंभर रुपये वाटणारा हा नेता तिच्या हातात हजाराच्या चार नोटा कोंबतो.

7969Ek-Hazarachi-Note

शंभराची नोटही दुर्मिळ असलेल्या या बुढीच्या हातात हजाराच्या नोटा आल्यावर तिचं आयुष्यच बदलून जातं. इथून पुढे तिला जे काही अनुभव येतात ते कल्पनेपलीकडचे असतात, तिच्यासाठीही आणि प्रेक्षक म्हणून आपल्यासाठीही...आपली सिस्टीम एकदम सडलेली आहे हे आपण येता-जाता ऐकत असतो, पण या किडलेल्या सिस्टीमचा प्रत्यक्ष अनुभव घेणारे तळागाळातले सामान्य नागरीक किती भयानक जगणं जगतात, आणि त्यातही स्वत:चा स्वाभिमान टिकवून ठेवणं, माणुसकी जपणं, आयुष्यात आनंदी राहणं हे ते कसं काय जमवू शकतात असेच प्रश्न सिनेमा बघितल्यावर मनात येतात. सिनेमा संपल्यानंतरही बराच वेळ आपण सिनेमाचा, त्यातल्या भावनांचा विचार करत राहतो हेच त्याचं यश आहे असंही म्हणता येईल.

परफॉर्मन्स

098Ek-HazarachiNote

फुलंब्री गाव, गावातली माणसं, त्यांचे स्वभाव, प्रत्येक गोष्ट स्पष्टपणे, थेटपणे टिपलेली आहेत. वर्‍हाडी भाषेतला गोडवा, शैलेंद्र बर्वेचं संगीत, आरती अंकलीकर यांचा सूर हे आणखी काही सिनेमाचे प्लसपॉईंट..अभिनयात तर सर्वांनीच कमाल केली आहे. उषा नाईक यांचा आत्तापर्यंतच्या कारकीर्दीतला हा वैशिष्टयपूर्ण रोल म्हणावा लागेल, अगदी पहिल्या सीनपासून शेवटच्या सीनपर्यंत बुढीच्या आयुष्यातले सगळे भाव त्यांनी अप्रतिम उभे केले आहेत. संदीप पाठकला मुलगा मानून त्याचे लाड करणारी बुढी, परिस्थितीने त्रासलेली बुढी, परोपकारी बुढी, गोंधळलेली, आनंदून गेलेली. खरंच, उषा नाईक यांनी अभिनयातून कमालच केलेली आहे.

संदीप पाठक, गणेश यादव, श्रीकांत यादव, देवेंद्र गायकवाड हे सगळे थिएटरमधून आलेले..हा नाटकातला अनुभव मोठ्या पडद्यावरही जाणवतो. ते अभिनेते वाटतच नाहीत. जसा दिग्दर्शकाने आपण काहीतरी ग्रेट करतोय असा आव आणलेला नाही अगदी तसंच या कलकारांनीही अभिनयाचा आव न आणता अगदी सहज आपापलं काम केलेलं आहे. असा हा 'एक हजाराची नोट' चोख, खणखणीत आणि एका सुंदर सिनेमाचा अनुभव देणारा आहे..

रेटिंग 100 पैंकी 80

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 9, 2014 10:56 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close