S M L

सुनंदा पुष्कर यांचा संशयास्पद मृत्यू

Sachin Salve | Updated On: Jan 17, 2014 11:35 PM IST

सुनंदा पुष्कर यांचा संशयास्पद मृत्यू

Sunanda-Pushkar17 जानेवारी : काँग्रेसचे नेते केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री शशी थरूर यांच्या पत्नी सुनंदा पुष्कर यांचा संशायस्पद मृत्यू झाल्याची धक्कादायक घडना घडलीय. शुक्रवारी संध्याकाळी दिल्लीतील हॉटेल लीलामधील रूम नंबर 345 मध्ये रात्री 8.30 वाजता सुनंदा पुष्कर यांचा मृतदेह सापडला आहे. त्यानंतर हॉटेलच्या वतीनं पोलिसांना कळवण्यात आलंय. ज्या रुममध्ये सुनंदा यांचा मृतदेह सापडलाय त्या रूमची फॉरेन्सिक तज्ञ तपासणी करत आहेत. सुनंदा पुष्कर यांचा मृतदेह शवविच्छदनासाठी हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आलाय.

सुनंदा आणि शशी थरूर यांच्या घरी पेंटींगचं काम असल्यामुळे ते दोघं कालपासूनच हॉटेलवर राहत होते, अशी माहिती शशी थरूर यांचे खासगी सचिव अभिनव कुमार यांनी दिलीये. शुक्रवारी दुपारी साडेतीन वाजता हॉटेलच्या लॉबीमध्ये त्यांना शेवटचं पाहिलं गेलं होतं. हॉटेलच्या हाऊसकीपिंग स्टाफनं संध्याकाळी सात वाजता सुनंदा राहत असलेल्या रूमचा दरवाजा ठोठावला, मात्र काहीच प्रतिसाद न मिळाल्यानं त्यांनी दुसर्‍या स्वाइप कार्डनं दरवाजा उघडला. तेव्हा त्या बेडवर मृतावस्थेत आढळल्या.

प्राथमिक तपासात मृतदेहाजवळ चिठ्ठी सापडली नाही. सुनंदा पुष्कर यांच्या मृतदेहावर कोणत्याही जखमेच्या खुणा आढळल्या नाहीत. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे. धक्कादायक म्हणजे गुरूवारी शशी थरूर यांच्या ट्विटर नाट्यावरुन सुनंदा यांनी नाराजी व्यक्त केली होती. जाहीररित्या झालेल्या वादानंतर अखेर गुरुवारी आपण सुखी जोडपं असून आनंदानं राहत आहोत असं दोघांनी संयुक्तपणे जाहीर केलं होतं. त्यानंतर या वादावर पडदा पडल्याचं मानलं जात असतानाच ही धक्कादायक बातमी आलीये. सुनंदा पुष्कर या मुळच्या काश्मीरच्या. दुबईतल्या टेकॉम या रिअरइस्टेट कंपनीत सेल्स डायरेक्टर म्हणून त्या काम पाहत होत्या. 2010 मध्ये शशी थरूर यांच्याशी त्यांचं लग्न झालं होतं.

