S M L

पाकिस्तानातून 'तो' जवान भारतात सुखरूप परतला

Sachin Salve | Updated On: Aug 8, 2014 09:49 PM IST

पाकिस्तानातून 'तो' जवान भारतात सुखरूप परतला

08 ऑगस्ट : 2 दिवसांपूर्वी चिनाब नदीच्या प्रवाहातून पाकिस्तानात वाहून गेलेला बीएसएफचा जवान भारतात सुखरूप परतलाय. बीएसएफ जवान सत्यशील यादव यांना पाकिस्तानच्या सैन्याने भारताकडे सोपवलं आणि जम्मूजवळच्या आर. एस. पुरा पोस्टजवळून सरहद्द पार करून हा जवान भारतात परतला आहे.

गेले 2 दिवस हा जवान पाकिस्तानी रेंजर्सच्या ताब्यात होता. आणि पाकिस्तानी सैन्याने आपल्यासोबत चांगला व्यवहार केला असून, आपली काहीही तक्रार नसल्याचं या जवानाने पत्रकारांशी बोलताना म्हटलंय. बीएसएफचे डीजी डी.के. पाठक यावेळी उपस्थित होते. ते म्हणाले की, आपला जवान सुखरुप मायदेशी परतलाय. पाकमध्ये त्याला चांगली वागणूक देण्यात आली. दोन्ही देशात सुरू असलेल्या चर्चेमुळे हे शक्य होऊ शकलं. यादव यांची पाक सैनिकांनी चौकशी केली पण आपला जवान मायदेशी परतला याचं समाधान आहे.

बुधवारी सत्यशील यादव आपल्या तीन सहकार्‍यांसह आंतरराष्ट्रीय सीमेवर बोटेतून पाहणी करत होते. पण अचानक बोट खराब झाली. यादव यांचे तिन्ही सहकारी पोहून भारतीय हद्दीत येऊ शकले पण पाण्याचा प्रवाहामुळे सत्यशील यादव पाकिस्तानात वाहून गेले. सत्यशील पाकच्या सियालकोट भागातील एका गावात पोहचले.

तिथे पाकच्या सैन्यानं त्यांना ताब्यात घेतलं. तब्बल दोन दिवस ते पाक सैन्याच्या ताब्यात होते. सत्यशील हे उत्तरप्रदेशमधील फिरोजाबाद येथील रहिवाशी आहे. त्यांना दोन मुली आणि एक मुलगा असून सर्वात लहान मुलगी ही 9 महिन्याची तान्हुली आहे. सत्यशील परत यावे यासाठी त्यांची कुटुंबीयांनी देव पाण्यात ठेवले होते अखेर आज प्रार्थना फळाला लागली आणि सत्यशील यादव आपल्या मायभूमीत सुखरुप परतले.

 

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 8, 2014 06:49 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close