S M L

लुटेरा एक 'मास्टरपीस'

Sachin Salve | Updated On: Jul 6, 2013 11:14 PM IST

लुटेरा एक 'मास्टरपीस'

अमोल परचुरे, समीक्षक

2010 साली 'उडान' हा सिनेमा दिग्दर्शित केल्यानंतर तीन वर्षांनी विक्रमादित्य मोटवानेचा सिनेमा आलाय 'लुटेरा'... विक्रमादित्य या नावाप्रमाणेच सिनेमाच्या तंत्रावर संपूर्ण पकड आणि हुकूमत असणारा हा दिग्दर्शक... सध्याच्या ताज्या दमाच्या दिग्दर्शकांमध्ये पूर्णपणे वेगळा असा हा विक्रमादित्य मोटवाने. सिनेमा हे दिग्दर्शकाचं माध्यम आहे, हे विक्रमादित्यने पुन्हा एकदा दाखवून दिलंय. लुटेरा ही सर्वार्थानं लाजवाब कलाकृती आहे यात काही वादच नाही. सिनेमा हे मनोरंजनाचं माध्यम आहे वगैरे सगळं ठीक आहे, पण म्हणून व्यावसायिक गणितांचा विचार करुनच सिनेमा करावा लागतो हा समज विक्रमादित्यने पूर्णपणे खोटा ठरवलाय. सिनेमाच्या कथेवर, पटकथेवर, संवादांवर, फ्रेम्सवर, कलाकारांवर दिग्दर्शकाने प्रचंड मेहनत घेतलीये हे अगदी पहिल्या फ्रेमपासूनच लक्षात यायला लागतं. 1953 आणि 1954 अशा दोन वर्षांत माणिकपूर आणि डलहौसी मध्ये घडणारी कथा. 60 वर्षांपूर्वीचा काळ उभा करतानाही बारीक बारीक गोष्टींचा विचार करण्यात आलाय. तांत्रिक बाजू तर भक्कम आहेतच पण आशयाच्या बाबतीतसुद्धा सिनेमा कुठेही मागे नाही. एक अतिशय तरल, हळुवार पण संथ नसलेली एक लॅविश फिल्म बघितल्याचा अविस्मरणीय अनुभव हा सिनेमा आपल्याला देतो.

काय आहे स्टोरी?

प्रेमाचे अनेक रंग आत्तापर्यंत आपण बॉलीवूड आणि अगदी जागतिक सिनेमांमध्येही पाहिलेले आहेत. अगदी नेहमीच्या प्यार की कस्मे खाणार्‍या हिरो-हिरोईनपासून त्याग आणि समर्पणाची महती सांगणारे बरीच प्रेमप्रकरणं आपण पाहिली आहेत. पण इथे लुटेरामधलं नायक आणि नायिकेमध्ये फुलणारं नातं हे तरल आहे, हळुवार आहे, कधी अल्ल्ड आहे तर कधी अव्यक्त आहे...कधी तिरस्कार आहे तर कधी पश्चात्ताप आहे. या कथेला एक अधुरी प्रेमकहाणी असंही म्हणता येईल किंवा प्रेमा तुझा रंग कसा असा प्रश्न पाडणारी अजब कहाणी असंही म्हणता येईल. पण ही कहाणी म्हणजे नात्याचा, गुंत्याचा एक भावस्पर्शी प्रवास आहे. त्यात संघर्ष आहे, फसवणूक आहे, चोरी आहे, मृत्यूला कवटाळण्याची आस आहे. एक जादुई जग विक्रमादित्यने आपल्यासमोर उभं केलंय. हा प्रवास बघत असताना संयम दाखवणंही महत्त्वाचं आहे, वरुण आणि पाखी यांच्यामध्ये जे काही घडतं ते पॉपकार्नसारखं नाहीये, तर चुलीच्या मंद आचेवरील सुग्रास जेवणासारखं आहे, आणि म्हणूनच त्याचा आस्वाद थोडा धीरानं घ्यावा लागेल.

