S M L

फिल्म रिव्ह्यु : 'किक'

Sachin Salve | Updated On: Jul 25, 2014 10:50 PM IST

अमोल परचुरे, समीक्षक

बॉक्स ऑफिसचा दबंग सलमानभाई पुन्हा एकदा 100 किंवा 200 कोटी रुपये कमवायला, पुन्हा एकदा ईदच्या मुहूर्तावर, सुपरस्टंट्स दाखवायला आलेला आहे. यावेळी सिनेमाचं नाव आहे किक... हिंदी प्रेक्षकसुद्धा आता त्याच त्याच प्रकारांना कंटाळले आहेत हे 'जय हो'च्या वेळेस दिसलं होतं. त्यामुळे यावेळी सलमानने थोडी खबरदारी घेतलीये. एरव्ही फक्त सलमान आणि सलमान अशी सिनेमाची रचना असायची, पण किकमध्ये सलमानशिवाय मिथुन चक्रवर्ती, रणदीप हुडा आणि नवाझुद्दीन सिद्दिकीसुद्धा आहेत. पण एवढं करुनही सिनेमाच्या आणि सलमानच्या स्टाईलमध्ये फारसा फरक पडलेला नाही.

kick04-jun16किक हा साजिद नाडियादवाला याचा दिग्दर्शक म्हणून पहिलाच सिनेमा. आपल्या पहिल्याच सिनेमाची पटकथा लिहीताना साजिदला आणखी तिघांची गरज लागली, यात चेतन भगत आणि रजत अरोरा यांचा समावेश आहे. बरं, हा सिनेमा तेलगु सिनेमाचा रिमेक असतानासुद्धा पटकथेवर एवढी मेहनत का घ्यावी लागली असावी हासुद्धा प्रश्नच आहे. या मेहनतीचं सिनेमात जे काही झालंय ते केवळ हास्यास्पद आहे.

'दबंग' किंवा 'वाँटेड'सारख्या सिनेमात जी ऍक्शन, जी स्टोरीलाईन असते साधारण त्याच पद्धतीचा हा सिनेमा आहे, पण प्रोमो बघून 'एक था टायगर'पेक्षा आणखी काहीतरी भव्य बघायला मिळेल असं वाटलं होतं, पण जय हो नंतर पुन्हा एकदा सलमानने प्रेक्षकांची निराशा केलीये. अर्थात, सलमानचे डायहार्ड फॅन्स सिनेमा उचलून धरतील यात शंका नाही, कदाचित सिनेमा 100 कोटी रुपयांचा बिझनेसही करेल पण निर्मात्यांनी जे दोनशे कोटींचे दावे केले होते ते काही प्रत्यक्षात येतील असं वाटत नाही.

काय आहे स्टोरी ?

Kick newदेवीलाल सिंग, ज्याला लहानपणापासूनच जगावेगळं वागायची 'किक' आहे आणि या किकपायी त्याच्या आयुष्यात काय काय घडतं, काय काय तो घडवून आणतो आणि त्याच्या या किकमुळे बाकीच्यांना आणि प्रेक्षकांना काय काय भोगायला लागतं त्याची ही गोष्ट...खरं म्हणजे, किक हा सिनेमा आणि त्याचं टेकिंग यात 'धूम 3', 'क्रिश', 'डॉन' या सगळ्याचं मिश्रण आहे. स्वत: साजिद नाडियादवाला आणि सलमान खान यांनी मुळात हा सिनेमाच सिरीयसली घेतलाय असं वाटतच नाही.

