S M L

फिल्म रिव्ह्यु : 'बजरंगी भाईजान'

Sachin Salve | Updated On: Jul 18, 2015 03:11 PM IST

अमोल परचुरे, समीक्षक

सलमान खानचे तमाम फॅन्स ज्या सिनेमाची अतिशय आतुरतेने वाट बघत होते तो अखेर रिलीज झालेला आहे...बजरंगी भाईजान... यापूर्वी सलमानच्या सिनेमांनी बॉक्स ऑफिसवर जेवढी कमाई केली ते विक्रम हा सिनेमा मोडणार का एवढाच या फॅन्ससाठी महत्त्वाचा विषय असतो. सिनेमा संपताच 'हिट है बॉस' असा पुकारा करत थिएटरबाहेर पडणार्‍या या फॅन्सना सिनेमा चांगला आहे की वाईट आहे याची काही पडलेली नसते, पण बाकी तमाम प्रेक्षकांच्या दृष्टीने महत्त्वाचं काय असतं तर सिनेमा कसा आहे...तर बजरंगी भाईजान हा अगदीच टिपिकल सलमान खान सिनेमा नाहीये, पण तसंच त्यामध्ये लॉजिकही नाहीये. कबीर खान दिग्दर्शक असल्यामुळे त्याने सिनेमातून संदेश देण्याचा वगैरे प्रयत्न केलाय एवढंच... तुम्हाला तुमच्या धर्माचा जेवढा अभिमान आहे तितकाच दुसर्‍या धर्माचाही आदर करा असा हा संदेश आहे आणि इथं सलमान खान 'दबंग' किंवा 'बॉडीगार्ड' स्टाईलमध्ये नाहीये, उलट निरागस आणि पापभीरु अवतारात आहे. 'पीके'सारखी यात भाषणबाजी नाही, उलट छोट्या छोट्या संवादांतून प्रेक्षकांनाच हसता हसता चिमटे काढणारा हा सिनेमा आहे.

काय आहे स्टोरी ?

bajrangi2-may29पवनकुमार चतुर्वेदी अर्थात सलमान खान हा आहे हनुमानभक्त, वडिल आरएसएसच्या शाखेत जाणारे, कुस्तीच्या आखाड्यात पहिलवानांना लोळवणारे...तर अशा संस्कारात वाढलेला पवनकुमार कधी खोटं बोलत नाही, कधी कुणाला फसवत नाही. रसिका म्हणजे करिना कपूरच्या प्रेमात असणार्‍या पवनला एक सहा वर्षांची मुलगी सापडते. ही मुन्नी पाकिस्तानमधून आलेली, पण ती मुकी असल्यामुळे ती कुणालाच खरं सांगू शकत नाही. मग ती कुठून आली असेल याचा शोध सुरू होतो आणि मग पवन या मुन्नीला तिच्या आईपर्यंत पोचवण्याचं वचन घेतो आणि अर्थातच ते पूर्ण करतो. आता आश्चर्य म्हणजे श्रीहरी साठे या मराठी दिग्दर्शकाने 'दुख्तर' नावाचा जो पाकिस्तानी सिनेमा बनवला, त्याची कथासुद्धा अशीच आहे. आता हा योगायोग आहे की, उचलेगिरी ते आत्तातरी सांगता येणार नाही... तर ते असो, पण बजरंगी भाईजानमध्ये मुळात ही कथा घडून यावी यासाठी जे काही केलंय त्यात लॉजिक अजिबात नाहीये. एकदा हे मान्य केलं की मग पुढे सिनेमा तुम्ही एंजॉय करु शकाल.

नवीन काय ?

bajrangi7-may29आपल्या देशात इतर धर्माबद्दल जे पूर्वग्रह असतात त्यावर या सिनेमात हसत-खेळत भाष्य करण्यात आलंय. हसत-खेळत म्हणण्यापेक्षा प्रेक्षकांना चिमटे काढण्याचं कामच कबीर खानने केलेलं आहे. 'त्वचेचा रंग गोरा म्हणजे ब्राम्हण' अशा समजुतींचाही चांगलाच समाचार घेतलाय. पवनकुमार चतुर्वेदीला मुन्नी ही पाकिस्तानातून आलीये हे समजेपय्रंत बरेच गैरसमज आणि गमती जमती घडत राहतात...पण एकदा हा पवनकुमार या मुन्नीला घेऊन पाकिस्तानमध्ये जायला निघतो तिथपासून सिनेमा संपेपर्यंत फिल्मी ड्रामा, रोना-धोना, पाठलाग अशा गोष्टी बघत बसाव्या लागतात. हिरोला लार्जर दॅन लाईफ दाखवण्यासाठी मग बराच आटापिटा सुरु राहतो. शेवटी तर भारत-पाक बॉर्डरवर हिरोचा जयजयकार करायला दोन्ही देशांमधले लोक येऊन गर्दी करतात. क्लायमॅक्सला तर सलमान महात्मा गांधींसारखी हातात काठी घेऊन अवतरतो, म्हणजे यातून नेमकं दिग्दर्शकाला काय सुचवायचंय हाच प्रश्न पडतो. इंटरव्हलनंतर बराच फिल्मीपणा असला तरी दिलासा म्हणून नवाझुद्दीन असतो हेच आपलं भाग्य...

परफॉर्मन्स

bajrangi11-may29हा सिनेमा जरी तुम्ही सलमानसाठी बघायला गेलात तरी चिमुरडी सुपरक्यूट हर्षाली, जिने मुन्नीची भूमिका केलीये, वही आपका 'दिल जित लेगी...'ती दिसतेच गोंडस, आणि तिने अभिनयही सुंदर केलाय. तिच्याकडून अभिनय करुन घेण्याचं श्रेय कबीर खानला द्यायलाच हवं. नाही म्हणायला काही प्रसंगात कबीर खानने सलमानलाही अभिनय करायला लावलेलं आहे. बिचार्‍या करिना कपूरला फारशी महत्त्वाची भूमिका नाहीये. इंटरव्हलनंतर तर तिला प्रेक्षक विसरुनच जातात, आणि इंटरव्हलनंतर एंट्री असूनही नवाझुद्दीन सलमानइतकाच भाव खाऊन जातो.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 18, 2015 03:11 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close