S M L

मोहन रावलेंचा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश

Sachin Salve | Updated On: Mar 21, 2014 05:51 PM IST

मोहन रावलेंचा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश

ncp_mohan ravale21 मार्च : शिवसेनेचे नेते आणि माजी खासदार मोहन रावले यांनी अखेर आज (शुक्रवारी) राष्ट्रवादीत प्रवेश केलाय. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव यांच्या उपस्थितीत त्यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलाय.

दोन दिवसांपूर्वी रावले यांनी दिल्लीत जाऊन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली होती. त्यामुळे रावले राष्ट्रवादीत प्रवेश करतील अशी चर्चा सुरू झाली होती. आज या चर्चेला पूर्णविराम देत रावले राष्ट्रवादीत दाखल झाले. पण त्यांना लोकसभेसाठी उमेदवारी देण्यात आली नाही.

रावले यापूर्वी शिवसेनेचे पाच वेळा खासदार होते. त्यामुळेच त्यांच्यावर आता राष्ट्रवादीतर्फे ईशान्य मुंबई लोकसभा निवडणुकीची जबाबदारी सोपवण्यात आलीय. या मतदारसंघात राष्ट्रवादीतर्फे संजय दिना पाटील निवडणूक लढवत आहे. त्यांना रसद पुरवण्याची जबाबदारी रावलेंवर सोपवण्यात आलीय.

विशेष म्हणजे काही दिवसापुर्वी मोहन रावले यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतल्यामुळे शिवसेनेच्या गोटात खळबळ उडाली होती. रावले मनसेत प्रवेश करतील अशी शक्यता होती. एवढंच नाहीतर रावले यांनी जाहीर पत्रकार परिषद घेऊन "शिवसेना हा दलालांचा पक्ष आहे" अशी तोफ डागली होती. यावेळी त्यांनी मिलिंद नार्वेकरांवर निशाणा साधला होता.

संतप्त झालेल्या सेनेच्या नेत्यांनी रावलेंची पत्रकार परिषद संपण्याच्या अगोदरच रावलेंची सेनेतून हकालपट्टी केली होती. त्यानंतर लोकसभेची धामधूम सुरू असताना रावलेंनी राष्ट्रवादीची वाट धरली आणि आज प्रवेशही केला. आता ईशान्य मुंबईत रावले संजय दिना पाटील यांच्यासाठी निवडणुकीची जबाबदारी सांभाळणार आहे त्यामुळे सेनेची डोकेदुखी आणखी वाढलीय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 21, 2014 05:42 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close