S M L

शहरात 47 रुपयांपेक्षा कमी खर्च करणारा गरीब

Samruddha Bhambure | Updated On: Jul 7, 2014 11:26 AM IST

शहरात 47 रुपयांपेक्षा कमी खर्च करणारा गरीब

Poverty

07  जुलै :  शहरात 47 रुपये आणि गावात 32 रुपयांपेक्षा कमी खर्च करणारा गरीब समजला जाईल, अशी गरिबीची नवी व्याख्या रंगराजन समितीनं ठरवली आहे. देशात 10 पैकी 3 गरीब असल्याचाही अहवाल त्यांनी सादर केला आहे.

पंतप्रधानांच्या अर्थविषयक सल्लागार समितीचे माजी सल्लागार सी. रंगराजन यांच्या पॅनेलनं देशातली गरिबी निश्चित करणार्‍या सुरेश तेंडुलकर समितीचा अहवाल फेटाळला आहे. 2011-12 मध्ये देशातली 29.5 टक्के लोकसंख्या गरीब होती, असं रंगराजन पॅनेलनं म्हटलं आहे. 2009-10 मध्ये देशातली गरिबी 38.2 टक्के इतकी होती, असाही निष्कर्ष या पॅनेलनं काढला आहे. तेंडुलकर समितीने काढलेल्या निष्कर्षांनुसार, 2009-10 मध्ये देशातली गरिबी 29.8 टक्के होती आणि ती आता घसरून 21.9 टक्के झाली आहे. नियोजन मंत्री राव इंदरजित सिंग यांना हा अहवाल सोपवण्यात आला. त्यानुसार शहरामध्ये 47 रुपयांपेक्षा कमी खर्च करणारी व्यक्ती गरीब समजली जाईल. तेंडुलकर समितीनं 33 रुपयांची मर्यादा सुचवली होती.

तेंडुलकर समितीच्या निकषांवर आधारित 2011 मध्ये नियोजन आयोगानं सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र सादर केलं होतं. त्यानुसार शहरी भागात 33 रुपयांपेक्षा जास्त खर्च करणार्‍या आणि ग्रामीण भागात 27 रुपयांपेक्षा जास्त खर्च करणार्‍या व्यक्ती गरीब मानल्या जाता येणार नाहीत. त्यावरून नियोजन आयोगावर टीकेची झोड उठली होती. तेंडुलकर समितीच्या अभ्यास पद्धतीचा आढावा घेण्यासाठी गेल्या वर्षी सी. रंगराजन समितीची स्थापना करण्यात आली होती.

  • रंगराजन समितीचा अहवाल : 2011-12मध्ये 29.5 टक्के गरिबी आणि 2009-10मध्ये 38.2 टक्के गरिबी
  • तेंडुलकर समितीचा अहवाल : 2009-10मध्ये 29.8 टक्के गरिबी आणि 2011-12मध्ये 21.9 टक्के गरिबी
  • रंगराजन समितीचा अहवाल : शहरी भागात प्रतिदिन 47 रुपयांपेक्षा कमी खर्च करणारी व्यक्ती गरीब तर ग्रामीण भागात प्रतिदिन 32 रुपयांपेक्षा कमी खर्च करणारी व्यक्ती गरीब
  • तेंडुलकर समितीचा अहवाल : शहरी भागात प्रतिदिन 33 रुपयांपेक्षा कमी खर्च करणारी व्यक्ती गरीब तर ग्रामीण भागात प्रतिदिन 27 रुपयांपेक्षा कमी खर्च करणारी व्यक्ती गरीब

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 7, 2014 11:23 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close