S M L

खणखणीत अभिनय, पण मांडणीत कमजोर 'पोपट'

Sachin Salve | Updated On: Aug 23, 2013 10:35 PM IST

खणखणीत अभिनय, पण मांडणीत कमजोर 'पोपट'

अमोल परचुरे,समीक्षक

सिनेमांमधून विविध सामाजिक विषय आणि समस्या मांडणं ही मराठी सिनेमांची खासियत आहे, आणि हाच ट्रेंड आणखी पुढे घेऊन जाणारा सिनेमा आहे 'पोपट'...केवळ भारतातच नाही तर जगभरात ज्या समस्येवर बोललं जातं, काम केलं जातं त्याच विषयावर रंजक पद्धतीने सिनेमा बनवण्याचं धाडस सतीश राजवाडे आणि मिराह एंटरटेन्मेंटने केलेलं आहे. त्याबद्दल त्यांचं कौतुक करावंच लागेल, फक्त हा सिनेमा दहा वर्षांपूर्वी आला असता तर तो आणखी प्रभावी ठरला असता एवढं नक्की...

काही सिनेमे बघत असतानाच आपल्या मनात प्रश्नांची मालिका सुरू होते. हे असं का दाखवलं, हे असं कसं असू शकतं वगैरे वगैरे...'पोपट' सिनेमा बघताना हेच होतं. सिनेमाचा विषय काय आहे हे लक्षात आल्यानंतर पुढे घडणार्‍या बर्‍याचशा घटना अपेक्षित वळणानं जायला लागतात तिथं पुन्हा प्रेक्षकाचा कनेक्ट तुटायला लागतो. म्हणजेच एका अप्रतिम कल्पनेवर उभा राहिलेला सिनेमा पूर्णवेळ प्रेक्षकाला बांधून ठेवू शकत नाही.

काय आहे स्टोरी ?

राज्यातल्या-देशातल्या कोणत्याही गावात घडू शकेल अशी ही गोष्ट आहे. कथेच्या केंद्रस्थानी आहेत तीन जीवाभावाचे मित्र आणि लग्नसमारंभाचं वगैरे शूटिंग करून कसाबसा तग धरुन असलेला जनार्दन(अतुल कुलकर्णी)...तीन मित्रांमधला एक अगदीच उनाड आहे, एकजण ज्युनिअर आर्टिस्ट आहे, पण आपण हिरो असल्याची बतावणी तो करत असतो आणि तिसर्‍याला शिक्षणाची आवड आहे. पण, अभ्यास डोक्यात शिरत नाही अशी परिस्थिती...आता हे तिघे आणि जनार्दन एकत्र येऊन जी धमाल करतात, त्याच गमतीजमतींमधून प्रेक्षकांचं प्रबोधनही होत राहतं.

कथेचे दोन ट्रॅक पुढे पुढे जाताना म्हणजेच ही कथा फुलत असताना मध्येच खूप स्पीडब्रेकर येतात. पथनाट्याचा सीन असेल किंवा गावातील मुलींच्या ऑडिशनचा सीन असेल, हे सीन्स खूप लांबलेत. ही कथा आजच्या काळातली वाटावी यासाठी जे बदल करायला हवे होते, काही नवीन गोष्टी, नवी माहिती समाविष्ट करायला हवी होती तेही झालेलं नाही. ज्या गोष्टी शहरी किंवा ग्रामीण प्रेक्षकांनाही माहित आहे तीच माहिती सिनेमात येत राहते. त्यामुळे त्या स्तरावरही नावीन्य राहत नाही. मेसेज लोकांपर्यंत पोचत असला तरी एक ब्रिलियंट कथासूत्र फुलता फुलता राहून गेलंय.

परफॉर्मन्स

पोपट सिनेमाचा प्लस पॉईंट आहे सर्व कलाकारांचा एकदम कडक अभिनय...अतुल कुलकर्णीने आपल्या आत्तापर्यंतच्या इमेजला पूर्णपणे विसंगत मस्तमौला जनार्दनचा रोल केलाय. याची थोडी झलक नटरंगमध्ये दिसली होती, पण आता त्याहीपुढे जाऊन त्याने रंगवलेला जनार्दन एकदम खास आहे, त्याने जसा तो साकारताना एंजॉय केलाय तसाच प्रेक्षकही एंजॉय करतील. केतन पवार, सिद्धार्थ मेनन आणि अमेय वाघ या तिघांनी जी सुपर एनर्जी लावलीये त्यामुळेच सिनेमातली रंगत वाढलेली आहे.

popat

त्यातही केतन पवारने काही काही सीन्समध्ये केवळ एक्स्प्रेशन्सवर हशे वसूल केलेत. अनिता दातेच्या रोलची लांबी तुलनेनं कमी असली तरी तिचं कामही खूपच प्रभावी आहे. मेधा घाडगेच्या लावणीचा ठसकाही यात आहे आणि अभिनयाची चुणूकही तिने दाखवलीये. नेहा शितोळेनेसुद्धा चांगली साथ दिलीये..सिनेमातला सर्वात जमलेला भाग म्हणजे अजिबात अभिनय न येणारा जनार्दन जेव्हा ऍक्टींग करायला लागतो, संवाद बोलायला लागतो तेव्हा खूपच धमाल येते. स्वत: उत्तम अभिनेता असतानाही ऍक्टींग येत नसल्याचं सोंग घेणं खूप कठीण आहे, पण अतुल कुलकर्णीने या भागात खूपच धमाल उडवलीये..

नवीन काय?

'पोपट'चे संवाद हा आणखी एक अतिशय जमून आलेला भाग...चिन्मय केळकरने 'प्रेमाची गोष्ट'नंतर पुन्हा एकदा सहज-साधे पण नेमके संवाद पेरलेले आहेत. सिनेमातली लोकेशन्सही चांगली आहेत. पण प्रॉब्लेम झालाय तो बॅकग्राऊंड म्युझिकचा, कॉश्च्युम्सचा आणि एडिटिंगचा... मराठीतला लोकप्रिय दिग्दर्शक सतीश राजवाडेने या सिनेमामधून खूप अपेक्षा निर्माण केल्या होत्या, पण दुदैर्वाने नेमक्या याच सिनेमात त्याच्या दिग्दर्शनातील    त्रुटी समोर आल्यात. त्यामुळे केवळ खणखणीत अभिनयासाठी एकदा हा 'पोपट' बघायला हरकत नाही.

रेटिंग : पोपट - 50

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 23, 2013 10:35 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close