S M L

फिल्म रिव्ह्यु : 'लोकमान्य एक युगपुरुष'

Sachin Salve | Updated On: Jan 3, 2015 05:19 PM IST

अमोल परचुरे, समीक्षक

जीवनपट हा मराठीमध्ये सर्वात कठीण प्रकार मानला जातो. गेल्या वर्षी काही जीवनपट बघायला मिळाले, पण नायकाचं कर्तृत्व मोठ्या पडद्यावर सिनेमाच्या भाषेत सादर करणं हे क्वचितच जमू शकलेलं आहे. याचं सर्वात मोठं कारण बजेट...इतिहासकाळ उभा करणं यासाठी भव्य सेट्स लागतात, कॉम्प्युटर इफेक्ट्सची किमया साधावी लागते आणि हे सगळं मोठ्या बजेटअभावी शक्य नसतं. त्यामुळे मराठी जीवनपट हे केवळ विचार पोचवण्यापुरतेच उरतात. 'भाग मिल्खा भाग'सारखी 'लार्जर दॅन लाईफ' इमेज मराठीत साकारली जात नाही. पण नवीन वर्षात 'लोकमान्य' या सिनेमाने हे चित्र किंवा हा समज पूर्णपणे बदलून टाकलेला आहे.

लोकमान्याचे तेजस्वी विचार आणि धगधगतं कर्तृत्व दाखवण्यासाठी तेवढ्याच तोलामोलाचा सिनेमा साकारणं हे अतिशय गरजेचं होतं. लोकमान्य सिनेमाच्या टीमने तांत्रिकदृष्टया पैकीच्या पैकी गूण मिळवले आहेत हे अगदी नक्की..अर्थात, इथे सुरुवातीलाच एक गोष्ट स्पष्ट करावी लागेल ती म्हणजे 'लोकमान्य एक युगपुरुष' हा जीवनपट नाही तर बाळ गंगाधर टिळक हे लोकमान्य टिळक कसे बनले, हा प्रवास नेमक्या कोणत्या घटनांमधून झाला याची ही गोष्ट आहे. या सिनेमाचं वैशिष्टय हे की, यात लोकमान्य टिळकांना 'लार्जर दॅन लाईफ इमेज'मध्ये दाखवलं असलं तरी त्यांचं कर्तृत्व आणि त्यांचे विचार हे त्यांचं माणसपणही अधोरेखित करतात. त्यांना इथे देव बनवलेलं नाही तर प्रतिकूल परिस्थितीत एकटा माणूस आपल्या जाज्ज्वल्य वाणीने समाज एकसंध बनवण्यासाठी काय काय करू शकतो याचं प्रेरणादायी चित्रण यामध्ये आहे.

subodh_bhave_lokmanya_tilak (9)काय आहे स्टोरी ?

न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना, केसरी-मराठामधील दिवस, वैचारिक शत्रू तरीही जीवाभावाचे मित्र असलेले गोपाळ गणेश आगरकर, सार्वजनिक गणेशोत्सवाची मुहूर्तमेढ, पुण्यातली प्लेगची साथ, जनरल रँडच्या खूनाच्या कटात सहभाग असल्याच्या आरोपावरुन मंडालेमध्ये रवानगी आणि तुरुंगात गीतारहस्य लेखन या घटनांमधून लोकमान्य टिळक यांचं कर्तृत्व ठळकपणे दर्शवण्यात आलेलं आहे. आता या घटना एवढाच हा सिनेमा नसून यात आपल्याला आजचा काळही दिसतो. पुण्यातील एका वर्तमनपत्रासाठी काम करणारा पत्रकार लोकमान्यांचं चरित्र वाचून झपाटून जातो.

