S M L

रिव्ह्यु : बॉम्बे वेल्वेट - सुटाबुटातल्या गँगस्टरची लव्हस्टोरी !

Sachin Salve | Updated On: May 16, 2015 03:31 PM IST

अमोल परचुरे, समीक्षक

बॉम्बे वेल्वेटच्या नामावलीत सुरुवातीलाच 'मार्टिन स्कॉर्सेसी'चा उल्लेख आहे. डिपार्टेड, ह्युगो, शटर आयलंड, गँग्ज ऑफ न्यूयॉर्क, एव्हिएटर एक ना अनेक उत्तमोत्तम सिनेमांचा दिग्दर्शक...मार्टिन स्कॉर्सेसीचा प्रभाव अनुराग कश्यपच्या 150 मिनिटांच्या बॉम्बे वेल्वेटमध्ये जाणवतोच, एखाद्या हॉलीवूड सिनेमात असणारे बारकावे, त्या दर्जाचं टेकिंग हिंदी सिनेमातून दिसणं याबद्दल अनुराग कश्यपचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे, पण टेकिंग, मेकिंग, लायटिंग, सिनेमॅटोग्राफी, एडिटिंग या सगळ्या तांत्रिक बाजूंच्या जोडीला पटकथा तितकीच दमदार झालेली नाही, त्यामुळेच बॉम्बे वेल्वेट हा सिनेमा चांगला आहे, पण अप्रतिम नाही किंवा अनुराग कश्यपचा सर्वोत्तम सिनेमा नव्हे...

काय आहे स्टोरी ?

bv10-mar19'मुंबई फेबल्स' या ग्यान प्रकाश यांच्या पुस्तकावर आधारित बॉम्बे वेल्वेट...जॉनी बलराज या सुटाबुटातल्या गँगस्टरची ही गोष्ट आहे. 1949 साली लहान वयात मुंबईत आलेला बलराज, छोटे मोठे गुन्हे करता करता कैझाद खंबाटा या उद्योगपतीच्या नजरेत भरलेला...पुढे कैझाद खंबाटा हा आपला दुश्मन जिमी मेस्त्रीला संपवण्यासाठी बलराज आणि त्याचा मित्र चिम्मनला कसं वापरतो वगैरे ट्रॅक आहेच, समुद्रात भर टाकून मुंबईची वाढ होत असताना या जमिनीवर आपला हक्क राहावा यासाठी चाललेली उद्योगपतींची लढाई आहे, जास्तीत जास्त जागा आपल्या पदरात पाडण्यासाठी नेते आणि अधिकार्‍यांना वापरणारे उद्योगपती, त्यांची लफडी, त्यासाठी होणारा बॉम्बे वेल्वेट या क्लबचा वापर आणि या सगळ्यावर ग्लिट्झ या डेली टॅब्लॉईडची नजर असा सगळा मामला आहे. याच सगळ्या गदारोळात तोच सुटाबुटातला गँगस्टर आणि जॅझ सिंगर यांची लव्हस्टोरीसुद्धा आहे. मुळात नायक जॉनी बलराजचं जे म्हणणं आहे. तीच सिनेमाची थीम म्हणावी लागेल, 'मी जर तुमची सगळी अनधिकृत कामं करून देतोय, तर माझा योग्य वाटा मिळायलाच हवा'... सगळा संघर्ष हा त्यासाठीच सुरू आहे. जॉनी बलराजचा आणि मुंबईचे लचके तोडणार्‍या उद्योगपतींचाही...

नवीन काय ?

bv15-mar191949 ते 1969 हा काळ.. स्वातंत्र्य मिळाल्यानंतरची सुरुवातीची वर्षं...या काळात मुंबई महानगर आकाराला येत होतं. श्रीमंत विरुद्ध गरीब हा संघर्ष टोकाला गेला नव्हता, पण मराठी, हिंदी विरुद्ध इंग्रजी हा फरक अर्थातच उच्चभ्रू वर्गाकडून जाणीवपूर्वक केला जात होता. मुंबईची सात बेटं एकत्र करुन किंवा रिक्लेमकरुन गगनचुंबी मुंबई उभी करण्याचा प्रयत्न सुरू होता. नरीमन पॉईंटमध्ये मोठमोठे टॉवर बनवायचे, कफ परेडमध्ये बिझनेस हब तयार करायचा असा सगळा डाव होता. श्रीमंतांना आणखी श्रीमंत बनण्याची हाव होती आणि यासाठी कोणत्याही थराला जाण्याची त्यांची तयारी होती, गरिबांना चिरडावं लागलं तरी चालेल, सरकारी नियम आपल्या हवे तसे वळवावे लागले तरी चालेल...कशाचीच पर्वा त्यांना नव्हती...अनुराग कश्यपच्या बॉम्बे वेल्वेटचा हा आहे बॅकड्रॉप..सिनेमा बघण्यापूर्वी मुंबईचा हा इतिहास डोक्यात असणं खूप महत्त्वाचं...

परफॉर्मन्स

bv6-mar19रणबीर कपूरने या सिनेमासाठी विशेष मेहनत केलेली जाणवते. 'रॉकस्टार'पेक्षा जास्त आव्हानात्मक रोल नसला तरी रणबीरने जॉनी बलराजच्या भूमिकेत जान ओतलेली आहे. त्याच्या जोडीला अनुष्का शर्मानेसुद्धा नजरेतून खेळताना कमाल केलीये. क्लबमध्ये जॅझ गाणं सादर करत असताना अनुष्काची मेहनत विशेष जाणवते. मुकेश छाब्रिया या कास्टिंग डायरेक्टरने रणबीरच्या मित्राच्या भूमिकेसाठी शोधलेला सत्यदीप मिश्रा हा चेहरा अभिनयात मस्तच आहे. पण, करण जोहरची निवड तितकीशी पटत नाही. कैझाद खंबाटाच्या अवतारात करण जोहर सूट होतो, पण अभिनयात मात्र थोडा कमी पडतो. के.के.मेननने साकारलेला विश्वास कुलकर्णी हा इन्स्पेक्टरचा रोलसुद्धा मस्त जमून आलाय.

bv17-mar19एकंदरित, अनुराग कश्यपने सिनेमात अनेक लेयर्स एकमेकांत चांगले गुंफलेले आहेत, मग प्रॉब्लेम कुठे झालाय? सिनेमात एका टप्प्यावर यातले कॅरेक्टर्स याआधी आखून दिलेल्या पारंपरिक हिंदी सिनेमातल्या पात्रांप्रमाणे वागायला लागतात, त्यांच्यातला चलाखपणा अचानक गळून पडल्यासारखा वाटतो, हा जो पात्रांचा प्रवास आहे. तो शेवटाकडे घेऊन जाताना त्यांना कंट्रोल करणं हे लेखक मंडळींना जमलेलं नाहीये, आणि मग सिनेमाचा शेवट हा अगदीच अपेक्षित मार्गाने होतो, मग त्यावेळी टेकिंगमधलं वेगळेपणही सिनेमाला सावरू शकत नाही. आणि म्हणूनच, एक चांगला सिनेमा बघितल्याचं समाधान हा सिनेमा देईल, पण अनुराग कश्यपचा सिनेमा बघायला गेलात तर तुमचा थोडा अपेक्षाभंग होऊ शकेल.

रेटिंग 100 पैकी 60

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 16, 2015 03:31 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close