S M L

आप सरकारने विश्वासदर्शक ठराव जिंकला

Sachin Salve | Updated On: Jan 2, 2014 07:33 PM IST

cm kejriwal02 जानेवारी : दिल्लीच्या तख्तावर विराजमान झाल्यानंतर अरविंद केजलीवाल यांनी आता विधानसभेचीही लढाई जिंकली आहे. अल्पमतात असलेल्या आप सरकारने विश्वासदर्शक ठराव जिंकला आहे. आज दिल्ली विधानसभेत विश्वासदर्शक ठराव मांडण्यात आला. हा ठराव आपने 37 मतं मिळवून जिंकला आहे. बहुमत सिद्ध करण्यासाठी 36 संख्या हवी होती. आपचे एकूण 28 आमदार असून काँग्रेसने आपल्या 8 आमदारांचा पाठिंबा आपच्या पदरात टाकून सत्तेचा मार्ग मोकळा करुन दिला. तर या ठरावाला भाजपने विरोध केला होता.

जनतेचा कौल आणि काँग्रेसचा पाठिंबा घेऊन आम आदमीने दिल्लीत सत्ता स्थापन केली. सत्ता स्थापनेनंतर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी कामाचा एकच धडाका लावला. मोफत पाणी, अर्ध्या दरात वीज, रात्रीचे निवारे असे एकापाठोपाठ एक निर्णय घेऊन जनतेला तर खूश केलं पण विरोधकांच्या पोटात यामुळे गोळा आला. त्यामुळे विरोधकांनी विरोधाचा सूर लगावलाय. याचा परिणाम विधानसभेत दिसणार अशी शक्यता होती. विश्वासदर्शक ठरावात काँग्रेस माघार घेईन किंवा सभागृह त्याग करेल अशी शक्यता वर्तवली जात होती पण असं काही घडलं नाही.

आपचे नेते आणि दिल्लीचे शिक्षा आणि शहरविकास मंत्री मनीष सिसोदिया यांनी ठराव मांडला. आम्ही राजकारणी नाही किंवा आमचा राजकीय असा पक्षही नाही. आम्ही जनतेतून आलो आहोत आणि जनतेसाठीच काम करणार आहोत. दिल्लीकरांना मोफत पाणी, वीज मिळाल्या पाहिजे हा जनतेचा अधिकार आहे. आम्ही दिल्लीच्या विकासासाठी कटीबद्ध आहोत असं सिसोदियांनी स्पष्ट केलं. तर केजरीवाल यांनी आज सकाळी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. सरकार पडणार याबाबत आम्हाला कोणतीही भीती नाही. आम्ही इथं सत्तेचा आनंद घेण्यासाठी आलो नाही. जर आम्हाला सत्ता जाण्याची भीती असती तर आम्ही मंदिरात गेलो असतो. आम्हाला जनतेवर पूर्ण विश्वास असून त्यासाठी आम्हाला काम करायचे आहे त्यामुळे सत्तेत आम्ही किती दिवस राहणार याची चिंता नाही असं परखड मत केजरीवाल यांनी व्यक्त केलं होतं. विश्वासदर्शक ठरावाच्या अगोदरच 'आप'च्या विश्वासदर्शक ठरावाला आम्ही पाठिंबा देण्याच्या निर्णयावर ठाम असून पुनर्विचार करण्याची गरज नसल्याचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अरविंदसिंह लव्हली यांनी स्पष्ट केलं होतं. विधानसभेतही काँग्रेसने आपला पाठिंबा कायम ठेवत आपच्या सत्तेचा मार्ग मोकळा करून दिला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 2, 2014 07:30 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close