S M L

रिव्ह्यु :'अनुमती'

Sachin Salve | Updated On: Jun 15, 2013 09:23 PM IST

रिव्ह्यु :'अनुमती'

अमोल परचुरे,समीक्षक

15 जून : अनेक फिल्म फेस्टिव्हलमध्ये गाजलेला आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विक्रम गोखलेंचा राष्ट्रीय पुरस्कारानं झालेला गौरव...प्रेक्षक कोणताही असो, त्याच्या काळजाला भिडण्याची ताकद विक्रम गोखलेंमध्ये नक्कीच आहे. आजपर्यंत अनेक भूमिकांमधून त्यांनी आपला सशक्त अभिनय सादर केलेला आहे. 'अग्निपथ' सारखा फिल्मी प्रकार असेल किंवा बॅरिस्टर सारखं नाटक असेल, अशा असंख्य भूमिका त्यांनी साकारल्या आणि अभिनेता म्हणजे नक्की काय किंवा अभिनय म्हणजे नक्की काय याचा प्रत्यय दिला. अर्थात, एवढ्या सशक्त अभिनेत्याची अभिनयाची भूकही तेवढीच मोठी असते, हेच जाणवतं अनुमती या सिनेमात... त्यांच्या इतर भूमिकांशी तुलना करणं योग्य नाही पण तरीही सिनेमा संपल्यानंतर वाटून जातं की विक्रम गोखलेंचा हा आत्तापर्यंतचा सगळ्यात स्ट्राँग अभिनय असावा. सिनेमाची कथा, त्यातील व्यक्तिरेखा, त्यांचं सुख-दु:ख या सगळ्याशी प्रेक्षक एकरुप होऊन जातो तो केवळ आणि केवळ मुख्य भूमिकेतील विक्रम गोखले यांच्यामुळेच...

anumati marahti movie

काय आहे स्टोरी ?

'अनुमती'हा सिनेमा आहे सामान्य माणसाचं दु:ख दाखवणारा... सिनेमाचा विषय प्रातिनिधीक मानला तर एक लक्षात येईल, सध्याच्या जगात सामान्य मध्यमवर्गीय माणूस हा किती पिचलेला आहे, किती हतबल आहे हे वास्तव ठसठशीतपणे दाखवलेलं आहे. आपल्या पत्नीचं मरण अटळ आहे. हे डॉक्टरांकडून सांगितलं जात असलं तरी तिला वाचवण्यासाठी संघर्ष करणार्‍या नवर्‍याची गोष्ट आहे 'अनुमती'...स्वत:चा मुलगा, मुलगी, इतर नातेवाईक यापैकी कोणीही मदत करत नसताना हा नवरा आपल्या बायकोला वाचवण्यासाठी जे जे करता येईल ते सगळं करतो. सगळीकडे अपयश येत असलं तरी तो हरत नाही, प्रसंगी गावचं घर विकायला तयार होतो, कारण एकच त्याचं आपल्या बायकोवर जीवापाड प्रेम असतं. नातेसंबंध, भावबंध, या बरोबरीनंच समाजाचा स्वार्थी आणि आप्पलपोटी चेहरासुध्दा या सिनेमातून दिसतो.

का पाहावा ?

अभिनयदृष्ट्या संपन्न असलेला हा अनुमती, सिनेमा म्हणून मात्र परिपूर्ण वाटत नाही. कथा, पटकथा, संवाद, दिग्दर्शक आणि संगीत अशी पंचरंगी जबाबदारी गजेंद्र अहिरे यांनी पार पाडली आहे. दिग्दर्शक म्हणून मात्र त्यांची विषयावरची घट्ट पकड जाणवत नाही. पटकथेतील कौटुंबिक संघर्ष, भावबंध हे दृश्यरुपात मांडत असताना अनेक ठिकाणी रेंगाळले आहेत, काही दृश्यांची संगती लावतानाही प्रेक्षकांचा गोंधळ होऊ शकतो. अर्थात, अशा त्रुटी सोडल्या तर सिनेमा कमालीचा इन्टेन्स झालाय हे नक्की.

 

अर्थात, यात महत्त्वाचा भाग आहे तो अभिनयाचा. नीना कुलकर्णी या रुग्ण पत्नीच्या भूमिकेत आहेत, फ्लॅशबॅकमध्ये मोजकेच सीन्स असताना त्यातही त्यांनी कमाल केलीये. सिनेमातला सर्वात सुंदर भाग कोणता असेल तर तो विक्रम गोखले आणि रिमा लागू यांच्यातील प्रसंग... त्याचं वर्णन ऐकण्यापेक्षा तुम्ही तो प्रत्यक्ष थिएटरमध्येच बघायला हवा. सिनिअर कलाकारांबरोबरच सुबोध भावे आणि सई ताम्हणकर यांचाही खास उल्लेख करायला पाहिजे. सध्या सईची जी बोल्ड इमेज आहे, त्याच्या अगदी विरुद्ध रोल तिने केलाय, तिच्या वाट्यालाही अगदी मोजकेच सीन्स आहेत पण त्यातही ती लक्षात राहते हे महत्त्वाचं. एकंदरित, अप्रतिम अभिनयासाठी 'अनुमती' बघायलाच हवा हेच आवर्जून सांगतो.

'अनुमती'ला रेटिंग -60

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 15, 2013 09:23 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close