भ्रष्टाचाराची कीड लागलेल्या आजच्या समाजामध्ये बदल घडवून आणण्यासाठी आपणही थोडा वाटा उचलायला हवा असं त्याला वाटायला लागतं, यातून त्याच्या जीवनात काय घडतं आणि काय बिघडतं तेही सिनेमात दिसतं. दोन काळ दाखवून लेखक दिग्दर्शकाला हे सूचित करायचंय की स्वराज्य मिळवण्यासाठी लोकमान्य झटले आणि सुराज्य मिळवण्यासाठी पुन्हा तसाच लढा देण्याची गरज आहे. हा विचार चांगला आहे, प्रेरणादायी आहे तरी सिनेमातल्या मांडणीमुळे तो नैसर्गिक वाटत नाही, उलट हा आशावाद भाबडा वाटायला लागतो. पण सिनेमातल्या या आजच्या काळातील त्रुटींकडे दुर्लक्ष केलं तर एक चांगला, दमदार सिनेमा बघितल्याचा आनंद नक्कीच मिळेल. लोकमान्य टिळक यांची विचारसरणी नेमकी काय पद्धतीची होती, जहाल विचारसरणीचा गाभा काय होता या गोष्टींचं आकलन नक्कीच होतं.

नवीन काय ?

subodh_bhave_lokmanya_tilak (7)लोकमान्य हा सिनेमा मराठी इंडस्ट्रीच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे, कॉम्प्युटर इफेक्ट्स किंवा VFX चा इतका विचारपूर्वक वापर याआधी मराठीत झालेला नाही. शंभर-सव्वाशे वर्षापूर्वीचा काळ बारीक बारीक तपशिलांसह अतिशय प्रभावीपणे उभा करण्यात आलाय. तसंच रंगभूषेबद्दलही सांगता येईल. विक्रम गायकवाड यांनी मेकअप तंत्राची कमाल पुन्हा एकदा लोकमान्यमध्ये दाखवली आहे. लोकमान्य टिळक यांच्या आयुष्यातले विविध टप्पे दिसत असताना वयामुळे त्यांच्या चेहर्‍यात होणारे बदलही स्पष्टपणे दिसतात. इतर सर्व व्यक्तिरेखांवरही अशीच मेहनत घेण्यात आलेली आहे. अजित-समीरचं संगीत सिनेमाच्या विषयाप्रमाणेच तेजस्वी आहे. एकूणच तांत्रिक बाबतीत लोकमान्य सिनेमा खूपच उजवा झालेला आहे यात काही वादच नाही. दिग्दर्शक ओम राऊत याचा हा पहिलाच सिनेमा आहे आणि त्यादृष्टीने त्याच्या टीमने केलेली मेहनत ही नक्कीच कौतुकास्पद आहे.

परफॉर्मन्स

चिन्मय मांडलेकर आणि प्रिया बापट हे आजच्या काळाचं प्रतिनिधित्व करतायत, त्यांच्या वाट्याला जे प्रसंग आलेत ते त्यांनी चांगले निभावले आहेत, पण त्यांच्या व्यक्तिरेखाच जरा बोथट असल्यामुळे त्यांच्या कामाचा फारसा प्रभाव पडत नाही. गोपाळ गणेश आगरकर यांच्या भूमिकेत आहे समीर विद्वांस. लोकमान्यांबरोबर असलेली आगरकरांची वैचारिक लढाई, लोकमान्यांसोबात असलेलं भावनिक नातं अशी काहीशी आव्हानात्मक भूमिका समीरने चांगलीच साकारलीये. दामोदर चाफेकरच्या भूमिकेतील प्रशांत उथळे, दाजी खरेंच्या भूमिकेत अंगद म्हसकर या सर्वांचा अभिनयही उत्तमच झालाय, पण सगळ्यात दमदार भूमिकेत आहे तो सुबोध भावेचा...सुबोध अक्षरश: लोकमान्यांची भूमिका जगलेला आहे. सुबोधच्या आत्तापर्यंतच्या कारकीर्दीतील ही सर्वोत्तम अदाकारी म्हणता येईल. विक्रम गायकवाड यांनी भले सुबोधच्या चेहर्‍याला आकार दिलाय, पण त्यापलीकडे लोकमान्य साकार करणं हे अतिशय अवघड आव्हान सुबोधने अतिशय मेहनतीने पार केलेलं आहे. एकंदरित, मराठी सिनेसृष्टीसाठ नव्या वर्षाची सुरुवात धडाक्यात झालीये.

रेटिंग 100 पैकी 75

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 3, 2015 05:19 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close