S M L

कमबॅक ऐश्वर्याचं 'जज्बा' इरफानचा

Sachin Salve | Updated On: Oct 10, 2015 07:02 PM IST

कमबॅक ऐश्वर्याचं 'जज्बा' इरफानचा

अमोल परचुरे, समीक्षक

जज्बा हा सिनेमा ऐश्वर्या रायचा कमबॅक सिनेमा असल्यामुळे बराच चर्चेत आहे. पाच वर्षांनंतर ऐश्वर्या तगड्या रोलमध्ये मोठ्या पडद्यावर दिसणार म्हणून तिचे फॅन्स खूपच उत्साहात असणार. ऐश्वर्याच्या कमबॅकची चर्चा असली तरी जज्बा बघून बाहेर पडल्यावर चर्चा होईल ती इरफान खानचीच...गेल्याच आठवड्यात रिलीज झालेल्या 'तलवार'मधला इरफान खानचा अभिनय विसरत नाही तोच त्याचा आणखी एक खणखणीत आणि सणसणीत परफॉर्मन्स बघायला मिळाला. त्यामुळे कमबॅक ऐश्वर्याचं, पण जज्बा आणि जुनून इरफान खानचा असंच सिनेमाचं वर्णन करावं लागेल.

jazbaaसंजय गुप्ताने आतापर्यंत अनेक कोरियन सिनेमे तसेच्या तसे उचलून हिंदीमध्ये आणले, यावेळीही त्याने निवडला एक कोरियन सिनेमा 'सेव्हन डेज'...खरंतर अशाप्रकारच्या सिेनमांची संजय गुप्ताची प्रवृत्ती नाही, चार-पाच मोठे स्टार्स, दणदणीत ऍक्शन आणि हिरव्या-पिवळ्या रंगातला सिनेमा...जज्बामध्ये मात्र पहिल्यांदाच त्याने जास्त वळणं न घेणार्‍या कथेवर काम करुन सिनेमा बनवलेला आहे, त्यामुळे त्या अर्थाने संजय गुप्ता त्यात बर्‍यापैकी यशस्वी ठरलाय असं म्हणता येईल.

काय स्टोरी ?

जज्बा मध्ये ऐश्वर्या राय आहे एक अतिशय प्रतिष्ठीत आणि कधीही केस न हरणारी अशी वकील आहे. तिच्या मुलीचं अपहरण झालंय आणि त्याबदल्यात अपहरणकर्त्यांची मागणी आहे की फाशीची शिक्षा होऊ शकेल अशा गुन्हेगाराला तिला सोडवायचं आहे. तिच्या प्रत्येक हालचालींवर अपहरणकर्त्यांची बारीक नजर आहे, त्यातून स्वत:ची आणि मुलीची सुटका करण्याचं तिच्यासमोर आव्हान आहे.

एका आईचा जज्बा तिला या संकटातून कसा सोडवतो त्याची ही गोष्ट आहे. सिनेमा दोन तासांचाच आहे आणि कथा बर्‍यापैकी वेगवान ठेवण्यात आलेली आहे. एकाच कडव्याचं असलं तरी याही सिनेमात आयटम साँग आहेच, या अशा गोष्टी कमी करुन सिेनमाची लांबी थोडी आणखी कमी झाली असती, पण मी आधी म्हटल्याप्रमाणे, संजय गुप्ताच्या याआधीच्या सिनेमांशी तुलना केली तर सिनेमा जमून गेलाय असंच सांगेन...

नवीन काय ?

jazaba_irfan copyसिनेमातली आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे मुंबईच्या डोक्यावरुन फिरणारा कॅमेरा...दक्षिण मुंबई, वांदे्र-वरळी सी लिंक किंवा माझगाव डॉकचा परिसर आकाशातून बघताना सुंदरच दिसतो, भव्य वाटतो, एका वेगळ्या अँगलमधून मुंबईचं दर्शन घडतं आणि त्याला संजय गुप्ता स्टाईल हिरवा-निळा मुलामा आहेच. या वेगळ्या अँगलसारखाच एक वेगळाच अँगल आहे इरफानच्या ऍक्टींगचा आणि जबरदस्त संवादांचा...ऐश्वर्या रायनेही पाच वर्षांनंतर कमबॅक करत दमदार अभिनय केलाय. एकंदरीतच तब्बल 5 वर्षांनंतर पुन्हा एकदा ऐश्वर्या आपल्या चाहत्यांच्या भेटीला आलीये.

रेटिंग 100 पैकी 60

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 10, 2015 07:02 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close