S M L

फिल्म रिव्ह्यु : अॅक्शन 'गुरू'

Sachin Salve | Updated On: Jan 22, 2016 10:33 PM IST

अमोल परचुरे, समीक्षक

मराठी सिनेमाचं बलस्थान काय तर आशय... कथा हा मराठी सिनेमाचा आत्मा आहे, अशी वाक्य अनेक परिसंवादांमधून तुम्ही ऐकली असतील...पण हे असं म्हणण्याचं मुख्य कारण म्हणजे आपल्या मराठीत शाहरुख आणि सलमानसारखे स्टार नाहीत. ज्यांच्या केवळ नावावर सिनेमा भरपूर गल्ला जमवू शकेल... 'लय भारी'नंतर चित्र थोडं बदललं, आणि आता 'गुरू'ने 'दबंग' आणि 'रावडी राठोड'चा मार्ग मराठीसाठी खुला केलाय. चोखंदळ आणि आशयघन सिनेमांच्या दर्दी प्रेक्षकांना हा मार्ग कदाचित रुचणार नाही. पण आज मोठ्या वर्गाला ज्या प्रकारच्या मनोरंजनाची भूक आहे, ती मिटवण्यात 'गुरू' सारख्या सिनेमांनी यश मिळवलंय असं नक्कीच म्हणता येईल. हिरोची लार्जर दॅन लाईफ इमेज आणि ऍक्शनपासून कॉमेडीपर्यंत सगळा मसाला ठासून भरलेला हा 'गुरू' तुम्हाला तरच आवडू शकेल जर तुम्ही रोहित शेट्टीच्या सिनेमांचे फॅन असाल...आशय, लॉजिक असल्या गोष्टी शोधत बसलात तर मात्र तुमची फसगत होऊ शकेल.

नवीन काय ?

guruuu_620x400गुरु सारख्या सिनेमांची समीक्षा करणं तसं कठीणच...म्हणजे पटकथा आणखी बंदिस्त हवी होती किंवा सुरुवातीला ज्या वेगात सिेनमा पुढे सरकतो, तो वेग पुढे मंदावतो वगैरे डायलॉग बोलण्यात तसा काही अर्थ नाही. सिनेमा संजय जाधवचा आहे, त्यामुळे तो चकचकीत आहे, कॉश्च्युम्स आणि अगदी VFXवरसुद्धा खास मेहनत घेतलेली आहे.

दक्षिणेतल्या ऍक्शनपॅक्ड एंटरटेनर सिनेमांचा ट्रेंड मराठीत रुजवण्यासाठी जे जे करता येईल ते सगळं यामध्ये आहे. नुसतीच मारधाड आणि स्टाईलबाजी न दाखवता मेगासिटी प्रकल्पामुळे होणारं गावांचं नुकसान असा ट्रॅकही कथेत आहे. एक थंड डोक्याचा आणि एक आक्रस्ताळ्या स्वभावाचा अशी खलनायकांची जोडीसुद्धा आहे. कथेमध्ये फारसं महत्त्वाचं नसलेलं, पण सिनेमाची शोभा वाढवणारं नायिकेचं पात्रही आहे. थोडक्यात, मनोरंजनाचं पॅकेज आहे आणि संजय जाधवच्या अलीकडच्या सिनेमांच्या तुलनेत ते ब-यापैकी जमूनही आलंय.

परफॉर्मन्स

guru_marathi_movie (1)'गुरू'ची जान आहे अंकुश चौधरी... सगळं काही अंकुशच्या कामगिरीवर अवलंबून होतं, 2015 मध्ये वेगवेगळ्या सिनेमात साकारलेल्या भूमिका इथे अंकुशला एकाच सिनेमात साकारायच्या होत्या... भुरटा चोर, प्रियकर, ऍक्शनवीर, गावकर्‍यांच्या दु:खानं हळवा होणारा अशा सगळ्या रुपात अंकुशने जबरदस्त काम केलंय. दाक्षिणात्य सिनेमात धनुषसारख्या किरकोळ शरीरयष्टी असलेल्या हिरोची ऍक्शन आपण खपवून घेतो, अगदी तसंच पिळदार वगैरे शरीरयष्टी नसतानाही अंकुश दहा-बारा जणांना लोळवतो हे बघताना प्रेक्षक एंजॉय करतील.

कन्व्हीन्स करणं हे अंकुशला आता व्यवस्थित जमलेलं आहे. प्यारवाली लव्हस्टोरी मध्ये उर्मिलाने आक्रमक, बिनधास्त भूमिका मस्त रंगवली होती, गुरुमध्ये सुद्धा नायिका म्हणून तिच्या वाट्याला जे काही आलंय ती जबाबदारी चांगली निभावलीये. मुरली शर्माने साकारलेला खलनायक फुल्ल फिल्मी आणि लाऊड आहे, जो अशा प्रकारच्या सिनेमात हवाच असतो. रविंद्र मंकणी, ज्योती चांदेकर, अविनाश नारकर या इतर कलकारांनीही चांगलीच कामं केली आहे.

रेटिंग 100 पैकी 60

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 22, 2016 10:33 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close