मुख्य कथेभोवती फिरणारे विषय खूप महत्त्वाचे आहेत. जमीनदारी संपुष्टात आल्यामुळे त्या काळात उमटलेले पडसाद, स्वातंत्र्य मिळाल्याचे जमीनदारांवर झालेले प्रतिकूल परिणाम हा अँगल विचार करायला लावणारा आहे. यापूर्वी अनेक समाजशास्त्रीय पुस्तकातून आलेला हा विषय पडद्यावर फार प्रभावीपणे मांडण्यात आलाय. गावात वीज येण्याविषयीची उत्सुकता, वीजेसारख्या सुविधांचे केवळ श्रीमंतांनाच मिळणारे फायदे, त्याकाळात देवआनंदची निर्माण झालेली क्रेझ, त्याकाळातील मोटरगाड्या हे सगळं फार विचारपूर्वक दाखवण्यात आलेलं आहे. कथेतील अवकाशाला सुसंगत असं संगीत हासुद्धा सिनेमातील अतिशय महत्त्वाचा घटक आहे. अमिताभ भट्टाचार्यची गाणी आणि अमित त्रिवेदीचं संगीत यामध्ये एक गोडवा आहे, जो सिनेमा बघण्याचा आनंद आणखी वाढवतो.

परफॉर्मन्स

सर्व कलाकारांचा प्रभावी अभिनय ही तर सिनेमातली आणखी एक जमून आलेली गोष्ट...बरुण चंदा हे नटसम्राट शोभावेत असे कलाकार, त्यांनी सोनाक्षीच्या वडिलांची म्हणजेच जमीनदाराची भूमिका जबरदस्त सादर केलीये. केवळ इंटरव्हलपर्यंतच त्यांचा रोल असला तरी ते लक्षात राहतात. त्यांचा खर्जातला आवाज, मुलीवरचं प्रेम, फसवले गेल्यानंतरची त्यांची पराभवी मुद्रा हे सगळंच अगदी अभ्यास करावं असंच आहे. इंटरव्हलनंतर अदिल हुसेन आणि दिव्या दत्ता यांचा वावरही खूपच नैसर्गिक आणि खणखणीत आहे. विक्रांत या

कलाकाराने रणवीरच्या मित्राची केलेली भूमिका किंवा अरिफ झकेरिया यांचा अगदी छोटा रोल सगळेच प्रभावी वाटतात.

सर्वात कमाल केलीये ती रणवीर आणि सोनाक्षीने... सोनाक्षीने या सिनेमातून आपण उत्तम दर्जाचा अभिनय साकारु शकतो हे सिद्धच केलंय. आत्तापर्यंत तसंही तिला 'दबंग' किंवा 'सन ऑफ सरदार'सारखे सिनेमेच मिळाले होते. पण 'लुटेरा'मध्ये मिळालेल्या संधीचं तिने सोनं केलंय. रणवीरनेसुद्धा अतिशय इन्टेन्स कॅरेक्टर मोठ्या ताकदीनं उभं केलंय. डायलॉग नसलेल्या प्रसंगातही त्याची देहबोली किंवा एक्स्प्रेशन्समध्ये त्याने पैकीच्या पैकी मार्कस मिळवले आहेत. दर्जेदार दिग्दर्शकांबरोबरच कलाकारांची नवीन फळी तयार होतेय हे आता दिसायला लागलंय. दिग्दर्शकावर पूर्ण विश्वास ठेवून स्वत:च्या इमेजपेक्षा विसंगत अभिनयाची पात्रता या कलाकारांनी सिद्ध केलीये. लुटेराची आणखी बरीच स्तुती करता येईल, बरीच समीक्षा करता येईल...पण त्यापेक्षा तुम्ही स्वत: बघून या जादई कलाकृतीचा जरुर आनंद घ्या एवढंच सांगतो

'लुटेरा'ला रेटिंग-80

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 6, 2013 11:14 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close