S M L

रिव्ह्यु : बाजी एक 'ग्रँड' अनुभव !

Sachin Salve | Updated On: Feb 7, 2015 03:05 PM IST

रिव्ह्यु : बाजी एक 'ग्रँड' अनुभव !

अमोल परचुरे, समीक्षक

'बाजी' या सिनेमाबद्दल सर्वसामान्य प्रेक्षकांच्या मनात प्रचंड उत्सुकता आहे. एकतर श्रेयस तळपदेचं मराठीत जोरदार कमबॅक आहे, प्रोमोमधून दिसणारं जितेंद्र जोशीचा लूक, अमृता खानविलकरचा नॉन ग्लॅमरस रोल, सुपरहिरो सिनेमा आणि दिग्दर्शक निखिल महाजन. निखिलचा याआधीचा सिनेमा म्हणजे 'पुणे 52'... काही प्रेक्षकांना 'पुणे 52' अबोध वाटला, काहींना कंटाळा आला तर अनेकांनी त्याची तोंडभरुन स्तुती केली. पहिल्याच सिनेमाला असा संमिश्र प्रतिसाद मिळाल्यामुळे कदाचित निखिलने असं ठरवलं असावं की, पुढचा सिनेमा ब्लॉकबस्टर करायचा...'बाजी'मधून त्याने सुपरहिट सिनेमासाठी जे जे आवश्यक आहे ते सगळं एकत्र करुन एक मसाला पॅकेज प्रेक्षकांपुढे सादर केलंय. यात ऍक्शन तर आहेच, ड्रामा आहे, इमोशन्स आहेत, सस्पेन्स आहे, गाणी आहेत, आयटम साँगही आहे. हे पॅकेज निखिलने अतिशय भव्यरित्या पडद्यावर साकारायचा प्रयत्न नक्कीच केलाय, खास निखिल महाजनी स्टाईल टेकिंगने पडदा व्यापून टाकलाय. यामुळेच सिनेमाची लांबी तीन तास असतानाही फारसा कंटाळा येत नाही, पण हेही तितकंच खरं की, आपण एका दंतकथेतल्या आटपाट गावातली गोष्ट बघतोय, फँटसी बघतोय हे लक्षात ठेवा, त्यामुळे हे असं का झालं, असं कसं होऊ शकतं असे प्रश्न मनात आणू नका, नाहीतर मग तुम्हाला सिनेमाची लांबी खटकायला लागेल.

काय आहे स्टोरी ?

श्रीरंगपूर या गावात बाजीची गोष्ट घडते. याआधी मराठीत येऊन गेलेल्या फँटसी सिनेमांमध्ये श्रीरंगपूर येऊन गेलंय. इथेच दिग्दर्शकाला असं सुचवायचं असावं की, नवीन गोष्ट सांगत असलो तरी वातावरण तेच आहे. सस्पेन्स आहे, सरप्राईझेस आहेत, ट्विस्ट आणि टर्न्स आहेत त्यामुळे कथा तर सांगत नाही, एवढंच सांगतो की कथा वळणावळणाची असली, तरी त्यात नावीन्य तसं कमीच आहे. आधी अनेक सिनेमांमध्ये येऊन गेलेली गोष्ट नव्या पॅकेजमध्ये सादर केलीये एवढंच. सिनेमाची आधुनिक दृष्टी असल्यामुळेच ते शक्य झालंय, कॅमेरा, साऊंड, संगीत, कॉश्च्युम्स, ऍक्शन, एडिटिंग, प्रत्येक बाबतीत दर्जेदार काम झाल्यामुळेच सिनेमाचं देखणेपण डोळ्यात भरतं आणि सिनेमात शेवटपर्यंत आपला इंटरेस्ट टिकून राहतो. मराठीच्या दृष्टीने विचार केला तर बाजी एक ग्रँड अनुभव नक्कीच देतो.

परफॉर्मन्स

baji 34सिनेमातला आणखी एक स्ट्राँग पॉईंट म्हणजे सर्वांचा खणखणीत अभिनय...अमृता खानविलकरसाठी नक्कीच वेगळा अनुभव असणार कारण तिने पहिल्यांदाच फारसा मेकअप न करता नॉनग्लॅमरस रोल केलाय. 'बाजी'च्या वाटेकडे डोळे लावून बसलेली गौरी तिने चांगलीच साकारलीये. जितेंद्र जोशीचा खलनायक एवढा जबरदस्त आहे की, मार्तंडच्या वागण्याचा राग यायला लागतो.

क्रूर, खुनशी, लोभाने पछाडलेला मार्तंड साकारताना जितेंद्रने शारिरिक पातळीवरही चांगलीच मेहनत घेतलीये. सगळ्यात आव्हान होतं ते श्रेयससमोर...प्रत्येक भूमिका त्याने वेगवेगळ्या पद्धतीने सादर केलीये, प्रत्येक भूमिकेचा बाज त्याने शेवटपर्यंत जपलाय.

आवाजातून, हालचालींमधून, संवादफेकीतून त्याने वेगळेपण उत्तमरित्या दाखवलेलं आहे. 'एलिझाबेथ एकादशी'मधून लोकप्रिय झालेला पुष्कर लोणारकर, त्याने पुन्हा एकदा छानच काम केलंय. बाकी इला भाटे, प्रियदर्शन जाधव यांचीही कामं चांगली झालीयेत.

रवी जाधव आणि नागराज मंजुळे या दोन भन्नाट लोकप्रिय दिग्दर्शकांना 'बाजी'मध्ये पाहुण्या भूमिकेत सादर करण्याची आयडियासुद्धा चांगलीच वर्क झालीये.

रेटिंग 100 पैकी 70

 

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 7, 2015 03:05 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close