S M L

रेल्वेच्या जेवणात आढळले झुरळ, IRCTC वर कारवाई

Samruddha Bhambure | Updated On: Aug 4, 2014 02:00 PM IST

रेल्वेच्या जेवणात आढळले झुरळ, IRCTC वर कारवाई

04 ऑगस्ट :   कोलकाता राजधानी एक्स्प्रेसमध्ये दिल्या जाणार्‍या जेवणात झुरळं आढळल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. रेल्वे अधिकार्‍यांनी राबवलेल्या विशेष मोहिमेत ही गंभीर बाब समोर आली असून या निष्काळजीपणाबद्दल रेल्वेने गाडीत कॅटरिंग सुविधा देणार्‍या इंडियन कॅटरिंग आणि टुरिझम कॉर्पोरेशनवर (आयआरसीटीसी) कारवाईचा करण्याचा निर्णय घेतला आहे.

रेल्वे अर्थसंकल्प मांडताना रेल्वेमंत्री सदानंद गौडा यांनी रेल्वे गाड्यांमध्ये मिळणार्‍या खाद्यपदार्थांचा दर्जा सुधारण्यावर भर दिला आहे. यानंतर जुलैमध्ये रेल्वेतर्फे देशभरात एक विशेष मोहीम राबवण्यात आली होती. यात रेल्वे अधिकार्‍यांना अनेक गाड्यांमध्ये निकृष्ट दर्जाचे जेवण आढळून आले आहे.

23 जुलैला कोलकाता राजधानी एक्स्प्रेसमध्ये झालेल्या पाहणीत आयआरसीटीसीतर्फे दिल्या जाणार्‍या जेवणात झुरळ आढळलं तर अन्य 13 गाड्यांमध्ये जेवणाचा दर्जा निकृष्ट होता. या बेजबाबदारपणासाठी आयआरसीटीसीसह आर.के. असोसिएट्स, सनशाईन कॅटरर्स, वृंदावन प्रॉडक्ट्स या चार कंत्राटदारांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. आयआरसीटीसीला एक लाख रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे तर उर्वरित कंत्राटदारांवर 50 हजार ते एक लाख रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. या चारही कंत्राटदारांकडून रेल्वेला एकूण 11 लाख रुपये दंड म्हणून मिळणार आहे तर एखादा कंत्राटदार 5 वेळा दोषी आढळल्यास त्याचे कंत्राटच रद्द करू असा इशाराच रेल्वे अधिकार्‍यांनी दिला असून रेल्वेच्या या धडक कारवाईमुळे रेल्वेतील कंत्राटदारांचे धाबे दणाणले आहेत.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 4, 2014 10:00 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close