S M L

आघाडीत कार्यकर्ते झाले 'नेते', नाराजीनाट्य सुरूच !

Sachin Salve | Updated On: Apr 11, 2014 11:04 PM IST

आघाडीत कार्यकर्ते झाले 'नेते', नाराजीनाट्य सुरूच !

568bhujbal_rane 3411 एप्रिल : मतदान 4 दिवसांवर आलंय पण आघाडीत मात्र कार्यकर्त्यांनी नेत्यांविरोधातच बंड पुकारलं आहे. सिंधुदुर्गात राणे विरुद्ध राष्ट्रवादीच्या वादावर अजून तोडगा निघालेला नाही. आता स्वत: नारायण राणेंनी नरमाईची भूमिका घेतलीय. पण, स्थानिक राष्ट्रवादीचे पदाधिकारी अजून तरी झुकायला तयार नाही. तर नाशिक जिल्ह्यात सिन्नरच्या काँग्रेस तालुकाध्यक्षांसह अनेक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार छगन भुजबळ यांच्या विरोधात प्रचार करणार असल्याचं जाहीर केलंय. ऐन निवडणुकीच्या काळात आघाडीची यामुळे चांगलीच डोकेदुखी वाढलीय.

कार्यकर्त्यांची नाराजी राणेंसाठी धोक्याची घंटा ?

सिंधुदुर्गात राष्ट्रवादीची नाराजी दूर करण्यासाठी आता खुद्द उद्योगमंत्री नारायण राणे यांनी पुढाकार घेतला आणि नाराजी दूर करण्याचं आश्वासन दिलं. आम्ही राज्यात आघाडीचा धर्म पाळू तुम्ही जिल्ह्यात पाळा असं सांगत नारायण राणे यांनी नरमाईची भूमिका घेतली पण स्थानिक नेत्यांची नाराजी दूर झालेली नाही. एवढच नाहीतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची नाराजी दूर करण्यासाठी खुद्ध राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार सिंधुदुर्गात दाखल झाले. पण त्यांनाच कार्यकर्त्यांच्या रोषाला सामोरं जावं लागलं. अजित पवार यांच्या सभेवर राष्ट्रवादी जिल्ह्याध्यक्षांसह इतर पदाधिकार्‍यांनी आणि कार्यकर्त्यांनी बहिष्कार घातला.  पण अजित पवारांनी या कार्यकर्त्यांना आघाडीचा धर्म पाळण्याचं आवाहन केलंय.

तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे आमदार दीपक केसरकर यांनी याच संदर्भात केसरकरांनी आज राष्ट्रवादीचे शरद पवार यांची भेटही घेतली. आता राणेंना पाठिंबा देण्यासंदर्भात उद्या चर्चा करून निर्णय घेणार असल्याचं केसरकरांनी सांगितलं. पण, राष्ट्रवादीच नाही तर स्थानिक काँग्रेसचे नेते आणि पदाधिकारीही राणेंवर नाराज आहेत. सिंधुदुर्गचे काँग्रेस आमदार विजय सावंत यांना काँग्रेसची कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. सावंत यांनी राणेंवर केलेल्या आरोपांचं खंडन करावं नाहीतर दोन दिवसांत कारवाई करू असा इशारा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी दिला. ऐन निवडणुकीच्या काळात स्थानिक नेत्यांची ही नाराजी राणेंसाठी धोक्याची घंटा ठरू शकते.

कार्यकर्ते करणार भुजबळांच्या विरोधात प्रचार

सिंधुदुर्ग व्यतिरिक्त इतर ठिकाणीही काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अंतर्गत कलहाने डोकं वर काढलंय. नाशिक जिल्ह्यात सिन्नरच्या काँग्रेस तालुकाध्यक्षांसह अनेक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार छगन भुजबळ यांच्या विरोधात प्रचार करणार असल्याचं जाहीर केलंय.

नाशिकमध्येही काँग्रेस-राष्ट्रवादीतल्या वादाच्या ठिणग्या पडू लागल्यात. सिन्नरमध्ये काँग्रेसचे आमदार आणि पंचायत समिती सभापती आहेत. मात्र, भुजबळांनी गेल्या पाच वर्षात आपल्याकडे दुर्लक्ष केल्याचा मुद्दा करून सिन्नरमधून त्यांच्या विरोधात बंड पुकारण्यात आलंय.

संघटित मतांसाठी सिन्नर तालुका प्रसिद्ध आहे. त्यामुळेच राष्ट्रवादीने या वादावर तोडगा काढण्याची जबाबदारी काँग्रेसकडे सोपवण्यात आली आहे. तर परभणीमध्ये काँग्रेस आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांनी राष्ट्रवादीच्या विरोधात भूमिका घेतली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे उमेदवार विजय भांबळे संकटात अडकलेत.

 काँग्रेसमधली धुसफूस

- लातूरमध्ये काँग्रेसमध्ये पक्षांतर्गत गटबाजी उफाळून आलीय.

- उत्तर मध्य मुंबईत नसीम खान आणि कृपाशंकर सिंग यांचे कार्यकर्ते प्रिया दत्त यांना मदत करत नसल्याची तक्रार पक्षाकडे आलीय.

- भिवंडीमध्ये काँग्रेसच्याच पदाधिकार्‍यांनी आपल्या उमेदवाराविरोधात असहकाराची भूमिका घेतली आहे.

मतदान जवळ आलंय, सरकारविरोधी लाट आहे, त्यातच पक्षांतर्गत आणि आघाडीतला वाद यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीची डोकेदुखी वाढलीय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 11, 2014 10:44 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close