S M L

गल्लाभरू सिनेमांचा ट्रेंड मोडू पाहणारा 'मद्रास कॅफे'

Sachin Salve | Updated On: Aug 23, 2013 11:01 PM IST

गल्लाभरू सिनेमांचा ट्रेंड मोडू पाहणारा 'मद्रास कॅफे'

अमोल परचुरे,समीक्षक

20-25 वर्षांपूर्वी घडलेली घटना, ज्यामुळे देशाचा इतिहासच बदलून गेलेला असेल तर ती घटना मोठ्या पडद्यावर साकार करणं हे मोठं आव्हानच... 'मद्रास कॅफे'मध्ये निर्माता-अभिनेता जॉन अब्राहम आणि दिग्दर्शक शूजित सरकार यांनी हे आव्हान पेलताना खूपच अप्रतिम काम केलेलं आहे. मद्रास कॅफे हा मेनस्ट्रीम सिनेमा नाही हेच या सिनेमाचं वैशिष्टय म्हणायला पाहिजे. 80-90 च्या दशकात श्रीलंकेत जी परिस्थिती होती, त्यावर अतिशय गांभीर्याने हा सिनेमा बनवण्यात आलाय.

जॉन अब्राहमची निर्मिती असलेला पहिला सिनेमा होता 'विकी डोनर' आणि आता हा दुसरा सिनेमा. विषयाचं वैविध्य आणि दिग्दर्शकावर टाकलेला विश्वास या दोन्ही गोष्टी जॉन अब्राहमसारख्याने जमवून दाखवल्या. 'चेन्नई एक्स्प्रेस'मधून शाहरुखला जे जमलं नाही ते 'मद्रास कॅफे'मधून जॉनने करुन दाखवलंय. जे सिनेमे बॉलीवूडला जागतिक नकाशावर मोठं करू शकतात त्यातला एक सिनेमा मद्रास कॅफे...

madras cafe

काय आहे स्टोरी?

'मद्रास कॅफे'चा काळ आहे 1980 आणि 90 च्या दशकातला...श्रीलंकेत उसळलेला हिंसाचार, लिट्टे(LTTE) आणि श्रीलंकन आर्मीमध्ये सुरू असलेलं युद्ध, भारतानं केलेली मध्यस्थी आणि यामध्ये गेलेला हजारो निरपराध नागरिकांचा बळी असा सगळा बॅकड्रॉप मद्रास कॅफेमध्ये आहे..भारतीय गुप्तचर संस्था रॉ (RAW) या सगळ्या घडामोंडीवर बारीक नजर ठेवून आहे, यासाठी रॉ एजंट विक्रम (जॉन अब्राहम) श्रीलंकेत दाखल होतो.. सिनेमातील एलटीएफ(LTF) संघटनेचा म्होरक्या अण्णा याचं मन वळवणं शक्य नाही हे लक्षात आल्यावर त्याला नामोहरम करण्यासाठी इतर मार्गांचा कसा अवलंब करता येईल याच्या प्रयत्नात विक्रम असतो.

त्याच्या कामात त्याचेच काही सहकारी अडथळे आणत असतात, अण्णाचा धोका असतोच...आपल्या प्रयत्नात विक्रमला फारसं यश मिळत नाही पण एक मोठा कट उघडकीस आणण्यात तो यशस्वी होतो, पण तो हा कट उधळून लावू शकत नाही..राजीव गांधी यांच्या हत्येपर्यंतचं चित्रण या सिनेमात आहे. प्रत्यक्षात घडलेल्या घटनांपैकी निवडक गोष्टी लेखक-दिग्दर्शकानं सिनेमात घेतलेल्या आहेत. काही काल्पनिक घटनासुद्धा आहेत, पण म्हणून सिनेमॅटिक लिबर्टी वगैरे घेतलेली नाही हे महत्त्वाचं...

madras cafe3

नवीन काय?

श्रीलंकेतील परिस्थिती, लिट्टे याबद्दल तुम्ही काहीच कधी ऐकलं नसेल, किंवा याबद्दल तुम्हाला काहीच माहिती नसेल तर मग 'मद्रास कॅफे' बघताना तुमचा थोडा गोंधळ उडू शकतो किंवा तुम्हाला कंटाळाही येऊ शकतो. अन्यथा, शेवटपर्यंत हा सिनेमा तुम्हाला बांधून ठेवू शकेल...नो नॉन्सेस या कॅटेगरीतला हा सिनेमा. जॉन अब्राहम रॉ एजंट आहे म्हणून उगाच हिरोगिरी करतोय, गाड्या उडवतोय असले काही प्रकार नाहीत, उगाच सिनेमात गाणी नाहीत किंवा निरर्थक असे कोणतेही प्रकार नाहीत. त्यामुळेच तो पूर्णपणे दिग्दर्शकाच्या नियंत्रणात असलेला सिनेमा वाटतो. गाणी नसली तरी शंतनु मोईत्राचं बॅकग्राऊंड म्युझिक कमालीचं प्रभावी झालंय. सिनेमॅटाग्राफी, एडिटिंग सगळंच अव्वल दर्जाचं आहे.

जॉनसोबत नर्गिस फाकरी आहे, राशी खन्ना आहे, सिद्धार्थ बसु आहेत...पण सगळ्यांना त्यांचे त्यांचे रोल्स मोजून मापून दिलेले आहेत. स्टारडमपेक्षा कथेची गरज जास्त महत्त्वाची आहे हा विचार इथं केलेला दिसतो. एकंदरित, गल्लाभरू सिनेमांचा ट्रेंड मोडू पाहणारा आणि बॉलीवूडला एक पाऊल पुढे घेऊन जाणारा या 'मद्रास कॅफे'मध्ये एकदा तरी तुम्ही जायलाच पाहिजे..

रेटिंग : मद्रास कॅफे - 75

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 23, 2013 10:57 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close