S M L

आवर्जून बघावा असा 'रेगे'

Sachin Salve | Updated On: Aug 15, 2014 09:11 PM IST

आवर्जून बघावा असा 'रेगे'

अमोल परचुरे, समीक्षक

रेगे सिनेमाची टॅगलाईन आहे..तुमचं तुमच्या मुलांकडे 'नीट' लक्ष आहे का? जर तुमचं लक्ष नसेल तर तुमची मुलं कोणत्या संकटांत सापडू शकतात, कशी अडकू शकतात याचं वास्तववादी चित्र रेगेमध्ये दिसतं. अनिरुद्ध विक्रम रेगे या मुलाची ही गोष्ट असली तरी असा प्रकार कोणत्याही घरात घडू शकतो असा आहे आणि त्याअर्थाने सर्वांनाच भिडू शकेल असा आहे. रेगेची कथा आधुनिक काळाशी पूरक ठरणारी आहेच, पण या रेगेचा हायलाईट आहे त्याचा स्क्रीनप्ले..पटकथा ज्या पद्धतीने गुंफण्यात आलीये त्याला खरंच तोड नाही.

अशा प्रकारची मांडणी तुम्ही हॉलिवूड सिनेमांमध्ये पाहिली असेल पण मराठीत हा प्रयोग पहिल्यांदाच होतोय आणि तेसुद्धा पहिल्यांदाच सिनेमा बनवणार्‍या अभिजीत पानसेकडून...म्हटलं तर हा फ्लॅशबॅकचा खेळ आहे, म्हटलं तर दोन काळ एकमेकात गुंफलेले आहेत. प्रेक्षकांचा गुंता होणार नाही अशा पद्धतीने गुंता सोडवायचा हे अतिशय कठीण आणि कीचकट काम म्हणायला पाहिजे आणि हे जर समजून घ्यायचं असेल तर पहिल्या सीनपासून सिनेमा बघावा लागेल. सुरुवातीचा एक सीन जर तुम्ही मिस केलात तर पुढे घडणारे प्रसंग बघताना तुमचा गोंधळ उडू शकतो. एकएक संदर्भ जोडत दोन गोष्टी एकत्र आणून लेखक आणि दिग्दर्शक अभिजीत पानसेंचा सिनेमा सादर करण्याचा नवा फंडा खरंच अप्रतिम आहे...

काय आहे स्टोरी ?

3regeही गोष्ट आहे अनिरुद्ध विक्रम रेगेची... हा मेडिकलला शेवटच्या वर्षाला शिकतोय, नेहमी पहिला किंवा दुसरा येणारा..घरी श्रीमंती आहे. सगळं सुरळीत असताना अनिरुद्धला भलतेच वेध लागतात. याचदरम्यान एन्काऊंटरचं नवं हत्यार वापरुन गुन्हेगारी टोळ्यांचा वेध घेणारी मुंबई पोलीसांची एक तुकडी आपल्यावरील टीकेचा सामना करतेय. या तुकडीचे प्रमुख, एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांची चौकशी सुरू झालीये, या चौकशीतून बर्‍याच नव्या गोष्टीही बाहेर येतायत. आता या सगळ्याचा रेगेशी काय आणि कसा संबंध आहे ते सिनेमातच बघावं लागेल. अनिरुध्द रेगे आणि प्रदीप शर्मा यांची ही गोष्ट. यात रुढ अर्थाने नायक, खलनायक असं कुणीच नाही. सगळी अगदी खरीखुरी माणसं, प्रत्यक्ष आयुष्यात भेटू शकतील अशी..रेगे सिनेमातली ही आणखी एक जमेची बाजू..जेल, कोर्ट, वकीली भाषा, पोलीसी खाक्या सगळं वातावरण खरंखुरं..एरव्ही सिनेमांमध्ये दिसणारी कोर्टातली डायलॉगबाजी किंवा पोलिसांचा भडकपणा यात कुठेच नाही, यामुळेच जे सांगायचंय ते प्रेक्षकांपर्यंत पोचवण्यात दिग्दर्शकाला पुरेपूर यश आलंय असं म्हणता येईल.

नवीन काय ?

सिनेमात महत्त्वाच्या कॅरेक्टर्सबरोबर आणखी एक कॅरेक्टर आहे आणि ते म्हणजे महेश लिमयेचा कॅमेरा..सिनेमाच्या प्रकृतीला जी सिनेमॅटोग्राफी अपेक्षित होती ती महेशने करेक्ट पुरवलेली आहे. उगाच फ्रेमिंगच्या नादात न अडकता प्रसंग जसा घडतोय तसा वेगवेगळ्या अँगलमधून कॅमेरात पकडण्याचा प्रयत्न महेशने केलाय.त्याचा कॅमेरा त्याने काही ठिकाणी हलता ठेवला असला तरी कथेवर किंवा इमोशनवर तो वरचढ होत नाही हे महत्त्वाचं.. मॉन्टी शर्माचं पार्श्वसंगीतसुध्दा सिनेमाचा परिणाम वाढवणारं झालंय. सिनेमाच्या कथेचा गडदपणा या पार्श्वसंगीताने नक्कीच वाढवलाय. अवधूत गुप्तेने संगीत दिलेलं अस्वस्थ सारे उद्‌ध्वस्त कारे हे गाणंसुध्दा छान जमून आलेलं. एकंदरित, तांत्रिक बाबतीतही सिनेमाचा दर्जा खूपच वरचा आहे.

परफॉर्मन्स

विक्रम गायकवाड यांनी प्रत्येक कॅरेक्टरला दिलेला लूकसुद्धा अस्सल आहे. महेश मांजरेकर यांचा लूक असेल, किंवा डीके शेट्टीच्या रोलमध्ये ओळखूही न येणारा विजू माने असो...या लुक्समुळे कॅरेक्टर्स आणखी जवळची आणि ओळखीची वाटायला लागतात. लूकबरोबरच कलाकारांचा अभिनयही महत्त्वाचा आहेच. महेश मांजरेकर तर काही ठिकाणी फक्त नजरेतून बोलले आहेत.आजचा दिवस माझानंतर पुन्हा एकदा अतिशय संयमितपणे पण तितकाच जोरदार अभिनय त्यांनी साकारलाय. असंच कौतुक पुष्कर श्रोत्रीचंही करावं लागेल. हलक्या-फुलक्या भूमिकांमध्येच दिसणारा पुष्कर रेगेमध्ये कमालीच्या शांतपणे, संयमीपणे,गंभीरपणे वावरलाय. संतोष जुवेकर, प्रवीण तरडे या कलाकारांनीही कुठेही आपलं काम फिल्मी होणार नाही याची पूर्ण काळजी घेतलीये. नवोदित आरोह वेलणकर, ज्याने अनिरुद्ध रेगेची भूमिका साकारलीये, त्यानेसुद्धा नवखेपण कुठेही जाणवू दिलं नाहीये. पूर्ण एनर्जी लावून आणि भूमिकेशी समरस होत त्याने आपलं काम चोख केलंय. छोट्या छोट्या भूमिकांमध्ये दिसणारे अनुभवी कलाकार सिनेमासाठी चांगलेच फायदेशीर ठरलेत. हा सगळा डोलारा नीट बसवल्याबद्दल अभिजीत पानसे यांचं खरंच अभिनंदन करायला हवं. पटकथा, अभिनय, संवाद प्रत्येक बाबतीत जमून आलेला हा रेगे आवर्जून बघावा असा नक्कीच आहे.

रेटिंग 100 पैकी 75

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 15, 2014 09:11 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close