काय आहे ट्विटरचा वाद

बुधवारी काँग्रेसचे केंद्रीय मंत्री शशी थरूर यांनी आपल्या टिवट्‌र अकाऊंटवरून पाकिस्तानी पत्रकार मेहर तरार यांच्याबद्दल काही टिवट् अपडेट केले होते. या टिवट्मुळे थरूर आणि मेहर यांच्यात काही तरी सुरू असल्याची चर्चा सुरू झाली त्यामुळे एकच गोंधळ उडाला. पण काही वेळातच थरूर यांनी आपले टिवट्‌र अकाऊंट हॅक झाल्याचं जाहीर केलं. पण थरूर यांच्या गोंधळाचा त्यांच्या पत्नी सुनंदा पुष्कर यांनी चांगलाच समाचार घेतला होता. थरूर यांचे टिवट्‌र अकाऊंट हॅक झालेच नाही. त्यांचे आणि पाकिस्तानी पत्रकार मेहर तरार यांच्याशी प्रेमसंबंध आहे असा आरोप त्यांनी केला होता. इतकंच नाही तर तरार या पाकिस्तानची गुप्तचर संघटना असलेल्या आयएसआयच्या एजेंट असल्याचा आरोपही सुनंदा यांनी केला होता. या प्रकरणामुळे सुनंदा पुष्कर दुखावल्या गेल्या होत्या. आता आमच्यात प्रेम आणि विश्वास नावाची गोष्ट संपली आहे अशी नाराजी सुनंदा यांनी व्यक्त केली होती. मात्र शशी थरूर यांनी मात्र हा वाद निरर्थक असल्याचं म्हटलंय. या सर्व प्रकारावर शशी थरूर यांनी एक निवेदन प्रसिद्ध केलं होतं. "आमच्या ट्विटर अकाउंटवरून करण्यात आलेल्या काही अनधिकृत ट्विटवरून जो वाद निर्माण झालाय, यामुळे आम्ही व्यथित झालोय. आम्हाला हे स्पष्ट करायचं आहे की, आम्ही आनंदी आहोत आणि तसंच रहायचं आहे. सुनंदाची प्रकृती सध्या बरी नसल्यानं तिला या आठवड्यात हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय. ती सध्या आराम करतेय असं थरूर यांनी स्पष्ट केलं होतं.

दोन दिवसातला घटनाक्रम

- बुधवारी शशी थरूर यांनी आपलं ट्विटर अकाउंट हॅक झाल्याचं जाहीर केलं

- थरूर यांच्या ट्विटर अकाउंटवर मेहर तरार या पाकिस्तानी महिला पत्रकारानं केलेले काही रोमँटिक ट्विट्स होते

- त्यानंतर थरुर यांनी ट्विटर हॅक झाल्याचं सांगितलं

- मात्र, थरुर यांचं अकाउंट हॅक झालं नसल्याचं सुनंदा यांनी स्पष्ट केलं

- मेहर यांनी बीबीएमवरून शशी थरुर यांना पाठवलेले मेसेज आपण ट्विटरवर लीक केल्याचं सुनंदा यांनी एका वृत्तपत्राला सांगितलं

- मेहर तरार या शशी थरुरच्या मागे लागल्या असून त्यांना प्रभावित करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप सुनंदा यांनी केला

- मेहर तरार या आयएसआयच्या एजंट असल्याचा आरोप सुनंदा यांनी ट्विटरवरून केला होता

- मेहर तरार या पाकिस्तानच्या डेली टाइम्स या वृत्तपत्राच्या स्तंभलेखिका आहेत

- यानंतर दोघींमध्ये ट्विटवरवरून शेलक्या शब्दांत शाब्दिक चकमक उडाली

- दरम्यान, सुनंदा यांनी वेगवेगळ्या मीडियाला वेगवेगळी माहिती दिली

- आयपीएलमधल्या कोच्ची फ्रँचायझीच्या वादामध्ये आपण शशी थरुर यांना वाचवल्याचं सुनंदा यांनी एका वर्तमानपत्राला सांगितलं

- तसंच आयपीएल प्रकरणी काँग्रेसनं आपल्याला गप्प रहायला सांगितलं होतं, मात्र त्यांचं ऐकून चूक केली असंही सुनंदा म्हणाल्या होत्या

- त्यानंतर शशी थरुर आणि सुनंदा पुष्कर हे घटस्फोट घेणार असल्याचं वृत्त आलं

- अखेर गुरुवारी सुनंदा पुष्कर आणि शशी थरुर यांनी आपल्यामध्ये कोणताही वाद नाही असं जाहीर केलं

- मेहर तरारनं दोघांनाही शुभेच्छा दिल्या

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 17, 2014 09:54 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close