S M L

फिल्म रिव्ह्यु : हमशकल्स-'तीन तिगाडा, काम बिगाडा'

Sachin Salve | Updated On: Jun 21, 2014 03:25 PM IST

फिल्म रिव्ह्यु : हमशकल्स-'तीन तिगाडा, काम बिगाडा'

अमोल परचुरे, समीक्षक

हमशकल्स सिनेमाच्या सुरुवातीला 'ट्रिब्यूट टू किशोर कुमार', 'जिम कॅरी अँड पीटर सेलर्स' असं बघायला मिळतं. साजिद खानला या विनोदवीरांबद्दल आदर वगैरे असू शकतो, पण 'हमशकल्स'सारखा सिनेमा या महान लोकांना अर्पण करुन त्याने या महान व्यक्तींचा घोर अपमान केलेला आहे. किशोर कुमार, जिम कॅरी ही मंडळींनी काय दर्जाचं काम करुन ठेवलंय आणि आपण हा काय कचरा करतोय याचं भानही साजिद खानला नसावं. किशोर कुमार, जिम कॅरी यांच्या कॉमेडीला एक दर्जा आहे, पण त्याच्या अगदी विरुद्ध दर्जाहीन असा सिनेमा साजिदने बनवलाय. हिम्मतवालासारखा सिनेमा सणकून आपटल्यानंतर साजिद खान काहीसा जमिनीवर आलाय असं वाटत होतं, पण तसं काही नाहीये. 'हमशकल्स'मधून त्याने आपली सर्वात वाईट म्हणजे 'हिम्मतवाला'पेक्षाही वाईट कलाकृती पे्रक्षकांच्या माथी मारलेली आहे. एकतर प्रेक्षक हा सिनेमा अर्ध्यातून सोडून जातील किंवा सिनेमा झाल्यावर डोकं आपटून घेतील एवढा हा सिनेमा वाईट आहे. 'हाऊसफुल्ल' आणि 'हाऊसफुल्ल 2' बघताना बर्‍यापैकी टाईमपास झाला होता, तसा टाईमपासही इथे होत नाही, हसायलाही येत नाही उलट फालतू जोक्स ऐकून राग येत राहतो.

काय आहे स्टोरी ?

हमशकल्समध्ये तीन सैफ, तीन रितेश आणि तीन राम कपूर आहेत. मनोरंजनाचा ट्रिपल धमाका आहे वगैरे प्रोमोमधून सांगितलं गेलं, पण खरंतर तीन तिगाडा, काम बिगाडा असाच प्रकार झालाय. ट्रिपल रोल्सच्या प्रेमात पडल्यामुळे साजिद खानने कथेकडे किंवा पटकथेकडे फारसं लक्षच दिलेलं नाहीये. एकाच रुपातली तीन तीन माणसं असल्यामुळे अदलाबदलीचा घोळ पूर्ण सिनेमाभर आहे, पण हा घोळ रचताना काहीच विचार झालेला नाही. मॅड कॉमेडी करायची असेल तर नुसता मॅड विचार करुन चालत नाही, तर अतिशय हुशारीने असला वेडेपणा करायला लागतो.

45hamshkals

'चुपके चुपके', 'जुना गोलमाल' किंवा अलीकडच्या 'हेराफेरी'मध्ये जी धमाल होती ती पटकथेची कमाल होती. नेमकी हीच हमशकल्सची उणीव आहे. फालतू जोक्सची सतत पेरणी केली म्हणजे सिनेमा कॉमेडी होतो हा साजिद खानचा मोठ्ठा गैरसमज असावा, ज्याचा त्रास बिचार्‍या प्रेक्षकांना भोगावा लागतो. जे 'हिम्मतवाला'च्या वेळी झालं त्याचीच पुनरावृत्ती इथे झालीये. यामध्ये जेवढी पात्रं आहेत ती सतत हातवारे करत, वेडीवाकडी तोंडं करत इकडून तिकडे पळत राहतात. सतत कोणत्यातरी संकटात सापडतात, त्यातून बाहेर पडण्यासाठी आणखी बावळटपणा करतात असा सगळा सावळागोंधळ क्लायमॅक्सपर्यंत सुरुच राहतो. या सगळ्यात कथा-पटकथा कुठेतरी गुदमरुन गेलीये असंच वाटतं.

परफॉर्मन्स

साजिद खानच्या आत्मविश्वासाला मात्र दाद द्यावी लागेल. सिनेमा एवढा रद्दड आणि रटाळ असतानाही त्याला फक्त साजिद खानच सिनेमा म्हणू शकतो. यासाठी त्याने ज्या कलाकारांची निवड केलीये तीसुद्धा चुकलेलीच आहे. रितेश देशमुख वगळला तर बाकी सगळ्यांनीच कॉमेडीच्या नावाखाली फक्त वेडीवाकडी तोंडं हलवलीयेत नाहीतर अंग हलवलंय. सैफ अली खान तर अख्ख्या सिनेमात झोपेत चालत असल्यासारखा दिसतो. राम कपूरने थोडाफार अभिनयाचा प्रयत्न केलाय, आणि तीन हिरॉईन्सना दोन-तीन गाण्यात नाचण्याशिवाय काहीही काम नाहीये.

sdshumshakal-mar24

रितेश देशमुखने त्याचा कॉमेडीचा सेन्स पुरेपूर वापरलाय. पण तो एकटा पुरा पडत नाही, त्यात त्याच्यासमोर दगड ऍक्टर्स असल्यामुळे त्याच्या कॉमेडीचा इफेक्टही कमी झालाय. 'हाऊसफुल्ल ' 1 आणि 2 मध्ये धमाल उडवलेल्या चंकी पांडेला इथे वाया घालवलंय. परफॉर्मन्सचा सिनेमावर कसा परिणाम होतो हेच यातून सिद्ध होतंय. 'हाऊसफुल्ल' 1 आणि 2 मध्ये अक्षय कुमार, बोमन इराणी, ऋषी कपूर, मिथुन चक्रवर्ती, जॉनी लिव्हर अशा तगड्या कलाकारांनी केलेली कमाल तरी होती, तसंही काही हमशकल्समध्ये बघायला मिळत नाही. असं बरंच काय काय बोलता येईल, अजून तावातावाने टीका करता येईल, पण सध्या हमशकल्स पुराण इथेच संपवतो, शेवटी एवढंच सांगतो, कितीही मजबुरी असली तरी हा सिनेमा बघायला जाऊ नका कारण एवढी भंकस फिल्म तुम्हाला फक्त आणि फक्त टॉर्चरच करु शकते.

रेटिंग 100 पैकी 20

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 21, 2014 03:19 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close