S M L

फिल्म रिव्ह्यु : संदूक

Sachin Salve | Updated On: Jun 6, 2015 04:45 PM IST

फिल्म रिव्ह्यु : संदूक

अमोल परचुरे, समीक्षक

संदूक या सिनेमाचं सर्वात मोठं वैशिष्टय आहे, सर्वात मोठं आकर्षण आहे, सर्वात मोठं बलस्थान आहे सुमित राघवन...सुमित राघवन हा लोभसवाणा, हरहुन्नरी कलाकार थोड्या उशिराच मराठी सिनेमात अवतरला असला तरी हाच 'संदूक ' सिनेमा त्याच्या मराठीतल्या लाँचपॅडसाठी सुयोग्य सिनेमा आहे असं नक्कीच म्हणता येईल. सिनेमातली कथा आहे 1940 मधली, स्वातंत्र्यपूर्व काळातला इंग्रजांच्या विरोधातला भारलेला काळ, याच काळातली एक काल्पनिक गोष्ट सादर करताना प्रेक्षक गुंतून राहील हा महत्त्वाचा निकष पूर्ण झालेला दिसतो आणि यात सुमितची कामगिरी अतिशय महत्त्वाची आहे.

काय आहे स्टोरी ?

sandukही गोष्ट आहे वामनराव अष्टपुत्रे या वेंधळ्या तरुणाची...आधीच्या सर्व पिढ्यांनी पराक्रम गाजवलेला, त्यांच्या तसबिरींपुढे हात जोडल्याशिवाय वामनराव घराबाहेर पडत नाही...घरात बायको आणि मुलगा...या वामनरावाच्या गप्पा मोठमोठ्या, म्हणजे अगदी इंग्रज अधिकार्‍याला इंगा दाखवण्याच्या वगैरे पण प्रत्यक्षात इंग्रज शिपायालाही घाबरणारा...या अशा स्वभावाच्या वामनरावाच्या हातात एक संदूक सापडते आणि मग काय काय होतं त्याची धमाल गोष्ट...दिग्दर्शक अतुल काळे आणि टीमने कोकणातला 1940 चा काळ अतिशय मेहनतीने उभा केलाय, पण त्यापेक्षाही वामनरावला दिवसा पडणारी स्वप्नं आणि वास्तव जग यांची जी बेमालूम सरमिसळ केलीये ती मस्तच जमून आलीये. त्यासाठी जो व्हीएफएक्सचा वापर झालाय तो अतिशय विचारपूर्वक झालेला आहे, मराठीमध्ये क्वचितच असा विचार झालेला दिसतो, म्हणून या स्पेशल इफेक्ट्सचं यश महत्त्वाचं आहे.

परफॉर्मन्स

अजित रेड्डीचा कॅमेरा, सर्वेश परबचं एडिटिंग, अजित-समीरचं संगीत या सगळ्याच गोष्टी जमून आलेल्या आहेत. 'चांद तू नभातला' हे गाणं स्वतंत्रपणे ऐकलं तर खूपच गोड आहे, पण सिनेमातल्या काळाशी ते सुसंगत वाटत नाही. बाकी गाणी आणि बॅकग्राऊंड म्युझिक चांगलं झालंय. संदूक अभिनयाबद्दल बोलताना पुन्हा सुमितबद्दल... 90 टक्के मराठी सिनेमातला विनोद हा थिल्लर असतो किंवा मनोरंजन न करणारा असतो. सुमितची विनोदाची समज, त्याची अभिनयाची पातळी ही खूपच वेगळ्या दर्जाची आहे. मराठीला अशाच दर्जेदार विनोदाची गरज आहे, आणि ही गरज पूर्ण करू शकेल, संदूकमधील भूमिकेला न्याय देऊ शकेल असा एकमेव कलाकार म्हणजे सुमित राघवन हेच आपलं ठाम मत होऊन जातं. दिग्दर्शकाने इतर कलाकारांची निवडही अचूक केलेली असल्यामुळे मामला फिट्ट झालेला आहे. भार्गवी चिरमुलेने साकारलेली वामनरावांच्या बायकोची भूमिका एकसुरी वाटत नाही हेही महत्त्वाचं आहे. बाकी कलाकारांची निवड करताना दिग्दर्शकाने तगडे कलाकार घेतल्यामुळे संदूक आणखी आकर्षक झालेली आहे. राहुल मेहेंदळे, अरुण नलावडे आणि शरद पेांक्षे या सर्वांचा अभिनय लक्षात राहणारा आहे.

रेटिंग 100 पैकी 75

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 6, 2015 04:45 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close