S M L

लोकसभाध्यक्षा पक्षपाती; लोकसभेत राहुल गांधी आक्रमक

Samruddha Bhambure | Updated On: Aug 7, 2014 11:03 AM IST

लोकसभाध्यक्षा पक्षपाती; लोकसभेत राहुल गांधी आक्रमक

 06 ऑगस्ट : लोकसभेत आज काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींचं आक्रमक रूप पाहायला मिळालं. उत्तरप्रदेश आणि देशातील अन्य राज्यांमध्ये वाढलेल्या हिंसेच्या मुद्द्यावर संसदेत चर्चा करण्यास विरोध करून लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन पक्षपात करत असल्याचा आरोप काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केला आहे. देशात सध्या फक्त एकाच व्यक्तीला महत्त्व दिले जात आहे असे सांगत राहुल गांधींनी नरेंद्र मोदींवरही अप्रत्यक्षरित्या टीका केली आहे.

बुधवारी लोकसभेचं कामकाज सुरू झाल्यावर जातीय हिंसेच्या मुद्द्यावर चर्चा करण्याची मागणी विरोधकांनी केली पण लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी चर्चा करण्यास नकार दिल्याने विरोधक आक्रमक झाले. त्यानंतर राहुल गांधी आणि काँग्रेसचे अन्य खासदार अध्यक्षांसमोरच्या मोकळ्या जागेत उतरून 'वुई वाँट जस्टीस'च्या घोषणाही दिल्या. इतर विरोधी पक्षांनीही यावेळी घोषणाबाजी केली. राहुल गांधी प्रथमच लोकसभेत आंदोलन केल्याने काँग्रेसच्या खासदारांमध्ये उत्साह संचारला होता.

लोकसभेबाहेर पडल्यानंतर पत्रकारांशी बोलताना राहुल गांधी म्हणाले, जातीय दंगलींवर चर्चा करण्याची मागणी करत असताना लोकसभाध्यक्षा बोलण्यासाठी आम्हाला परवानगी देत नाहीत. कोणत्याही विषयावर चर्चा करण्याची सरकारची मानसिकताच नाही, असं सर्वांनाच आणि मलाही वाटत आहे. संसदेसह देशात सध्या फक्त एकाच व्यक्तीच्या आवाजाला महत्त्व दिले जात आहे. यापुढेही मी संसदेत असाच माझा आवाज उठवत राहणार आहे असे गांधींनी सांगितले.

दरम्यान, राहुल गांधींच्या लोकसभेतल्या आक्रमक भूमिकेवर मोदी सरकारने बोचरी टीका केली आहे. पक्षातलं बंड शमवण्यासाठी काँग्रेसचा हा प्रयत्न आहे, अशी प्रतिक्रिया केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी दिली आहे. काँग्रेसमध्ये नेतृत्त्वावरूनच वाद आहेत, अनेक पक्षनेत्यांचा राहुल गांधींच्या नेतृत्त्वावर विश्वास नाही, अशा नेत्यांना राहुलही आक्रमक होऊ शकतात, हे दाखवण्याचा हा प्रयत्न होता, असा आरोप जेटलींनी केला आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 6, 2014 06:19 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close