S M L

केजरीवाल वाराणसीत दाखल, आज बेनियाबागमध्ये सभा

Samruddha Bhambure | Updated On: Mar 25, 2014 11:11 AM IST

केजरीवाल वाराणसीत दाखल, आज बेनियाबागमध्ये सभा

kejri varanasi25 मार्च :  संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेतलेल्या राजकीय लढाईसाठी 'आप'चे नेते अरविंद केजरीवाल आज वाराणसीत दाखल झाले आहेत. वाराणसीमधून केजरीवाल यांनी  'भाजप'चे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांना आव्हान दिले आहे. केजरीवाल आजपासून वाराणसीतील प्रचाराला सुरवात करणार आहेत. अर्थात, केजरीवाल प्रचार सुरू करणार असले, तरीही प्रत्यक्ष उमेदवारीचा अर्ज मात्र जनतेचे मत जाणून घेतल्यावरच भरणार आहेत. आजची त्यांची वाराणसी भेट जनमत जाणून घेण्यासाठी असल्याचे सूत्रांनी सांगितले.

केजरीवाल दिल्लीहून रेल्वेने वाराणसीला आले. वाराणसीच्या कँट रेल्वेस्टेशनवर आपच्या कार्यकर्त्यांनी जल्लोषात त्यांचे स्वागत केले. बनारस हिंदू विद्यापीठ हे उत्तर भारतातलं महत्त्वाचं शैक्षणिक केंद्र आहे. तिथं ते डॉक्टरांशी संवाद साधणार आहेत. त्यानंतर ते रोड शो करणार आहेत. 'मोदींविरोधात लढणार का?' या प्रश्नावर ते म्हणाले, 'पहिले जनतेचे मत जाणून घेणार आणि त्यानंतर निवडणूक लढवायची की नाही याचा निर्णय घेणार.'

केजरीवाल यांच्या वाराणसी दौर्‍याविषयी मोठी उत्सुकता आहे. वाराणसीमध्ये 12 मे रोजी मतदान होणार आहे. त्यानंतर चारच दिवसांनी लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. त्यामुळे देशभरातील काही लक्षवेधी लढतींमध्ये वाराणसीतील मोदी विरुद्ध केजरीवाल ही लढत शेवटपर्यंत उत्सुकता ताणून धरण्याची शक्‍यता आहे. आज दुपारी ते जाहीर सभेत भाषण करणार आहेत. त्यावेळी ते वाराणसीमधून निवडणूक लढवण्याची घोषणा करतील का याविषयी उत्सुकता आहे.

केजरीवाल गंगेत न्हाले

अरविंद केजरीवाल यांचा वाराणसी दौरा सुरू झाला आहे. थोड्या वेळापूर्वी त्यांनी गंगेत स्नान केलं. आपली मोहीम यशस्वी करण्यासाठी गंगेचे आशीर्वाद घ्यायला आलोय असं यावेळी केजरीवाल यांनी सांगितलं.

असा राहिल केजरीवालांचा कार्यक्रम

  • सकाळी 10.30 वाजता काशी विश्वनाथाचं दर्शन
  • दर्शनानंतर गंगाकिनारी एका घाटाला भेट
  • दुपारी 12 च्या सुमारास रोड शो
  • दुपारी 3 वाजता सभा, सव्वाचारच्या सुमारास केजरीवाल यांचे भाषण

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 25, 2014 09:37 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close