S M L

फिल्म रिव्ह्यु : तू हि रे

Sachin Salve | Updated On: Sep 4, 2015 10:47 PM IST

अमोल परचुरे, समीक्षक

'दुनियादारी' सुपरहिट झाल्यानंतर संजय जाधव, स्वप्निल जोशी, सई ताम्हणकर यांच्या प्रत्येक सिनेमाबद्दल प्रचंड उत्सुकता निर्माण होत असते, निर्माण केली जाते... प्यारवाली लव्हस्टोरीची सॅडवाली लव्हस्टोरी झाल्यानंतर आता तू हि रे, चा बराच बोलबाला झाला, दिग्दर्शक संजय जाधवच्या क्रिएटिव्हीटीवर विश्वास ठेवून पुन्हा अपेक्षा निर्माण झाल्या, किंवा निर्माण केल्या गेल्या, पण या अपेक्षा पूर्ण करण्यात संजय जाधव अँड टीम पूर्णपणे अपयशी ठरलेली आहे.

खरंतर, 'दुनियादारी' आधीचा संजय जाधव आठवला तर 'चेकमेट' आणि 'रिंगा रिंगा' मधून त्याने नवीन प्रयोग केले होते. कुणीतरी आहे, जो मराठीच्या त्याच त्याच सिनेमांना नवी वाट दाखवण्याचा प्रयत्न करतोय असं वाटत होतं. अर्थात, त्या सिनेमांना प्रेक्षकांनी फारसा प्रतिसाद न दिल्यामुळे पुन्हा त्याच मळलेल्या वाटेवरुन चालण्याची अगतिकता संजय जाधवमध्ये आली असावी...जे काही कारण असेल ते, पण 'तू हि रे' बघून 'ऐसा क्या हुआ रे, ऐसा क्यू हुआ रे' असंच म्हणावंसं वाटतं.

काय आहे स्टोरी ?

tu hi re movie (2)'तू हि रे' ची गोष्ट अगदी थोडक्यात सांगता येईल, अर्थात मी ती सांगणार नाहीये, कारण सिनेमा बघणारच असाल तर तुमची उत्सुकता टिकून राहू दे... थोडक्यात सांगता येईल, म्हणजे कथेचा जीव तसा लहान आहे, पण त्यात प्रेमाचं, लाडिक सीन्सचं, गाण्यांचं असं भरपूर पाणी घातलेलं आहे. सिनेमाच्या सुरुवातीलाच काही ट्विस्ट आहेत, ज्यामुळे कथा भराभर पुढे सरकणार, काहीतरी भन्नाट बघायला मिळणार असं वाटायला लागतं.

पण पुढे बराच वेळ रेंगाळल्यानंतर, कथा थोडी पुढे सरकते, पुन्हा एक ट्विस्ट...मग इंटरव्हल, मग परत आपल्याला आळस-बिळसtu hi re movie (1) द्यायला, मोबाईलमध्ये व्हॉट्सअपवर चॅट करायला बराच वेळ दिल्यानंतर कथा शेवटाकडे येते, क्लायमॅक्सला बर्‍यापैकी रंगत आणून सिनेमा संपवलेला आहे. प्रेमाचं नातं किती घट्ट आहे हेच येऊन-जाऊन सगळ्या सिनेमात दाखवलं जातंय, तेच याही सिनेमात दाखवलंय. साऊथच्या सिनेमातून प्रभावित व्हायचं आणि त्यात मराठमोळं आणि झकपक पाणी घालायचं हा मराठी इंडस्ट्रीचा नवा फंडा दिसतोय. संजय जाधवने हा फंडा फार मनावर घेऊ नये एवढीच अपेक्षा आहे.

उणीवा

तू हि रे... यात लव्ह ट्रँगल नाहीये, यात डबल रोलही नाहीये, खरंतर, पटकथेवर मेहनत घेऊन भरमसाठ अनावश्यक प्रसंगांना कागदावरच कात्री लावायला हवी होती. जर तसं झालं असतं तर एक मस्त बंदिस्त पटकथा तयार झाली असती, भले एक किंवा दीड तासाचा सिनेमा बनला असता तरी तो गाण्यांसकट सर्वांना आवडणारा सिनेमा बनला असता, दुदैर्वाने तसं झालं नाही, रंगसंगती, भव्यपणा, भरजरी कपडे हे सगळं सिनेमा श्रीमंत दिसण्यासाठी महत्त्वाचं आहे, पण त्यामुळे कमाईच्या दृष्टीने मराठी इंडस्ट्रीला काही फायदा होत नाहीये हेसुद्धा लक्षात घ्यायला हवं.

इतकी वर्षं इंडस्ट्रीत घालवल्यानंतर संजय जाधव, स्वप्निल जोशी अशा सगळ्यांनी ती जबाबदारी घ्यायला पाहिजे, तसं जर झालंच तर आपोआपच तू हि रे सारखे सिनेमे आपल्या वाट्याला येणार नाहीत.

रेटिंग 100 पैकी 40

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 4, 2015 10:47 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close