S M L

फिल्म रिव्ह्यु : 'एक तारा'

Sachin Salve | Updated On: Jan 31, 2015 10:10 PM IST

फिल्म रिव्ह्यु : 'एक तारा'

अमोल परचुरे, समीक्षक

एक तारा हा दिग्दर्शक अवधूत गुप्तेचा सिनेमा...'झेंडा', 'मोरया'नंतर त्याने केला 'जय महाराष्ट्र ढाबा बठिंडा' यामध्ये अवधूतचे सूर जे बिघडले होते ते एक तारामध्ये पुन्हा जुळले आहेत असं नक्कीच म्हणता येईल. स्वत: उत्तम गायक आणि संगीत दिग्दर्शक असल्यामुळे गेल्या पंधरा-वीस वर्षात संगीतक्षेत्रात जे काही घडतंय ते त्याने जवळून बघितलंय, अशाच काही घटनांतून प्रेरित होऊन त्याने 'एक तारा' बनवला. बर्‍याच गोष्टी एकत्र आणायच्या नादात त्याचा थोडा गोंधळ जरुर झालाय पण तरीही प्रेक्षकांसाठी ब-याच पडद्यामागच्या गोष्टी सिनेमात जरुर बघायला मिळतात आणि एक बर्‍यापैकी म्युझिकल फिल्म बघितल्याचं समाधानही मिळू शकेल.

काय आहे स्टोरी ?

ज्ञानेश्वर लोखंडे उर्फ माऊली हा गावातून शहरात आलाय एका रिऍलिटी शोमध्ये भाग घ्यायला. शहरी वातावरणात सुरुवातीला बुजलेला हा माऊली नंतर स्वत:च्या टॅलेंटच्या जोरावर या शोचं विजेतेपद मिळवतो. चॅनेलमध्ये काम करणार्‍या ऊर्जाची त्याला मदत होते. महागायक बनल्यानंतर आणि राज्यभरात लोकप्रिय झाल्यानंतर माऊलीची गायनाच्या क्षेत्रात प्रचंड भरभराट होते, अनेक बरे-वाईट अनुभव त्याला येतात. यातून शिकण्याऐवजी तो बिघडत जातो, त्याची अधोगती सुरू होते आणि शेवटी अशी वेळ येते की, स्वत:ला सिद्ध करण्यासाठी त्याला पुन्हा एकदा हिंदी चॅनेलवरील रिऍलिटी शोमध्ये भाग घ्यावा लागतो. रिऍलिटी शोचं वातावरण, स्टुडिओमधली रेकॉर्डिंग, चॅनेलचा कॉर्पोरेट लूक अशा बर्‍याच गोष्टी अवधूतने चांगल्या उभ्या केल्या आहेत. सुरुवातीच्या भागात कथा वेगवान ठेवण्यावरही लक्ष दिलंय, पण इंटरव्हलनंतर सिनेमा थोडा भरकटलाय, पटकथेत फ्लॅशबॅकची संगती लावण्यातही गडबड झालीये आणि त्यामुळे विषयाचा परिणाम साधण्यात सिनेमा कमी पडलाय.

परफॉर्मन्स

परिणाम साधण्यात सिनेमा कमी पडत असला तरी प्रेक्षकांना बांधून ठेवणार्‍या दोन महत्त्वाच्या गोष्टी यात आहेत. एक म्हणजे संतोष जुवेकरचा पॉवरफुल परफॉर्मन्स, अवधूतच्याच भाषेत सांगायचं तर एकदम चाबूक अभिनय आणि दुसरी गोष्ट म्हणजे सिनेमातली गाणी... संतोष जुवेकरने आत्तापर्यंत बरेच सिनेमे केलेत, पण पहिल्यांदाच त्याला एवढा महत्त्वाचा रोल मिळालाय आणि संतोषने या संधीचं सोनं केलंय. प्रचंड मेहनतीने त्याने माऊली साकारलेला आहे. याच बरोबरीने उर्मिला निंबाळकर आणि सागर कारंडे यांनीही खूपच चांगलं काम केलंय. तेजस्विनी पंडितचा अभिनय चांगला झालाय पण तिचं कॅरेक्टर लिखाणातच कधी लाऊड होतं तर कधी समंजस होतं. यामुळे तिची व्यक्तिरेखा नीट उभी राहत नाही. कलाकाराची शोकांतिका यापूर्वीही अनेक सिनेमात आपण पाहिलेली आहे, त्यादृष्टीने फारसं नवीन या सिनेमात दिसत नाही पण तरीही संतोष जुवेकरच्या अभिनयासाठी आणि ठेका धरायला लावणा-या संगीतासाठी एकदा हा सिनेमा नक्कीच बघू शकता..

रेटिंग 100 पैकी 60

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 31, 2015 10:10 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close