S M L

'रमा माधव' पेशवाईचा अभिनयसंपन्न दिमाख !

Sachin Salve | Updated On: Aug 9, 2014 05:16 PM IST

'रमा माधव' पेशवाईचा अभिनयसंपन्न दिमाख !

अमोल परचुरे,समीक्षक

दिग्दर्शिका मृणाल कुलकर्णीचं अभिनंदन करायला हवं, कारण ऐतिहासिक काळ, पेशवाईतील प्रेमकहाणी या विषयावर सिनेमा बनवण्याचं अवघड आव्हान तिने स्वीकारलं आणि पूर्ण करुन दाखवलं. मराठी सिनेमांना एरव्ही आर्थिक मर्यादा असताना साधारण त्याच मर्यादेत राहून नेत्रदीपक कामगिरी करण्यात मृणालला यश आलंय असं नक्कीच म्हणता येईल. खरंतर, मृणाल कुलकर्णी रमाच्या भूमिकेत 'स्वामी' मालिकेत दिसली होती, आणि आज इतक्या वर्षांनंतर त्याच विषयावर तिच्या हातून सिनेमा तयार व्हावा हा योगायोगही सुखद म्हणावा लागेल. 'रमा माधव' हा सिनेमा बघताना जाणवतं की, या प्रत्येक गोष्टीसाठी चांगला अभ्यास झालेला आहे. कॉश्च्युम ड्रामा असल्यामुळे यातले पोषाख आणि यातली ज्वेलरी तर नजरेत भरतेच पण कलाकारांची निवड, प्रसंगांची निवड यासाठीसुद्धा चांगला रिसर्च केल्याचं जाणवत राहतं. पेशवाई म्हटलं की, जे चित्र डोळ्यासमोर येतं त्यापेक्षा अधिक भरजरी आणि विलोभनीय चित्र दाखवण्याचा प्रयत्नही कौतुकास्पद आहे. तरुण पिढीला या वैभवाची कल्पना यावी या उद्देशानं कदाचित अशी रचना केलेली असेल. एकंदरित सिनेमाचा लूक तांत्रिकदृष्टयासुद्धा श्रीमंत असेल याची पुरेपूर काळजी घेण्यात आलेली आहे.

काय आहे स्टोरी ?

rama madhavएक कलाकृती म्हणून रमा माधव चा आलेख सतत बदलत राहणारा आहे. म्हणजे लूक चांगला वाटतो, कलाकार ताकदीचे आहेत पण कथा पुढे नेताना नेमका फोकस कशावर ठेवायचा याबद्दल गोंधळ झालाय.  नावावरुन ही एक प्रेमकहाणी आहे असं वाटत असलं तरी इंटरव्हलनंतर प्रेमकहाणीचा फोकस बदलून तो माधवरावांच्या कर्तृत्वाकडे झुकतो. बरं, सोळाव्या वर्षी गादीवर बसलेले माधवराव पुढच्या साधारण दहा वर्षात जो पराक्रम गाजवतात, पानिपताच्या युद्धानंतर विस्कटलेली पेशवाईची घडी पुन्हा नीट बसवतात हा भाग एका तासात न येऊ शकणारा आहे. आणि त्यामुळेच इंटरव्हलनंतर प्रेमकहाणी की माधवरावांचं शौर्य या कोंडीत सिनेमाची पटकथा सापडलीये. पुन्हा क्लायमॅक्सला रमा माधव यांच्या प्रेमाची शोकांतिका परिणामकारकरित्या सादर झालीये पण तो भाग थोडा लांबल्यासारखा वाटतो. रमा माधव यांच्या बालपणात काही प्रसंगांची लांबी कमी झाली असती तर इंटरव्हलनंतर ही प्रेमकहाणी फुलवायला अधिक वेळ मिळू शकला असता. तर पटकथेत असे काही दोष असल्यामुळे एक परिपूर्ण ऐतिहासिक प्रेमकहाणी बघितल्याचं समाधान मिळत नसलं तरी एकदा हा सिनेमा जरुर बघावा असा नककीच आहे.

परफॉर्मन्स

rama madhav3अभिनयात तर सर्वांनीच बाजी मारलेली आहे. अगदी छोटी रमा असो, रामशास्त्रींच्या छोट्या भूमिकेतील योगेश सोमण असो, प्रत्येक कलाकाराचा अभिनय अप्रतिम झालेला आहे. लहान लहान भूमिकांमध्येही अनुभवी कलाकारांना निवडण्याचा चांगला फायदा सिनेमाला झालाय. आलोक राजवाडेने कोवळा माधव आणि गादीवर बसलेले श्रीमंत माधवराव पेशवे हा फरक खूपच चांगला दाखवलाय. पर्ण पेठेने रमाची निरागसता आणि क्लायमॅक्सला रमाचा निग्रह अभिनयातून प्रभावीपणे सादर केलाय. खरंतर, अभिनयसंपन्नता हीच या सिनेमाची सर्वात जमेची बाजू आहे. मनस्विनी लता रवींद्रसारख्या आधुनिक दृष्टी असलेल्या आणि अभ्यासू लेखिकेनं संवाद लिहील्यामुळे ऐतिहासिक नाटकी भाव पूर्णपणे निघून गेलाय. संगीताची बाजूसुद्धा भक्कम आहे. दिवंगत आनंद मोडक यांच्या संगीताची जादू अगदी दोन-तीन गाण्यांमधूनच सिनेमाभर व्यापून राहते. नरेंद्र भिडे यांच पार्श्वसंगीतही भव्यतेला शोभून दिसणारं...एकंदरित हा कॉश्च्युम ड्रामा एकदा अनुभवावा असा नक्कीच आहे.

रेटिंग 100 पैकी 60

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 9, 2014 05:16 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close