S M L

एका अदभुत 'जर्नी'ची 'हॅपी' गोष्ट !

Sachin Salve | Updated On: Nov 28, 2014 09:47 PM IST

अमोल परचुरे, समीक्षक

चित्रपटसृष्टीच्या इतिहासात काही सिनेमे मैलाचा दगड किंवा अगदी आजच्या आधुनिक शब्दात सांगायचं तर लँडमार्क वगैरे ठरतात, पण 'हॅपी जर्नी'बद्दल बोलायचं तर प्रेक्षकांचा सिनेमा बघण्याच्या प्रवासातला हा मैलाचा दगड ठरू शकतो. विषयापासून आशयापर्यंत, मांडणीपासून अभिनयापर्यंत, तंत्रापासून रंगसंगतीपर्यंत अगदी सगळ्याच बाबतीत 'हॅपी जर्नी' हा समृद्ध अनुभव देणारा आहे. फँटसी हा प्रकार तसा मराठीसाठी नवीनच आहे, पण 'हॅपी जर्नी' मधली फँटसी ही वेगळ्या जगात घेऊन जाणारी किंवा 'फार फार अवे' गावात घडणारी अजिबात नाहीये, ही गोष्ट परीकथेसारखी जरुर आहे. पण, त्यात मानवी नात्यांचे बंध, आजची भाषा, शहरी जगणं याची सुंदर गुंफण सचिन कुंडलकरने केलेली आहे. सिनेमा सुरू झाल्यानंतर लगेचच सचिनची लेखणी आणि कॅमेरा दोघे आपल्याला या जर्नीमध्ये सामील करुन टाकतात आणि मग सिनेमा संपेपर्यंत आपण या प्रवासातले सोबती होऊन जातो.

काय आहे स्टोरी ?

HAPPY 63467 (1)निरंजनला लहानपणीच पैसे कमावण्यासाठी दुबईत पाठवलेलं... घरी पैसे पाठवणं या एकाच ध्यासापोटी त्याचं लक्ष फक्त त्याच्या कामामध्येच, त्यामुळेच तो स्वत:मध्ये गुरफटलेला, काहीसा तुटकपणे वागणारा...त्याची बहीण जानकी ही त्याच्या अगदी उलट आहे. आयुष्यातला प्रत्येक क्षण एंजॉय करायचा हा तिचा फंडा...ती बडबडी आहे, अवखळ आहे, आपल्या भावना लगेच बोलून दाखवणारी आहे.

जानकीला इतक्या वर्षांनंतर भेटल्यावर निरंजनमध्ये काय बदल घडतो, जगाकडे बघण्याची त्याची दृष्टी कशी बदलते याची ही हलकीफुलकी, तरीही तरल गोष्ट आहे. मी जी कथा सांगितली त्यात एक फँटसी किंवा मिस्टरीही दडलेली आहे, पण या मिस्टरीची उकल करण्याची किंवा त्याबद्दल स्पष्टीकरण देण्याची कसलीही उठाठेव लेखकाने केलेली नाही. प्रेक्षकांनी अंदाज बांधावेत, ज्याला जसा हवा तसा अर्थ घ्यावा अशी त्याची अपेक्षा असावी. प्रेक्षक म्हणून तुमच्यासाठीही हा एक आगळा अनुभव ठरु शकेल.

परफॉर्मन्स

happy 63657 (1)सिनेमातली प्रत्येक गोष्ट उच्च दर्जाची असावी असा सचिन कुंडलकरचा आग्रह असणार, कारण कॉश्च्युम्सपासून फ्रेमिंगपर्यंत प्रत्येक गोष्ट खूप छान सजवण्यात आलीये. तांत्रिक बाजू भक्कम आहेच, पण अभिनयातही उच्च दर्जा दिसून येतो. अतुल कुलकर्णीसाठी निरंजनची भूमिका नक्कीच आव्हानात्मक असणार. सुरुवातीला काहीसा तुटक वागणारा, काटकसरी, शिस्तप्रिय असा निरंजन इंटरव्हलनंतर पूर्ण बदलतो. त्याचं चिडणं, वैतागणं, हैराण होणं, प्रेमात पडणं, बेचैन होणं हे सगळं अतुलने खूपच सहज दाखवलंय.

पल्लवी सुभाष सुंदर दिसलीये आणि तिने कामही सुंदर केलंय, सिद्धार्थ मेननने बहुतेक ठरवलं असावं, की आता असा तगडा अभिनय करू की, कुणी आपल्याला नवोदित म्हणूच शकणार नाही, आणि जे ठरवलंय ते त्याने करुन दाखवलंय. हॅपी जर्नीमध्ये सुखद सरप्राईझ म्हणजे चित्रा पालेकर. तीन-चार सीन्समध्येसुद्धा त्यांनी प्रचंड धमाल उडवलीये. पण हॅपी जर्नीची खरी स्टार आहे प्रिया बापट...जानकीचं कॅरेक्टर हे एवढं नाजूक आहे की, त्यावर सगळ्या सिनेमाचा भार आहे. जानकीच्या अवखळपणाचा कुठेही अतिरेक होणार नाही याची प्रियाने पुरेपूर काळजी घेतलीये, फक्त अवखळ रुपच नाही तर काही गंभीर प्रसंगातही तिने अप्रतिम अभिनय केलेला आहे. तिच्या करिअरमधला ही तिची सर्वोत्कृष्ट अदाकारी म्हणायला पाहिजे.

रेटिंग 100 पैकी 80

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 28, 2014 09:47 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close