S M L

सत्याग्रह:कथेचा अभाव,अभिनयाचा प्रभाव

Sachin Salve | Updated On: Aug 30, 2013 10:50 PM IST

सत्याग्रह:कथेचा अभाव,अभिनयाचा प्रभाव

अमोल परचुरे,समीक्षक

'सत्याग्रह' या नावामुळे आणि आत्तापर्यंत जे प्रोमो पाहिलेत त्यावरुन हे लक्षात येतं की टीम अण्णांच्या लोकपाल आंदोलनावर सिनेमा आधारित असणार...देशातील चर्चेत असलेली बातमी किंवा समस्या घ्यायची आणि ती आपल्या सिनेमात वरवर दाखवून पब्लिसिटीसाठी वापर करायचा, दिग्गज कलाकार घ्यायचे, पण प्रेक्षक सिनेमा बघायला आले की, त्यांना भलतंच काहीतरी पडद्यावर दिसणार ही प्रकाश झा यांच्या अलीकडच्या सिनेमांची वैशिष्ट्यं.. उदाहरणंच द्यायची तर 'आरक्षण','चक्रव्यूह'ची देता येतील. 'सत्याग्रह' हा काहीसा त्याच प्रकारात मोडणारा सिनेमा...या सिनेमात अण्णांच्या आंदोलनाचा फिल्मी अवतार दिसतो, आणि कलाकारांच्या गर्दीमुळे दिग्दर्शकाचा उडालेला गोंधळही कळतो. 'डोंगर पोखरुन उंदीर काढणं' किंवा 'बडा घर पोकळ वासा' या म्हणींचा अर्थ समजून घ्यायचा असेल तर मग तुम्ही सत्याग्रह बघायलाच पाहिजे. चांगल्या कथेचा अभाव पण अभिनयाचा प्रभाव अशीच सत्याग्रहची ओळख सांगता येईल.

काय आहे स्टोरी?

'सत्याग्रह' सिनेमाची गोष्ट घडते अंबिकापूरमध्ये... इथं राहणारे द्वारका आनंद(अमिताभ बच्चन) हे निवृत्त मुख्याध्यापक आहेत आणि आपल्या तत्त्वांशी कोणतीही तडजोड न करता त्यांची समाजसेवा सुरु आहे. देशभरात बोकाळलेल्या भ्रष्टाचाराबद्दल त्यांच्या मनात प्रचंड तिरस्कार आहे. त्यांचा मुलगा अखिलेश प्रामाणिकपणे हायवे प्रोजेक्टची कामं करतोय. याच प्रामाणिकपणा त्याचा बळी घेतो. बिहारमध्ये घडलेल्या सत्येंद्र दुबे यांचा मृत्यूही असाच झाला होता, त्याची आठवणही यानिमित्ताने प्रकाश झा यांनी करुन दिली आहे. अखिलेशचा मित्र मानव(अजय देवगण) हा दिल्लीत एका मोठी टेलिकम्युनिकेशन कंपनीचा मालक आहे. मानवची तत्त्वं द्वारका आनंदना मान्य नाहीत.satyagraha film review

अखिलेशच्या मृत्यूनंतर मानव अंबिकापूरमध्ये येतो आणि तिथली भ्रष्टाचारी व्यवस्था आणि गृहमंत्री बलराम सिंगच्या (मनोज वाजपेयी) विरोधात उभा राहतो. हाच भ्रष्टाचारविरोधी लढा पुढे अंबिकापूरमधल्याच रामलीला मैदानापर्यंत पोचतो. मग द्वारका आनंद यांचं आमरण उपोषण, टीम अण्णांसारख्याच त्यांच्या मागण्या, मग सरकारची भंबेरी, बलराम सिंगचा आडमुठेपणा, मग सिनेमा असल्यामुळे अहिंसक आंदोलनात घुसलेली हिंसा, क्लायमॅक्सला फायटिंग वगैरे असा सगळा फिल्मी मसाला सिनेमात दिसत राहतो. टीम अण्णांनी हा सिनेमा पाहिला तर ते नक्कीच कपाळाला हात लावतील असाच सगळा मसाला सिनेमात भरलेला आहे आणि सगळी सरमिसळ बघून नेमकं दिग्दर्शकाला काय सांगायचंय त्याचाही काही पत्ता लागत नाही.

काय कमी काय जास्त?

प्रकाश झा म्हणजे राजकीय-सामाजिक भान असलेला आणि सामाजिक चळवळी जवळून पाहिलेला दिग्दर्शक... वास्तवाचं भान असूनही त्यांच्या सिनेमांमध्ये ते उतरताना दिसत नाहीये. सत्याग्रह हा सिनेमा बघितल्यावर तर पुन्हा एकदा प्रश्न पडतो की 'गंगाजल', 'अपहरण' बनवणारा हाच का तो दिग्दर्शक? सुरुवातीच्या काळातील सिनेमांच्या तुलनेत तर सत्याग्रह खूपच बालिश वाटायला लागतो.

द्वारका आनंद म्हणजेच अमिताभ बच्चन यांचं आमरण उपोषण सुरु असताना स्टेजवरुन खाली उतरत अजय देवगण, अर्जुन रामपाल आणि करिना कपूर 'रघुपती राघव' गायला लागतात तेव्हा तर दुदैर्वाने हसायलाच येतं, एवढं सगळं चित्रण फिल्मी झालेलं आहे. अण्णांच्या आंदोलनाचा फीव्हर सोशल मीडियामधून कसा पसरला असेल त्याचं चित्रण तेवढं वास्तववादी पद्धतीने आणि आधुनिक आयडिया वापरुन करण्यात आलंय. बाकी सगळाच भाग याआधीच्या सिनेमात येऊन गेलाय असंच वाटत राहतं. बरं, सत्याग्रहसारख्या सिनेमांमध्येसुद्धा आयटम साँग, रोमँटिक साँग हे सगळं ठेवण्याचा मोहही प्रकाश झा यांना आवरता आलेला नाही.

परफॉर्मन्स

सिनेमा कितीही फसला असला तरी अतिशय जमून आलेल्या गोष्टी म्हणजे बिग बी अमिताभ बच्चन आणि मनोज वाजपेयी यांचा लाजवाब अभिनय. अर्जुन रामपाल, अजय देवगण आणि करिना कपूर हे त्यांच्या नेहमीच्याच अवतारात आहेत, पण बिग बी आणि मनोज वाजपेयी यांनी संवादफेक, मुद्राभिनय या सगळ्याच बाबतीत आपण किती कसलेले आहोत हे दाखवून दिलंय.

satyagraha film review_all

आमरण उपोषण लांबल्यानंतर अशक्त झालेल्या द्वारका आनंदचं स्टेजवर कोसळणं बघून पटकन आपलाही ठोका चुकतो. गृहमंत्री बलराम सिंगचा उन्मत्तपणा बघून चीड निर्माण होते, बरं, मनोज वाजपेयीने यापूर्वीसुद्धा अशा भूमिका केलेल्या आहेत पण तरीही त्याने वेगळेपण दाखवलेलं आहे. मिताली जगतापसुद्धा सिनेमात आहे, तिच्या वाट्याला अगदीच दोन सीन्स आलेत, पण तेवढयातही तिने तिचं कौशल्य दाखवून दिलंय.

रेटिंग : सत्याग्रह - 40

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 30, 2013 10:47 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close