S M L

नव्या दमाचे 'क्लासमेट्स' !

Sachin Salve | Updated On: Jan 17, 2015 06:28 PM IST

नव्या दमाचे 'क्लासमेट्स' !

 

अमोल परचुरे, समीक्षक

कॉलेजचे दिवस, कॉलेजमधली मस्ती, क्लास बंक करणं, कँटिनमधली धमाल, कॉलेजमधली दोस्तीयारी, फ्रेंडशिप, लव्हशिप...कॉलेजमध्ये असताना या सगळ्या गोष्टी आपण एंजॉय करतोच, आता सिनेमांमधूनही आणि खासकरुन मराठी सिनेमांमध्ये हाच कॉलेजचा माहौल हिट फॉर्म्युला बनायला लागलाय. अर्थात, हा फॉर्म्युला यशस्वी होण्यासाठी फक्त दंगामस्ती नाही तर चांगल्या प्लॉटचीही गरज असतेच...क्लासमेट्स हा त्या अर्थानं कॉलेजमधली दोस्तीयारी आणि मर्डरमिस्ट्री याचं चांगलं मिश्रण म्हणता येईल. आदित्य सरपोतदार या तरुण दिग्दर्शकाने आपल्या या चौथ्या सिनेमात 'उलाढाल'मधला सस्पेन्स, 'सतरंगी रे' मधला तरुणाईचा जल्लोष आणि 'नारबाची वाडी'मधला मिष्कीलपणा असा सगळा ऐवज एकत्र केलाय. मुळात हा 'क्लासमेट्स' म्हणजे याच नावाच्या मल्याळम सिनेमाचा ऑफिशिअल रिमेक आहे, पण रिमेक असला तरी त्याची स्टोरीलाईन कायम ठेवून बाकी सगळा मसाला पूर्णपणे बदललाय आणि त्याला खूप चांगला मराठी टच दिलेला आहे. समीर विद्वांस आणि क्षितीज पटवर्धन या लेखकजोडीची किमया त्यादृष्टीने खूप महत्त्वाची आहे.

काय आहे स्टोरी ?

classmate marathi movie

classmate marathi movie

क्लासमेट्सची गोष्ट घडते 1995 च्या आसपास...सत्या, अप्पू, अमित, अनि असे हे वेगवेगळ्या क्लासमधले आणि वेगवेगळ्या वयाचे

क्लासमेट्स, सत्या कॉलेजचा हिरो आहे, म्हणजे असं त्याच्या कॉलेजमधल्या भक्तांना ठामपणे वाटतंय. अनि हा या मित्रमंडळींचा लाडका आहे. त्याच्या मस्करीने आणि त्याच्या गाण्यांनी या क्लासमेट्समध्ये सळसळता उत्साह पसरलेला असतो. सत्या नुसताच विद्यार्थी नाही तर युवाशक्ती पक्षाचा युवा कार्यकर्ताही आहे. सत्याला हिरो न मानणारेसुद्धा कॉलेजमध्ये आहेत. आदिती, हिना आणि जे सत्या गँगपासून तसे अंतर ठेवूनच आहेत. पुढे प्रेम, कॉलेज निवडणूक, हेवेदावे, गैरसमजुती यातून दोस्तीमध्ये दरार, ताटातूट अशा बर्‍याच धक्कादायक गोष्टी घडतात, नेमकं काय धक्कादायक घडतं आणि शेवटी त्याचा कसा उलगडा होतो हे सिनेमातच बघावं लागेल. सध्या एवढंच सांगेन की, नुसती यारीदोस्ती एवढ्‌यापुरताच हा सिनेमा नाहीये. 'दुनियादारी पार्ट टू' वगैरे बोललं जात असलं तरी दुनियादारीपेक्षा खूपच वेगळी अशी गोष्ट आहे हे सांगावंच लागेल.

नवीन काय ?

