S M L

'घड्याळ'बंद, राणेंच्या मदतीला 'बाबा'आले धावून !

Sachin Salve | Updated On: Apr 9, 2014 11:42 PM IST

Image img_216752_rane43_240x180.jpg09 एप्रिल : सिंधुदुर्गात 'निलेश राणेंचा प्रचार करणार नायच' या राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या पवित्र्यामुळे अडचणीत सापडलेले नारायण राणे यांच्या मदतीला मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण धावून आले आहेत. पक्षांतर्गत आणि मित्रपक्षांच्या नेत्यांची समजूत काढण्यासाठी मुख्यमंत्री 12 आणि 13 एप्रिल रोजी सिंधुदूर्ग आणि रत्नागिरीच्या दौर्‍यावर जाणार आहे. त्याचबरोबर लातूर, हिंगोली, पालघर, भिवंडी, रायगड आणि सिंधुदुर्गच्या कार्यंकर्त्यांमध्ये दिलजमाई साठी मुख्यमंत्री प्रयत्नशील आहेत.

राष्ट्रवादीच्या 400 पदाधिकार्‍यांचे राजीनामे

नारायण राणे आणि राष्ट्रवादीमधला वाद आता चांगलाच चिघळलाय. मंगळवारीच नारायण राणे यांनी राष्ट्रवादीच्या पाठिंब्याबाबत विश्वास व्यक्त केल्यानंतर आज (बुधवारी) राष्ट्रवादीच्या 400 पदाधिकार्‍यांनी राजीनामे दिले आहेत. जिल्हाध्यक्ष बाळा भीसे यांच्याकडे त्यांचे राजीनामे सोपवण्यात आले आहेत.

वरिष्ठांचा दबाव आला तर हे राजीनामे प्रदेशाध्यक्षांना देणार असल्याचं सांगण्यात आलंय. राणेंनी केलेला राष्ट्रवादींच्या नेत्यांचा अपमान विसरणं कठीण असल्याची भावना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केली होती. कुठल्याही परिस्थितीत निलेश राणेंचा प्रचार करणार नाही, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितले तरी राणेंच्या प्रचाराला जाणार नाही अशी बाळा भीसे यांनी आपली भूमिका स्पष्ट केलीय. केवळ राष्ट्रवादीच नाही तर स्थानिक पातळीवरच्या काँग्रेस कार्यकर्त्यांमध्येही नाराजीचं वातावरण आहे.

राणेंविरोधात आता काँग्रेस नेत्यांनीच थोपटले दंड

नारायण राणेंविरोधात केवळ राष्ट्रवादीचेच कार्यकर्ते पदाधिकारी नाहीत, तर काँग्रेसच्या आमदारांनीही दंड थोपटले आहे. विधानपरिषदेचे आमदार विजय सावंत यांनी रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात निलेश राणेंचा प्रचार करणार नाही, असं पत्रकार परिषद घेऊन जाहीर केलंय. 'नारायण राणेंनी आपल्या मंत्रीपदाचा वापर करुन माझा सिंधुदुर्गातील साखर कारखाना सुरू होणार नाही, यासाठी प्रयत्न केले. पण कायद्याने मला न्याय मिळाला असून माझा साखर कारखाना लवकरच सुरू होणार', असल्याचं विजय सावंत यांनी स्पष्ट केलंय.

दरम्यान, सावंत यांची पत्रकार परिषद कणकवलीत सुरू असताना युवक काँग्रेसच्या चार ते पाच कार्यकर्त्यांनी सावंत यांच्या आवारात घुसून 'नारायण राणे झिंदाबाद'च्या घोषणा दिल्या. हे कळताच मोठ्य संख्येनं शिवसेना-भाजपचे कार्यकर्ते सावंत यांना पाठिंबा देण्यासाठी सावंत यांच्या आवारात गोळा झाले. पण पोलिसांनी तातडीने ही परिस्थिती नियंत्रणात आणली.

(संग्रहित छायाचित्र)

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 9, 2014 11:19 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close