S M L

विजयोत्सवासाठी नरेंद्र मोदी दिल्लीत दाखल

Samruddha Bhambure | Updated On: May 17, 2014 02:46 PM IST

विजयोत्सवासाठी नरेंद्र मोदी दिल्लीत दाखल

17 मे : भाजपच्या ऐतिहासिक विजयानंतर नरेंद्र मोदी आज दिमाखात दिल्लीत आले. भाजपाध्यक्ष राजनाथ सिंह यांच्यासह इतर नेत्यांनी त्यांचं जंगी स्वागत केलं. एअरपोर्ट ते भाजपच्या मुख्यालयापर्यंत विजयी मिरवणूक काढण्यात आली. यावेळी दोन्ही बाजूंचे रस्ते लोकांनी भरून गेले होते. या मिरवणुकीत भाजपचे दिग्गज नेते मोदींसोबत होते. भाजपच्या मुख्यालयाबाहेर मोदींनी छोटंसं भाषण केलं. त्यानंतर मोदी संसदीय मंडळाच्या बैठकीत भाजपच्या मुख्यालयात गेले. तिथं सर्व ज्येष्ठ नेत्यांनी मोदींचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं. एकमेकांना पेढेही भरवले. सरकार स्थापनेचा निर्णय घेण्यासाठी भाजपच्या संसदीय मंडळाची पुन्हा एकदा बैठक होणार आहे. दरम्यान, मोदी आज वाराणसीला जाणार आहेत. तिथं ते गंगाआरती करणार आहेत आणि रात्री ते अहमदाबादला परतणार आहेत.

नरेंद्र मोदींच्या लाटेवर स्वार होत भाजप आणि एनडीएला ऐतिहासिक यश मिळालंय. 1984 मध्ये काँग्रेसला मिळालेल्या दणदणीत बहुमतानंतर पहिल्यांदाच एका पक्षाला बहुमत मिळतं आहे. सर्व अर्थांनी ही निवडणूक ऐतिहासिक ठरली आहे. एनडीएनं 330चा टप्पा ओलांडलाय तर एकट्या भाजपनं 272चा जादुई आकडा एकट्याच्या बळावर पार केला आहे. महत्त्वाच्या राज्यांमध्येही भाजपनं चमकदार कामगिरी केलीय. सर्वात मोठ्या उत्तर प्रदेशात 80 पैकी 73 जागा भाजपने बळकावल्यायत. त्याचं बरोबर महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, कर्नाटक, दिल्ली, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश राज्यांमध्येही भाजपची क्लीन स्वीप आहे.

मोदींचा विजय साजरा करण्यासाठी भाजपने आधीपासूनच तयारी पूर्ण केली होती. काल सकाळी मतमोजणी सुरू होताच भाजप नेते आणि कार्यकर्त्यांच्या उत्साहाला उधाण आलं होतं. दिल्लीतल्या भाजप कार्यालयापासून, गांधीनगर, अहमदाबाद, मुंबई आणि देशभरातल्या कार्यालयाबाहेर फटाके उडवून, लाडू वाटून आनंद साजरा करण्यात आला. भाजप प्रवक्ते प्रकाश जावडेकर, मुख्तार अब्बास नक्वी यांनी ढोल ताशे वाजवून तर दिल्लीतले भाजप उमेदवार हर्षवर्धन यांनी चक्क नाचून आनंद साजरा केला.

नरेंद्र मोदींचा 17 मेचा दिनक्रम

  • सकाळी 10 वाजता गांधीनगर विमातळावरून दिल्लीकडे प्रयाण
  • दिल्लीला पोहचल्यावर दिल्ली विमानतळावरून भाजपा मुख्यालयापर्यंत रोड शो मध्ये होणार सहभागी
  • दुपारी 12:30 वाजता भाजप संसदीय समितीच्या बैठकीत होणार सहभागी
  • दुपारी 3 वाजता वाराणसी विमातळावर आगमन
  • त्यानंतर लगेच वाराणसीच्या संकट मोचन मंदिरात जाऊन देवदर्शन
  • काशी विश्वनाथाचं घेणार दर्शन
  • त्यानंतर दशाश्वमेध घाटावर होणार मोंदीच्या उपस्थितीत गंगा आरती
  • गंगा आरती झाल्यावर वाराणसीच्या दशाश्वमेध घाटावर वाराणसीकरांशी साधणार संवाद
  • 7 वाजता अहमदाबादकडे करणार प्रयाण

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 17, 2014 11:26 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close