सिनेमातला सगळ्यात स्ट्राँग पॉईंट म्हणजे सर्व कलाकारांचा जबरदस्त अभिनय...खरंतर सगळेच जण कॉलेजविद्यार्थी म्हणून सूट होत नाहीत, पण या त्रुटीकडे तेच कलाकार आपल्या अभिनयातून दुर्लक्ष करायला लावतात. अंकुश चौधरीने 'दुनियादारी'मधल्या डीएसपीपेक्षा वेगळा आणि तगडा असा सत्या पॉवरफुल साकारलाय. कॉलेजमध्ये जशी त्याची दहशत असते तसाच दरारा संपूर्ण सिनेमात अंकुशच्या अभिनयाचा आहे. सई ताम्हणकरसाठी हा आणखी एक वेगळा रोल...डॅशिंग, टॉमबॉय आणि राडा करायला नेहमी तत्पर अशा अप्पूचा रोल तिने केलाय. तिची आणि राडेबाज असली तरी सत्याबरोबरची केमिस्ट्री, अनिबद्दल असलेला जिव्हाळा, कॉलेजमधल्या राजकारणाने उडालेला गोंधळ अशा अनेक बाजूही तिने उत्तमच साकारल्यात. सोनाली कुलकर्णीसाठीही हा रोल महत्त्वाचा...राजकीय घराण्यातली असल्यामुळे तिच्या वागण्यातला आब, काही प्रमाणात बेफिकीरी, मग तिचा लव्हट्रॅक, पॉलिटीकल ट्रॅक अशा सगळ्या ट्रॅकवर तिने चांगलंच काम केलंय. सचित पाटीलही या सिनेमात एका तडफदार भूमिकेत आहे आणि त्याच्या अभिनयातली तडफही सुखावणारी आहे. टिपिकल हिरो हिरोईनच्या रोलमध्ये कुणाला अडकवलेलं नसल्यामुळे सगळे खूप मोकळेपणाने काम करतात. यातही सर्वात भाव खाऊन जातो सिद्धार्थ चांदेकर...गाणं, नाचणं, मस्करी करणं यापलीकडे प्रत्येकाबरोबर असलेली त्याची फ्रेंडली केमिस्ट्री सिनेमातली हायलाईट ठरते. क्लासमेट्सपासून सिद्धार्थ चांदेकरचं स्टारपण खर्‍याअर्थाने सुरू होणार आहे. सुशांत शेलार, सुयश टिळक, नवोदित पल्लवी पाटील यांनीही आपापल्या रोल्समध्ये मस्तच कामं केलेली आहेत. किशोरी शहाणे यांचा वीस वर्षांनंतरचा मेकअप न पटणारा असला तरीही त्यांचा अभिनय अगदी खणखणीतच झालाय.

परफॉर्मन्स

अभिनयाबरोबरच आणखी एक गोष्ट म्हणजे स्टाईल स्टेटमेंट...1995 मानाने कॉश्च्युम्स बरेच आधुनिक असले तरी सिनेमा त्यामुळे कलरफुल झालाय हे नक्की... सिनेमाचा श्रीमंत लूक या कॉश्च्युम्समुळे आणखी युथफूल झालाय. पण त्याच कॅरेक्टर्सना वीस वर्षानंतरचा लूक देताना मात्र बरीच गडबड झालेय. वेषभूषा, केशभूषा, चेहरेपट्टी यामध्ये वीस वर्षांनंतर होणारे बदल लक्षात घेण्यात आलेले नाहीत.याशिवाय इंटरव्हलनंतर सिनेमाचा वेगही कमी होतो, शेवट थोडा ताणल्यासारखा वाटत राहतो. एवढ्या काही गोष्टी सोडल्या तर क्लासमेट्स हा नव्या जमान्याचा खरा कमर्शिअल सिनेमा आहे असं नक्कीच म्हणता येईल. तांत्रिक बाजू तर उत्तम आहेच, पण सिनेमातली गाणीसुद्धा खूप छान जमून आलेली आहेत...एकंदरित,नव्या दमाचे हे क्लासमेट्स प्रेक्षकांना भावणार एवढं नक्की..

रेटिंग 100 पैकी 70

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 16, 2015 11:35 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close