S M L

महागाईचा 'षटकार', जनतेचे 'बुरे दिन' ?

Sachin Salve | Updated On: Jun 17, 2014 07:29 PM IST

महागाईचा 'षटकार', जनतेचे 'बुरे दिन' ?

17 जून : सरकार स्थापन होऊन महिना झालेल्या मोदी सरकारसमोर महागाईचा यक्षप्रश्न उपस्थित झाला असून जनतेवर बुरे दिन येण्याची शक्यता निर्माण झालीय. महागाईचा दर गेल्या सहा महिन्यांतल्या सर्वोच्च पातळीवर आहे. साठेबाजी आणि वस्तूंच्या वाढलेल्या किंमती यामुळे ही महागाई वाढल्याचं केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी म्हटलंय.

यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस होईल या भीतीने व्यापार्‍यांनी साठेबाजी केल्याचं जेटलींनी म्हटलंय. ही साठेबाजी रोखण्यासाठी सर्व राज्य सरकारांनी प्रयत्न करावेत असं जेटलींनी म्हटलं आहे. महागाईचा दर एप्रिलच्या 5.20 टक्क्यांवरून मे महिन्यात 6 टक्क्यांच्याही वर गेला आहे. इराकमधील यादवी आणि त्याचा तेलाच्या किंमतीवर झालेला परिणाम यामुळे डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या भावावरही परिणाम झालेला आहे.

ही महागाई लवकरच आटोक्यात येईल असा विश्वास अरुण जेटलींनी व्यक्त केलाय. तर इराकमध्ये सुरू असलेल्या यादवीमुळे अर्थव्यवस्थेला चिंता असली तरी मागच्या गेल्या वर्षीपेक्षा अर्थव्यवस्थेची स्थिती चांगली आहे, पुरेशी गंगाजळी हाताशी आहे आणि अन्नधान्याच्या किंमती लवकरच कमी होतील असा विश्वास रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी व्यक्त केलंय.

रेल्वेप्रवासही महागणार ?

रेल्वेप्रवासही महागण्याची शक्यता आहे. रेल्वे बोर्ड प्रवासी भाड्यात वाढ करण्याच्या विचारात आहे. यासंदर्भात रेल्वेमंत्री सदानंद गौडा पंतप्रधानांची भेटही घेणार आहेत. त्यांच्या भेटीनंतरच भाडेवाढीचा अंतिम निर्णय घेतला जाणार आहे तर मालवाहतुकीत 5 टक्के भाडेवाढ होण्याची शक्यता आहे. दरम्यान, रेल्वे बोर्डाने जरी भाडेवाढ करण्याचं ठरवलं असलं तरी पंतप्रधान मात्र या भाडेवाढीला अनुकुल नसल्याचं समजतंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 17, 2014 04:37 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close