S M L

फिल्म रिव्ह्यु : तेवर

Sachin Salve | Updated On: Jan 9, 2015 09:27 PM IST

फिल्म रिव्ह्यु : तेवर

अमोल परचुरे, समीक्षक

2015 या वर्षातला बॉलीवूडचा पहिला मोठा सिनेमा आहे तेवर...अर्जुन कपूर, सोनाक्षी सिन्हा आणि मनोज वाजपेयी अशी तगडी स्टारकास्ट, मोठं बजेट, ऍक्शनपॅक्ड मसाला अशा सगळ्या सुपरहिट सिनेमासाठी आवश्यक असलेल्या गोष्टी या तेवरमध्ये पुरेपूर भरलेल्या आहेत, पण दुदैर्वाने या रेसिपीमधला मसाला आता जुनाट झालाय. कितीही खवय्या असला तरी तो एकाच चवीचा पदार्थ कितीवेळा खाणार ना...! कथेमध्ये काही प्रमाणात नवेपणा असला, टेकिंग कितीही चांगलं असलं तरी तीच ती ऍक्शन बघून आता अक्षय कुमार, अजय देवगण यांनाही कंटाळा येत असेल, मग प्रेक्षकांचं तर विचारायलाच नको...या सिनेमाचा दिग्दर्शक अमित शर्मा तरुण आहे, ऍडफिल्ममेकर आहे पण असे ऍक्शनपॅक्ड आणि दबंग हिरो सिनेमे बनवण्यासाठी जे कौशल्य लागतं ते त्याच्याकडे नाहीये. मुळात हा तेवर म्हणजे तेलुगु 'ओक्कडू'चा रिमेक आहे..ओक्कडू हा सिनेमा आला होता 2003 मध्ये...2003 नंतर या छापाचे अनेक सिनेमे हिंदीतही येऊन गेल्यामुळे तेवर चे तेवर फार एक्सायटिंग वाटत नाहीत.

काय आहे स्टोरी ?

5967tevar45आता या तेवरच्या कथेतला नवेपणा एवढाच आहे की, हिरॉईन आणि हिरो यांची भेट होण्याआधीच व्हिलन हिरॉईनला गाठतो, तिच्या प्रेमात पडतो आणि तिच्याशी लग्न करण्यासाठी आसुसलेला असतो. हिरॉईन अर्थातच विरोध करण्याचा प्रयत्न करते आणि याच प्रयत्नात तिच्या मदतीला धावतो हिरो..पुढे मग व्हिलन आणि हिरो यांच्यात सुरू होतो पाठशिवणीचा खेळ, प्रचंड मारधाड, डायलॉगबाजी, मध्येच आयटम साँग, हिरो आणि हिरॉईनमध्ये प्रेमाचे अंकुर वगैरे फुलतात. मग बॅकग्राऊंडला क्लासिकल गाणं सुरू असताना हिरो-हिरॉईनच्या मागे धावणारे गुंड, गोळीबार वगैरे वगैरे थोडक्यात 'इश्कजादे'पासून 'हिरोपंती'पर्यंत जे जे काही पाहिलं ते सगळं या तेवरमध्ये दिसतं. मनोज वाजपेयी, खुमासदार संवाद आणि लक्ष्मण उतेकरचा कॅमेरा याच सिनेमातल्या सर्वात बळकट गोष्टी आहेत.बरं, इंटरव्हलपर्यंत हिरो आणि व्हीलनमधल्या ठसनमुळे सिनेमात रंगत राहते, पण इंटरव्हलनंतर ती रंगतच निघून जाते. कारण सुडाने पेटलेला मनोज वाजपेयी कमी आणि प्रेमात पडलेले हिरो हिरॉईन जास्त दिसत राहतात. बरं, क्लायमॅक्सलाही वेगळं काही घडत नाही. भरपूर मार खाऊनही व्हीलनची धुलाई करणारा हिरो हे असले प्रकार आता अजिबात नवीन राहिलेले नाहीत आणि याच कारणांमुळे तेवर जुनाट आणि कंटाळवाणा होऊन जातो...

नवीन काय ?

हिरो आहे अर्जुन कपूर...सिनेमात हिरोच्या तोंडी गाणं आहे 'सलमान दा फॅन', म्हणजे सिनेमाभर या सलमानच्या अवताराने काय दबंगगिरी केली असेल याचा अंदाज तुम्हाला येऊ शकतो...बरं, सिनेमात तो स्वत:च म्हणतो, टर्मिनेटर, रॅम्बो आणि सलमान खान हे सगळे एकत्र म्हणजे आपण...आता अर्जुन कपूर पूर्ण ताकदीनिशी ऍक्शन सीन्स करतो, ऍक्शन स्टार म्हणून तो शोभतोसुद्धा...पण अख्ख्या सिनेमाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेणं हे अजून त्याना न झेपणारं आहे. औरंगजेबसारख्या सिनेमात जी अभिनयाची चमक दिसली होती ती तेवरमध्ये ऍक्शन आणि हिरोगिरीच्या नावाखाली ती चमक झाकोळून गेलीये. सोनाक्षी सिन्हासाठी अशा सिनेमात काम करणं हे अजिबात कठीण राहिलेलं नाही. कधी अक्षय कुमार, कधी अजय देवगण, कधी शाहिद कपूर, हिरो बदलत राहतात पण काम तेच करायचं असतं.

परफॉर्मन्स

tevar_manoj_vajpaiतेवर या सिनेमात खरी कमाल आहे ती मनोज वाजपेयीच्या अभिनयाची...गजेंद्र सिंग या खुनशी डोक्याच्या बाहुबलीचा रोल त्याने जबरदस्त केलेला आहे. 'गँग ऑफ वासेपूर'मधला सरदार खान किंवा 'राजनीती' मधला व्हीलन या सगळ्यापेक्षा पूर्णपणे वेगळा अभिनय त्याने साकारलाय. खराखुरा अभिनय म्हणजे काय हे त्याने अर्जुन कपूरलाही आणि समस्त प्रेक्षकांना दाखवून दिलेलं आहे.

रेटिंग 100 पैकी 50

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 9, 2015 09:27 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close