S M L

निकालानंतर सेना-मनसे युती ?

Sachin Salve | Updated On: Oct 9, 2014 04:32 PM IST

निकालानंतर सेना-मनसे युती ?

09 ऑक्टोबर : ' टाळी' वाजणार की नाही वाजणार यावरुन आतापर्यंत बराचं काथ्याकूट झाला पण आता उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येण्याचे संकेत मिळत आहे. निवडणुकीच्या निकालानंतर मनसे आणि शिवसेना युती होऊ शकते अशी दाट शक्यता निर्माण झाली आहे. युती ज्या दिवशी तुटली त्याच्या दुसर्‍या दिवशी उद्धव यांच्याशी फोनवर चर्चा झाली होती, मी सेनेसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता पण उद्धव यांनी प्रतिसाद दिला नाही असा खुलासा मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलाय. तर राज यांची भूमिका महाराष्ट्र हिताची असून निवडणुकीच्या निकालानंतर सगळ्यांची भूमिका स्पष्ट होईल असं सुचक वक्तव्य सेनेचे खासदार संजय राऊत केलंय.

शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एकत्र यावं असे अनेक वेळा प्रयत्न आणि चर्चा झाली. दस्तरखुद्ध शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनीही मांडीवर खेळणार राज सोडून गेला याबद्दलचं दु:खं भरसभेत व्यक्त केलं होतं. बाळासाहेब तुमच्यासाठी 100 पावलं पुढे येईन अशी हाकही राज यांनी दिली होती. त्यानंतर उद्धव यांनीही बाळासाहेबांच्या निधनानंतर 'सामना'मधून टाळीसाठी हात पुढे केला होता. पण राज यांनी टाळीला मात्र टोला लगावला. लोकसभेतही हीच शक्यता निर्माण झाली पण तरीही टाळीकाही वाजली नाही. आता शिवसेना आणि भाजपची युती तुटल्यामुळे मनसे आणि शिवसेना एकत्र येईल अशी चर्चा सुरू झालीये.

उद्धव यांच्याशी फोनवर चर्चा झाली -राज

पण कालपर्यंतच्या सभांमधून राज यांनी 'एकटा चलो रे'चाच नारा दिला. काल ठाण्याच्या सभेतही युती करणार नाही असं स्पष्ट केलं. पण आज अचानक राज यांनी नवा खुलासा केला. राज म्हणतात, 25 तारखेला युती तुटल्यानंतर दुसर्‍या दिवशी बाजीराव दांगट यांच्यामार्फत उद्धव यांच्याशी फोनवर चर्चा झाली. उद्धव यांनी भाजपने आपल्याला कसं फसवलं याबद्दल सांगितलं. एवढंच नाहीतर प्रचारात एकमेकांवर टीका, आरोप-प्रत्यारोप करायचं नाही असंही ठरलं होतं. त्यानंतर चर्चा करण्याचं ठरलं होतं. आमच्याकडून नितीन सरदेसाई आणि बाळा नांदगावकर तर सेनेकडून अनिल देसाई येणार होते. ऐन फॉर्म भरण्याचा शेवटचा दिवस होता. मी सगळे एबी फॉर्म थांबवून ठेवले होते. पण शेवटपर्यंत ना उद्धव यांनी फोन केला ना देसाईंनी. अखेरीस संध्याकाळी फॉर्म उमेदवारांना देऊन टाकले. पण आमच्या चर्चा होऊ शकली नाही जर झाली असती तर काही होऊ शकलं असतं असा खुलासा राज यांनी केला.

निवडणुकीच्या निकालानंतर सगळ्यांची भूमिका स्पष्ट -संजय राऊत

राज यांच्या गौप्यस्फोटानंतर लगेच शिवसेनेनंही आपली बाजू मांडली. राज ठाकरेंची भूमिका महाराष्ट्र हिताची आहे. त्यांची भूमिका आम्ही मानतो. निवडणुकांचे निकाल लागू द्या त्यानंतर सगळ्यांची भूमिका स्पष्ट होईल असं स्पष्ट संकेत सेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिले. त्यामुळे उद्धव आणि राज एकत्र येऊ शकता अशी दाट शक्यता निर्माण झालीये. पण सेना-मनसेची युती निवडणुकीच्या निकालावर राहिलं असं स्पष्ट होतंय. सेनेनं 150 मिशन हाती घेतलंय पण जर सेनेला अपेक्षित यश मिळालं नाही तर बहुमतासाठी मनसेशी युती करण्याचा पर्याय पुढे येऊ शकतो.आता निकाल काय लागतो आणि सेना-मनसे एकत्र येऊ शकता का ? हे 19 तारखेच्या निकालानंतरच स्पष्ट होईल असं दिसतंय.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 9, 2014 04:05 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close