S M L

रिव्ह्यु : 'किल्ला'

Sachin Salve | Updated On: Jun 26, 2015 11:51 PM IST

रिव्ह्यु : 'किल्ला'

किल्ला... हा सिनेमा म्हणजे अविनाश अरुण या दिग्दर्शकाने प्रेक्षकांना दिलेली एक सुंदर भेट आहे. सर्वार्थाने सुंदर सिनेमा म्हणजे काय याचं अतिशय ठळक उदाहरण म्हणजे किल्ला...कोणत्याही वयातील प्रेक्षक असूदे, तो या सिनेमाशी रिलेट होईल अशी सिनेमाची मांडणी... सिनेमात शाळकरी मुलं आहेत म्हणून हा लहान मुलांचा सिेनमा आहे असा शिक्का मारणं म्हणजे सिनेमावर केलेला अन्याय असेल. गोष्ट जरी चिन्मय काळे या मुलाभोवती फिरणारी असली तरी हा काही लहान मुलांचं मनोरंजन करण्यासाठी बनवलेला सिनेमा नव्हे...इराणी सिनेमांच्या मागे धावून लहान मुलांच्या भावविश्वातले वगैरे सिनेमे बनवण्याची जी फॅशन आलेली होती त्याला छेद देणारा हा किल्ला...ज्यांनी लहानपणी सुट्टीचा काळ गावी घालवलाय, किंवा ज्यांचं बालपण गावामध्ये गेलेलं आहे अशा सगळ्यांसाठी हा सिनेमा म्हणजे एक नॉस्टॅल्जिया ठरेल.

काय आहे स्टोरी ?

ही गोष्ट आहे चिन्मय काळे या मुलाची आणि त्याच्या आईची...चिन्मयची आई सरकारी नोकरीत आहे.. पुण्यातून तिची कोकणात बदली होते आणि मग चिन्मयचा नवीन जगात प्रवेश होतो. नवीन शाळा, नवीन मित्र, नवीन वातावरण...अभ्यासात खूप हुशार पण काहीसा बुजरा असलेला चिन्मय हळूहळू खुलायला लागतो. यात त्याची आणि आईच्या नात्याची गोष्ट आहे, शाळेतल्या मित्रांच्या मैत्रीची गोष्ट आहे, चिन्मयमध्ये होणार्‍या बदलांची गोष्ट आहे.

परफॉर्मन्स

अविनाश अरुणचं खास कौतुक करावं लागेल कारण त्याने 'किल्ला'ची तटबंदी म्हणजेच पटकथा एवढी मजबूत केलेली आहे की ती शेवटपर्यंत कुठेही ढासळत नाही. कुठेही उगाच फाफटपसारा नाहीये, त्यामुळे आपला कनेक्ट शेवटपर्यंत कायम राहतो...आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोकणाचं निसर्गसौंदर्य...निसर्गाने कोकणाला जे भरभरुन दिलंय ते एवढ्या सुंदर पद्धतीने आत्तापर्यंत कोणत्याही मराठी सिनेमात बघायला मिळालं नव्हतं.

लाईटहाऊस, समुद्र, सागरी किल्ला या गोष्टी केवळ लोकेशन म्हणून सिनेमात येत नाहीत, उलट हा सीन याच ठिकाणी करेक्ट वाटतोय असंच मनात वाटत राहतं. फ्रेमिंगबद्दलही असंच सांगता येईल. प्रत्येक फ्रेमवर खूप मेहनत घेण्यात आलेली आहे. समुद्रातली चिन्मयची सफरसुद्धा चिन्मयसारखीच आपल्यालाही आनंद देऊन जाणारी आहे. त्यात सिनेमातला प्रत्येक कलाकार हा सहज आणि नैसर्गिक अभिनय करतो, हीसुद्धा दिग्दर्शकाचीच कमाल म्हणायला हवी...लहान वयाच्या कलाकारांकडून अतिशय नैसर्गिक अभिनय करुन घेणं हेही फारसं कधी झालं नव्हतं...त्यातही अर्चित देवधर आणि पार्थ भालेराव यांनी खरी कमाल केलीये. अर्चितने याआधीच 'सिध्दान्त'मधून चुणूक दाखवली होतीच आणि पार्थनेसुद्धा भूतनाथ रिटर्न्समधून आपल्या अभिनयाचा तडका पेश केला होता. इथेही दोघांनी आणि त्यांच्या गँगने छोट्या छोट्या बारकाव्यांसह,अमृता सुभाष, श्रीकांत यादव, उमेश जगताप, देवेंद्र गायकवाड यांनीही अभिनयाची छाप पाडलीये.

रेटिंग 100 पैकी 90

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 26, 2015 11:51 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close