S M L

सुनंदा पुष्कर यांच्या मृत्यूचं गूढ कायम

Samruddha Bhambure | Updated On: Jul 2, 2014 08:57 PM IST

सुनंदा पुष्कर यांच्या मृत्यूचं गूढ कायम

2  जुलै : माजी केंद्रीय राज्यमंत्री शशी थरूर यांची पत्नी सुनंदा पुष्कर यांच्या गूढ मृत्यू प्रकरणाने आता एक नवे वळण घेतले आहे. सुनंदा पुष्कर यांच्या पोस्टमॉर्टेमचा अहवाल बदलण्यासाठी वरिष्ठांकडून दबाव येत होता, असा आरोप एम्सच्या फॉरेन्सिक सायन्स विभागाच्या प्रमुख डॉ.सुधीर गुप्ता यांनी केला. डॉ.गुप्ता यांनी आरोग्यमंत्री हर्ष वर्धन यांना लिहिलेल्या एका पत्राची प्रत IBN नेटवर्कच्या हाती लागली आहे.

17 जानेवारी रोजी दिल्लीतल्या लीला या पंचतारांकित हॉटेलातल्या एका रूममध्ये सुनंदा पुष्कर यांचा मृतदेह सापडला होता. सुरुवातीला पुष्कर यांच्या मृत्यूविषयी संशय व्यक्त केला गेला. पण पोस्टमॉर्टेम रिपोर्टनुसार पुष्कर यांचा मृत्यू नैसर्गिक असल्याचं म्हटलं होतं. पण आता सात महिन्यांनंतर एम्सच्या फॉरेन्सिक सायन्स विभागाच्या प्रमुख डॉ. सुधीर गुप्ता यांनी एका पत्राद्वारे हा गौप्यस्फोट केला आहे. पोस्टमॉर्टेम रिपोर्टमध्ये नैसर्गिक मृत्यू लिहावं यासाठी आपल्यावर दबाव आणण्यात आला होता, असं डॉ.गुप्ता यांनी म्हटलं आहे. पुष्कर यांचा मृत्यू आत्महत्या किंवा हत्या असू शकतो असं गुप्ता यांचं म्हणणं आहे.

सुनंदा पुष्कर यांच्या पोस्टमॉर्टेमच्या अहवाला प्रकरणी तेव्हाचे केंद्रीय आरोग्यमंत्री गुलाम नबी आझाद आणि एम्सच्या संचालकांना न जुमानल्यामुळे आपल्याला डावलून त्याच खात्याच्या दुसर्‍या डॉक्टरला बढती देण्यात आली. संबंधित डॉक्टरऐवजी या पदावर आपण पात्र आहोत असा दावाही डॉ.गुप्तांनी या पत्रात केला आहे.  डॉ.सुधीर गुप्ता हे सुनंदा पुष्कर यांच्या पोस्टमॉर्टेम टीमचे प्रमुख होते.

दरम्यान, 'एम्स'नं सुधित गुप्ता यांनी केलेले आरोप फेटाळलेत. एम्सकडून डॉ. गुप्तांवर कोणताही दबाव नव्हता असंएम्सचे प्रवक्ते अमित गुप्ता यांनी स्पष्ट केलं आहे. तसंच गरज लागली तर त्यांच्याविरोधात कारवाई करणार असल्याचंही गुप्ता म्हणाले आहेत.

या प्रकरणी शशी थरूर यांनी एक निवेदन प्रसिद्धीला दिलं आहे. त्यात ते म्हणाले,

माझ्या पत्नीच्या, सुनंदाच्या मृत्यूची भरपाई कशानंच होऊ शकत नाही. अगदी पहिल्या दिवसापासून मी सुनंदाचा मृत्यू नेमका कसा झाला याबद्दल सगळ्या बाजूंनी चौकशी करावी अशी विनंती करत होतो. चौकशी करणार्‍या पोलिसांना मी संपूर्ण सहकार्य दिलं. सुनंदाच्या मृत्यूच्या चौकशीत पारदर्शकता असावी, तिच्या मृत्यूची चौकशी लवकरात लवकर पूर्ण व्हावी. पुष्कर कुटुंबानंही हीच भूमिका घेतलीय. सुनंदाचा मृत्यू नेमका कसा झाला याचा निष्कर्ष लवकर काढावा म्हणजे शंका घेतल्या जाणार नाहीत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 2, 2014 05:50 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close