S M L

घनचक्कर-'सस्पेन्स आणि कॉमेडीची मस्त भट्टी'

Sachin Salve | Updated On: Jun 29, 2013 06:06 PM IST

घनचक्कर-'सस्पेन्स आणि कॉमेडीची मस्त भट्टी'

अमोल परचुरे,समीक्षक

घनचक्कर... जोरदार पब्लिसिटीचा भाग तर आहेच, पण त्याचबरोबर 'आमीर' आणि 'नो वन किल्ड जेसिका' असे सिनेमे देणार्‍या राजकुमार गुप्ताचा हा सिनेमा असल्यामुळे सिनेमाकडून जोरदार अपेक्षा आहेतच. घनचक्कर हा सर्वच बाबतीत आतापर्यंतचे सर्व ट्रेंड मोडणारा, पूर्णपणे वेगळ्या जॉनरचा सिनेमा आहे. ही सिटकॉम म्हणजे सिच्युएशनल कॉमेडी आहे, सस्पेन्स कॉमेडी आहे, क्राईम कॉमेडी तर आहेच, थोडक्यात हा टोटली क्रेझी सिनेमा आहे आणि हा क्रेझीनेस ज्या चतुराईने दिग्दर्शकाने सादर केलाय तो अनुभव घ्यायलाच हवा असा आहे. अगदी शांतपणे क्रेझिनेस सादर करणं हा प्रकारच आपल्यासाठी नवीन आहे. खरंतर खूप काही घडतंय, पण म्हणून खूप धावपळ, पाठलाग, उगाच संशयी चेहरे करुन एकमेकांकडे बघणं,आरडाओरड असे प्रकार इथे दिसत नाहीत. उलट नैसर्गिक पध्दतीने घटना घडत जातात. त्या संथ वाटत नाहीत, उलट या शांतपणातूनच सस्पेन्स वाढत जातो आणि प्रेक्षकाला शेवटपर्यंत गुंतवून ठेवतो. ही अशी अतिशय अवघड मांडणी आपल्या प्रेक्षकांच्या कितपत पचनी पडेल हे सांगता येणार नाही, पण या नव्या प्रयोगाचं स्वागत करायलाच हवं.

काय आहे स्टोरी ?

घनचक्कर ही गोष्ट आहे संजय अत्रेची... मोठमोठ्या लॉकरची कुलुपं तोडण्यात त्याचा हातखंडा...आतापर्यंत केलेल्या चोरीच्या पैशातून तो आणि त्याची पंजाबी बायको नीतू आरामात राहत असते. पंडित आणि इदि्रस हे दोन गुंड एका बँक रॉबरीसाठी संजयची मदत घेतात. 35 कोटी रुपयांची रॉबरी यशस्वी होते. पोलिसांना गुंगारा देण्यासाठी सगळे पैसे ते संजयकडेच ठेवतात आणि तीन महिन्यांनी भेटून वाटणी करायचं ठरवतात. याच तीन महिन्यात संजयचा अपघात होतो 'और वो अपनी याददाश्त खो बैठता है'. बरं, त्याची स्मृती पूर्णपणे जात नाही, महत्त्वाच्या गोष्टी त्याला आठवत असतात पण चोरीची रक्कम कुठे लपवली हेच त्याला आठवत नसतं आणि मग इथूनच सुरु होतो उंदरा-मांजराचा खेळ...हा खेळ बघत असताना मग होतो प्रेक्षकाच्या डोक्याचा भुगा...नेमकं काय चाललंय आणि कोण कोणाला मूर्ख बनवतोय याचा अंदाज आपण बांधत राहतो आणि तेही अगदी शेवटपर्यंत...सिनेमाच्या इंग्लिश टायटलमध्ये सुरुवातीला जी च्या जागी असलेल्या प्रश्नचिन्हाचा अर्थ मग आपल्याला समजायला लागतो. हे सगळं एकीेकडे सुरु असताना पंडित, इदि्रस आणि नीतूचा सिच्युएशनल मॅडनेस बघून आपण हसतही असतो.

रामगोपाल वर्माने जेव्हा 'कौन' हा सिनेमा केला होता तेव्हा त्यातील सस्पेन्स गडद करण्यासाठी हॉरर सीन्सचा वापर केला. इथं राजकुमार गुप्ताने सस्पेन्सच्या जोडीला कॉमेडीचा वापर केलाय. सस्पेन्स आणि कॉमेडीची ही भट्टी मस्त जमून आलेली आहे. पंजाबी बायकोचे श्रीमंती फॅशनचं वेड, तिचं लाऊड जगणं, लोकल ट्रेनमध्ये गुंडांची मिटिंग असे मस्त जमून आलेले अनेक प्रसंग सिनेमात आहेत पण त्यातही बँक रॉबरीचा प्रसंग भलतीच धमाल निर्माण करतो. संजय, पंडित आणि इदि्रस हे तिघेतण धर्मेंद्र,अमिताभ आणि उत्पल दत्त यांचे मुखवटे घालून बँक लुटायला जातात. एकीकडे बँकलुटीचं टेन्शन पण चेहर्‍यावर विनोदी मुखवटे ही विसंगती मोठ्या पडद्यावर बघण्यात जास्त गंमत आहे.

परफॉर्मन्स

सर्व कलाकारांचा तगडा परफॉर्मन्स हा सिनेमाचं आणखी एक वैशिष्ट्य... सिनेमात महत्त्वाची आहेत इनमीन चार पात्रं...इमरान हाश्मी, विद्या बालन, राजेश शर्मा आणि नमित दास...दिग्दर्शक चांगला असेल तर आपण अभिनयही करु शकतो हे 'शांघाय'नंतर इमरान हाश्मीने पुन्हा एकदा दाखवून दिलंय. विद्या बालनने पंजाबी कॅरेक्टर खूपच एंजॉय केलंय असं जाणवतं, पण तरीही ती पुन्हापुन्हा एकच हेल काढून पंजाबी बोलते हे काही वेळाने खटकायला लागतं. राजेश शर्मा आणि नमित दास यांनीतर नैसर्गिक अभिनयाने छोट्या छोट्या प्रसंगातही कमाल केलेली आहे. एकंदरीत, नाव घनचक्कर आहे म्हणजे हा आऊट अँड आऊट कॉमेडी सिनेमा नाही, बँक रॉबरी आहे म्हणून चोर-पोलिसांचा खेळ नाही पण तरीही उत्तम दिग्दर्शन आणि उत्तम अभिनयासाठी एकदा बघायलाच हवा असा हा सिनेमा नक्कीच आहे.

'घनचक्कर'ला रेटिंग - 75

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 28, 2013 11:12 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close