एक ब्लॉकबस्टर फिल्म बनवायची, ऍक्शन टाकायची, गाणी टाकायची, यो यो हनी सिंगला एक गाणं द्यायचं, नवाझुद्दीन, रजत कपूर अशा ऍक्टर्सना घेऊन छोटे छोटे रोल द्यायचे, अजिबात ऍक्टिंग न येणारी आणि स्वत:ला हॉट समजणारी एक हिरॉईन घ्यायची, सायकलपासून डबलडेकर बसमध्ये हिरोला बसवून पाठलागाचे थरारक वगैरे सीन्स दाखवायचे, आणि मुख्य म्हणजे दुसर्‍या देशात जाऊन तिथे तोडफोड करायची, त्यांच्या गाड्या उडवून ट्रॅफिकची वाट लावायची आणि मग तोंडी लावायला एक स्टोरी ठेवायची...अशा पद्धतीने किक हा सिनेमा बनवण्यात आला असावा. kick07-jun16

बिझनेसमध्ये जसे स्लिपिंग पार्टनर असतात तसंच चेतन भगत आणि रजत अरोरा यांना 'स्लिपिंग रायटर' बनवलं असावं. कारण हिरोचं दारू पिणं, वाटेत येणार्‍या लोकांना उडवून पोलिसांपासून पळ काढणं या सगळ्याचं उदात्तीकरण केलेलं दिसतं, याशिवायही अनेक अचारट गोष्टीसुद्धा सिनेमात आहेत, ज्या केवळ सलमानच करू शकतो. एवढं सगळं असूनही सिनेमाच्या शेवटची 20-25 मिनिटं चांगली रंगतदार झाली आहेत, एवढाच काय तो दिलासा.

परफॉर्मन्स

किकमध्ये सर्वात तगडा परफॉर्मन्स दिलाय नवाझुद्दीन सिद्दीकीने.. किचा मुख्य व्हिलन साकारताना त्याने कमालच केलीये. मुख्य व्हिलन असूनही त्याच्या भूमिकेची लांबी खूपच कमी आहे, पण मिळालेल्या सीन्समध्ये कपटी आणि विकृत खलनायक साकारताना त्याने आपणकसे परिपूर्ण अभिनेता आहोत हेच पुन्हा एकदा पटवून दिलंय. सलमान आणि नवाझुद्दीन फक्त दोन वेळा आमने-सामने येतात, हा सामना अजून थोडा वाढवला असता तरी चाललं असतं, पण दुदैर्वाने तेवढी बुध्दी लेखक-दिग्दर्शकाला झालेली नाही. kick11-jun16

रजत कपूर सारख्या अभिनेत्याला अक्षरश: फुकट घालवलंय. रणदीप हुडा आणि सौरभ शुक्ला यांनी आपापलं काम चांगलं केलंय. सिनेमातली डोकेदुखी आहे ती जॅकलिन फर्नांडिस..एकतर तिच्या अभिनयाची बोंब आहे आणि त्यात ती विचित्र ऍक्सेंटमध्ये हिंदी बोलते, त्यात तिला डॉक्टर बनवलंय.तिच्या बाबतीत एकंदरित सगळंच चुकलेलं आहे. सलमान खान तर नेहमीच्या दबंग स्टाईनलमध्ये सिनेमाभर वावरलेला आहे. जगाच्या कल्याणासाठीच आपला जन्म झालाय असाच त्याचा आविर्भाव आहे.

जाता जाता

kick05-jun16बॉलीवूडच्या मसाला सिनेमात चुका शोधायच्या नसतात, लॉजिक शोधायचं नसतं, फक्त हिरोच्या ताकदीचे अतार्किक किस्से एंजॉय करायचे असतात. पण हिरोने पोलंडमधल्या बिल्डिंगच्या काचा फोडून खाली उडी मारली आणि लंडनच्या डबलडेकर बसमध्ये बसला तर त्याला काय म्हणणार? याला दिग्दर्शकाची किक एवढंच म्हणू शकतो. आले प्रोड्युसर डायरेक्टरच्या मना तिथे कोणाचेही चालेना. एकंदरित, सलमानमुळे किक बघायची खूप उत्सुकता असेल, सलमानचे तुम्ही भक्त असाल तरच हा सिनेमा बघायची हिंमत करा.फार अपेक्षा ठेवू नका नाहीतर निराशा पदरी पडेल.

रेटिंग 100 पैकी 40

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 25, 2014 07:20 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close