S M L
  • महायुतीत 'टाळी' अन् 'टाळ मृदुंग' !

    Published On: May 28, 2013 05:14 PM IST | Updated On: May 29, 2013 04:08 PM IST

    मुंबई 28 मे : मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना यांना महायुतीत सहभागी होण्यासाठी आवाहन रिपाइं अध्यक्ष रामदास आठवले यांनी केलं. पण आठवलेंच्या एकतर्फी निर्णयावर शिवसेनेनं चांगलीच आगपाखड केलीय. अखेर हा पेच सोडवण्यासाठी भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांना रामदास आठवले यांची समजूत काढावी लागली. आत्तापर्यंत मनसेला महायुतीत सामील करण्याला विरोध करणार्‍या रिपाइंचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी कुर्ल्याच्या आपल्या जाहीर सभेत राज ठाकरे आणि आणि उध्दव ठाकरेंना एकत्र येण्याचं आवाहन केलं. मनसेनं महायुतीत सामील होण्याचं आवताणही आठवलेंनी राज ठाकरेंना दिलं. यापूर्वी शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनातून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एका हाताने टाळी वाजत नाही असं म्हणत राज ठाकरेंसमोर टाळीसाठी हात पुढे केला होता. मात्र राज यांनी हा प्रस्ताव धुडकावून लावला होता. शिवेसेनेने वापरलेल्या शब्दातच राज यांना महायुतीत सामील होण्याचं आवाहन करण्यार्‍या आठवलेंवर आणि भाजप नेते नितीन गडकरींवरही सामनामधून प्रखर टीका करण्यात आली आहे. 'सामना'त भाजप-आठवलेंवर टीकामहाराष्ट्राच्या राजकारणात 'टाळी' ला इतके महत्त्व येईल, असे कधी वाटले नव्हते. पण, शिवसेना-भाजप-रिपाइं महायुतीतल्या मित्रवर्यांनी स्वत:ची राजकीय कामं सोडून आपल्या पक्ष कार्यालयात 'टाळ-मृदंगा'चे क्लासेस काढलेले दिसतात व क्लासेसला विद्यार्थी मिळत नसल्याने एका हाताने टाळी व दुसर्‍या हाताने मृदुंगावर थाप मारताना आम्ही पाहत आहोत.या सगळ्या प्रकारानंतर आठवले यांनी भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे यांची भेट घेतली. आणि या भेटी दरम्यान मुंडे यांनी आठवले यांची समजूत काढली. काँग्रेस आणि राष्ट्रावादी काँग्रेसच्या आघाडीतून बाहेर पडलेल्या आठवलेंना आपल्या अस्तित्व टीकवण्यासाठी महायुतीत राहणं आवश्यक आहे. आणि त्यातूनच आठवलेंनी मनसेला महायुतीत सामील होण्याचं आवाहन केल्याचं बोललं जातंय. मात्र या सगळ्या प्रकारात रिपाइंला खरी काळजी आहे ती पुढील वर्षी होणार्‍या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत महायुतीत आपल्या वाटेल्या येणार्‍या जागांची.येत्या काही दिवसांमध्ये हा महायुतीतला महागुंता वाढत जाणार हे निश्चित.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close